व्याख्यानमाला-१९८९-१२

शूद्राला पशूपेक्षा नीच वागविले म्हणून जोतिरावांचा हा सात्त्विक संताप माणसाला माणूसपणाची वागणूक द्या यासाठी होता. पेशवाईच्या अस्तानंतर फुले यांचा जन्म झाला ही वस्तुस्थिती होती. दुस-या बाजीरावाच्या कारकीर्दीत पेशव्यांनी कहर केलेला होता. दुस-या बाजीरावास कंगाल बुद्धीचा कलिपुरुष हे नांव होतं. इशारा या आपल्या पुस्तिकेत पेशवाईचं वर्णन करताना जोतिराव सांगतात -

"थोडकेच दिवसामागे म्हणजे आर्यं पेशवे यांचे शेवटील कुलदीपक पुरुष रावबाजीचे कारकीर्दीचा अस्त होईपर्यंत शेतकरी लोक शेतसारा देण्यास थोडेसे चुकले तर त्यास उन्हामध्ये ओणवे करुन पाठीवर एक मोठा धोंडा द्यावा अथवा त्या शेतक-याच्या बायकोस त्याच्या पाठीवर बसवावे आणि खालून त्यास मिरच्याचा धूर द्यावा"

ते आणखी पुढे वर्णन करतात -

"ते प्रजा याचा अर्थ काडीस्पट, ढेकूण अथवा काही एक प्रकारची जनावरे समजत. त्यांचा उपयोग म्हटला म्हणजे त्यांनी राजे व त्यांच्या जातीचे लोकांकरिता त्यांचे स्त्रियांकरीता व मुलांबाळांकरीता धान्य उत्पन्न करावे व वस्त्रे विणावीत. त्यांच्या करीता उन्हातान्हात खपावे आणि त्यास ऐष आरामाच्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व पुरवाव्यात"

"स्वातंत्र्याची किंमत देऊन बाजीरावांनी आपल्या देहाचा बचाव विकत घेतला" असे उद्गार वसईच्या तहानंतर ग्रॅंडडफ यांनी काढलेले होते.

अन्याय, अत्याचार, शोषण, भ्रष्टाचार, अस्पृश्यांची गुलामगिरी, शेतक-यांची पिळवणूक, स्त्रियांना भोगदासींचा दर्जा, स्त्रियांचा गुलामाप्रमाणे बाजार हे पेशवाईचे वैशिष्ठय होते. इ. सन. १८०० ते १८०१ मधील खालील नोंद पेशवाईच्या चालू असलेल्या धुमाकूळावर पुरेशी प्रकाश टाकणारी आहे.

"तालुके रत्नागिरी येथे (शिल्की) कुणबीनी फार आहेत. त्या पैकी सरकार कामास जरुरातील धडधाकट पाहून शिलकेस राखणे बाकी राहतील त्या चौकशीने प्रोक्त करणे, या केवळ निकामी म्हाता-या विकत न घेई अशा असतील त्या दरकारदाराचे विद्यमाने सोडून देणे, म्हणून नारो अनंत व विठ्ठल नारायण मामलेदार तालुके मजकूर यांचे नांवे. " " पुण्यातील बहुतेक गृहस्थांच्या घरी कुळबीनी लेकावळे व गुलाम असत " असे विधान लोकहितवादीनेही केले आहे.

जोतिराव फुले यांच्या प्रत्येक कृतीला त्यांचा विचारांचा आधार होता. आणि त्यांच्या प्रत्येक विचाराला कृतीतील अनुभवाचं सामर्थ्य होतं. कॉर्लमार्क्स म्हणला होता -

"जग हे कसं आहे हे जगातील अनेक तत्त्ववेत्यानी सांगीतलेलं आहे फक्त प्रश्न आहे, आहे ते जग कसं बदलायचं याचा"

कॉर्लमार्क्सच्या वरील विचाराचं उत्तर जोतिराव फुले यांनी १८४८ साली दिल. हा जो आमचा समाज बदलायचा आहे ना? तो अशा पद्धतीने बदलायचा की ज्या समाजात सर्वसामान्य माणसाला ज्ञान घेणे हा त्याचा प्राथमिक अधिकार असेल. प्रत्येकाला शिकण्याची संधी मिळेल. सुसंस्कृत जीवन जगण्याचा अधिकार मिळेल. आपल्या माहितीसाठी मी आवर्जून एक संदर्भ देतो आहे. १८४८ साली लंडन  म्युझियमच्या लायब्ररीमध्ये बसून कॉर्लमार्क्स अॅकॅडेमिक गोष्टी लिहीत होता. जगातील कामगारांच्या हातात समाजवादाचं क्रांतीकारी शस्त्र दोत होता. जगातील कामगारांनो एक व्हा असं सांगत होता. कामगारांचं राज्य आलं पाहिजे याचा आग्रह मांडत होता, त्याच वेळी जोतिराव फुले पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात अस्पृश्य मुलींची पहिली शाळा चालवत होते. भारतीय माणसांनी काढलेली भारतातील  ती पहिली शाळा होती.  इतर अनेक शाळा चालल्या होत्या पण एका भारतीय माणसाने शुद्र आणि अतिशूद्र मुलींच्यासाठी काढलेली मुलींची पहिली शाळा म्हणजे जोतिरावांची पहिली शाळा होय. भाग्य विधाता, भारतीय स्त्रियांच्या शिक्षणाचं पहिलं ज्ञानपीठ ज्याला आपण म्हणू ते जोतिराव फुले कॉर्लमार्क्सचा क्रांती विचार मांडत होते. तो क्रांती करण्यासाठी कुठे गेला नाही. त्यांच्या विचारातलं सामर्थ्य हातात घेऊन लेनीन यांनी रशियामध्ये कम्युनिष्ट क्रांती घडवून आणली. जोतिराव फुले. ज्याला भारतीय समाजाचा सामाजिक मार्क्स असं म्हणू, त्यांनी भारतीय सामाजिक क्रांतीचा क्रांती विचारही केला. विचार क्रांतीही केली आणि तशी प्रत्यक्ष कृतीही केली. सत्यविचार, सत्यवर्तन आणि सत्यधर्म व सद्सतविवेक किती अव्वल दर्जाचा असतो हे त्यांनी आपल्या कृतीशील प्रयोगातून सिद्ध केलं.