व्याख्यानमाला-१९८९-१५

कॉर्लमार्क्सनी असं म्हटलंय "कोणत्याही समाजात सामाजिक क्रांतीची चळवळ धार्मिक क्रांतीपासून होते. धर्मग्रंथावरील परखड टीकेपासून सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, तुमच्या समाजाची क्रांती व्हायची असेल तर तुमचा समाज धार्मिक बंधनातून मुक्त झाला पाहिजे. तुमच्या धर्मासंबंधीच्या ज्या कल्पना आहेत त्यांच्यावर टीका झाली पाहिजे. धर्म ही एक बंद गोष्ट असता कामा नये. ती चर्चेला खुली पाहिजे. या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे, "धर्म हा मनुष्याकरीता आहे. मनुष्य धर्माकरिता नाही. जो धर्म तुम्हास माणूस म्हणून ओळखावयास तयार नाही, जो धर्म तुम्हास पाणी मिळू देत नाही. तो धर्म या संज्ञेला अपात्र आहे. जो धर्म तुम्हाला शिक्षण मिळू देत नाही, तुमच्या ऐहिक उत्कर्षाच्या आड येतो तो धर्म संज्ञेला पात्र नाही. जो धर्म आपल्या अनुयायांना आपल्या धर्मबांधवाशी माणुसकीने वागण्यास शिकवत नाही तो धर्म नसून रोग आहे, जो धर्म अज्ञानांना अज्ञानी रहा, निर्धनाना, निर्धन रहा असे म्हणतो, तो धर्म नसून शिक्षा आहे." यापुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "हिंदूधर्म हा दगडांचा धर्म आहे, त्याच्यापुढे कपाळ फोडून घेतले तरी काही उपयोग नाही." पण बुद्धांचा धर्म ज्ञानावर उभा होता. बुद्धधर्म हा बुद्धी वादावर उभा होता. समाज परिवर्तनाचे ते गतिविज्ञान होतं. महाविज्ञान होतं. आंबेडकर पुढे म्हणाले की, मनूने मनुस्मृती लिहिली असेल. आमचा त्याला आक्षेप नाही, पण ती मनुस्मृती आज तुम्ही प्रमाण मानता याला आमचा आक्षेप आहे. हे आंबेडकरांचं विधान आमच्या देशातल्या व जगातल्या सगळ्या धर्मांना लागू कोलं पाहिजे. धर्म ही गोष्ट माणसासाठी आहे, धर्म ही गोष्ट माणसांनी निर्माण केलेली आहे. की स्वत:च्या समाजजीवनामध्ये त्या माणसाने वागावे कसे यासाठी? इरावती कर्वे म्हणतात. "धर्म म्हणजे माणसाने समाजात कसे वागावे या संबंधीचे नियम, माणसाचे समाजव्यवहारातील नियम" महर्षि व्यास हा एक जागतिक कीर्तीचा कलावंत ज्याला आम्ही प्रतिभावंत मानतो, मानवी जीवना संबंधीप्रचंड निरीक्षण-परीक्षण करणारा हा माणूस. त्यांनी सांगीतलं धर्म म्हणजे " जो समाजाची धारणा करतो तो धर्म" नव्या समाजाला जुन्या धर्माची वस्त्रं बसत नाहीत. जसे व्यक्तीचे वय वाढते तसे समाजाचेही वय वाढते. पाचवी मधल्या मुलाची वस्त्र एस्. एस्. सी. वाल्या मुलाला येणार नाहीत. म्हणून जोतिराव फुल्यांनी गुलामगिरीमध्ये संबंध अवतार कल्पना आमच्या ज्या होत्या त्या धुडकावून लावल्या. तुमच्या तो वराह अवतार असेल, कूर्म अवतार असेल परशुराम अवतार असेल, हे सगळे अवतार लोकांना फसविण्यासाठी निर्माण केले आहेत. त्यांची भाषा अशी तुमच्या कोल्हापूरी रस्त्यासारखी झणझणीत होती.

जोतिराव फुले यांची भाषा त्यांच्या शेतकरी भट्टीच्या मुशीतून ज्या तप्त स्वरुपात बाहेर पडली त्या स्वरुपातच ती ग्रंथामधून प्रसिद्ध झालेली आहे. ते कृतिशील तत्त्वचिंतक असल्यामुळे थंड गोळ्यासारखा पडलेला बहूजनसमाज त्यांनी आपल्या भाषासामर्थ्यांने हलविला. जोतिराव फुले यांनी जाती संस्थेविरुद्ध बंड पुकारले, बुद्धीप्रामाण्यवाद, बंधुता आणि समतामूल्य, शोषणमुक्त नवमानवतावाद या मूल्यांवन अधिष्ठित सामाजिक पुनरचनेचे निशाण फडकविले.

"धर्म राज्य बेद मानवा नसावे । सत्याने वागावे । ईशासाठी ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी । धरावे पोटाशी । बंधपरी निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक । भांडणे अनेक । कशासाठी ।।

आपण लक्षात ठेवा जेव्हा माणूस मनापासून बोलतो ना,तेव्हा तो अतिशय स्पष्ट बोलतो. जोतिराव फुले फक्त बुद्धीतून बोलत नव्हते. बुद्धी आणि अंत:करण यांचं एक मुलायम मिश्रण-रसायन त्यांच्या बुद्धीवादामध्ये झालेलं होतं. मानवतेसंबंधी अपार असा गहिंवर, माणसांच्या संबंधी अफाट अशी तडफ, माणसांवर प्रेम करणारा हा लोकांचा तत्त्ववेत्ता, भारतीय सामाजिक विषमतेला सुरूंग लावणारा हा क्रांतिकारक तत्त्वज्ञ! आता आमच्याकडे वाद आहेत. जोतिराव फुले तत्त्वज्ञ होते हा समाजसुधारक होते? झालं आमच्या संशोधकाला दोन-चार वर्षे खूप झाली हा वाद करण्यासाठी ! यावर आमची स्कॉलरशिप! आंबेडकरांची स्कॉलरशीप होतीच पण ती अशी स्कॉलरशिप होती. "With Social Outlook' होती. इथं 'सोशल औटलूकच' नाही. फक्त स्कॉलरशिपच आहे. पगाराचा घाणा ओढण्यासाठी ! महात्मा फुले यांना तुम्ही स्कॉलर म्हणा त्यांना तुम्ही तत्त्वज्ञ म्हणू नका, तु्मही क्रांतीकारक म्हणू नका. तुम्ही म्हणजे सारं जग नव्हे. वर्तमानपत्रांच्या अक्षरात मावळणा-यांच्या अभिप्रायाची कोण पर्वा करतो? आपल्यात आज ते नाहीत पण संबंध एकोणिसाव शतक ज्या माणसाच्या विचारानी गर्जत होतं असा तो तो एक क्रांतीचा व्याघ्रसिंह होता. दणाणून सोडलं सगळं त्यांनी गोपाळ गणेश आगरकर तुमच्याच जिल्ह्यातले, त्या आगरकरांच्या बुद्धीवादाची थट्टा केली आमच्या लोकांनी, पण आज आगरकर द्रष्टे ठरले. द्रष्टी माणसं लोकांचे जीवनात आनंद निर्माण करतात. आमच्या वर्ण संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्राची भाषा ते बोलत नाहीत. मग ते म्हणाले जोतिराव फुले राष्ट्रवादी नव्हते. ते इंग्रजांना मदत करीत होते. म्हणजे ते देशद्रोही होते. म्हणजे आमच्या देशातील स्त्रियांना शिकवू नका म्हणणारा माणूस राष्ट्रवादी, अस्पृश्य माणूस  शिकता कामा नये तो अस्पृश्यच राहिला पाहिजे असे म्हणणारा माणूस राष्ट्रवादी. दहा वर्षाच्या मुलीवर जबरी संभोग करण्याचा अधिकार पुरुषाला असावा असं मानणा-यांचा पक्ष घेणारा माणूस राष्ट्रवादी. शेतक-याला पार्लमेंटात पाठवून काय नांगर हाकायचा आहे. असा म्हणणारा माणूस राष्ट्रवादी.स्त्रियांना शिकलं पाहिजे. अस्पृश्यता गेली पाहिजे. स्पृश्य-अस्पृश्य भेद राहता कामा नये, सगळ्या समाजांनी शिकलं पाहिजे तो माणूस राष्ट्रवादी नाही.