व्याख्यानमाला-१९८९-१६

माझा मुद्दा प्रवृत्तीशी निगडित आहे. जोतिराव फुल्यांचा हल्ला व्यवस्थेवर होता. व्यक्तीवर नव्हता प्रवृत्तीवर होता. कुठल्या एका विशिष्ट जातीवर नव्हता त्या जातीमधल्या प्रवृत्तीवर होता. अनेक ब्राह्मण माणसं जोतिराव फुल्यांच्या बरोबर होती. काम करत होती. ब्राह्मण्य सोडून ते त्यांच्या संबंध चळवळीला मदत करीत होते. फुल्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. त्यांनी फुले जातीयवादी म्हणणा-याना उत्तर दिले पाहिजे.

जोतिराव फुल्यांनी विधवांचे पासून झालेल्या मुलांसाठी बालहत्त्या प्रतिबंधक गृह काढलं. काय अवस्था होती ! गरीब समाजातल्या स्त्रिया विधवा झाल्यातरी तो गरीब समाज लग्न लावून देतो. पण जो उच्च समजला जाणारा समाज आहे. मग तो आमच्या मराठ्यातील देशमुख असेल किंवा ब्राह्मण असेल. अहो सगळी लग्ने आठव्या नवव्या वर्षी व्हायची. खुद्द पेशव्यांची लग्ने बघा, यादी वाचा पेशव्यांच्या लग्नाची, नव-याचे वय बारा वर्षे, व मुलीचं वय आठ वर्षे-दहा वर्षे पंधराव्या वर्षी नवरा मेला की ही विधवा. तिचं केशवपन करायचं आणि तिनं विधवा म्हणून आयुष्यभर तसच राहायचं. तिला विद्रूप केलं जायचं किड्या-मुंग्या-सारखं जगणं तिच्यावर लादलं जायचं! मग कुठेतरी तिचा पाय चुकायचा, फसायचा. मग तिनं तळं जवळ करायचं, विहिरीत जाऊन जीव द्यायचा. विष घेऊन आत्महत्या करायची. त्या पापकृत्यामध्ये पुरुषही सहभागी असायचा, पण तो मोकळा असायचा, नामानिराळा रहायचा.

जोतिराव फुल्यांनी पुण्यामध्ये जागोजागी अशी पाटी लावली की, विधवांनी आपली मुलं आमच्या गृहामध्ये आणून सोडावीत, त्यांचं बाळंतपणही आम्ही करु गुप्तता राखू, आणि त्या ब्राह्मण विधवेपासून काशीवाई नवरंगे पासून झालेला 'यशवंत' नावाचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. १९५५ साली भारतीय लोकसभेने नात्याबाहेरील व्यक्तीस दत्तक घेण्याचा कायदा मंजूर केला. जोतिराव फुलें यांनी स्वातंत्र्य मिळण्याच्या ऐंशी नव्वद वर्षे अगोदर जातीबाहेरील आणि नात्याबाहेरील काशीबाई नवरंगे नावाच्या ब्राम्हण विधवेपासून झालेल्या 'यशवंत' या मुलाला दत्तक घेतले.

"निर्मिचे निर्मिला मानव पवित्र ।
कमि जास्त सूत्र बुद्धीमध्ये ।।
पिढीजाद बुद्धी नाही सर्वांमधी
शोध करा आधि पुरतेपणी ।।१।।

हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय - १९५६ नंतरचा महाराष्ट्र. प्रबोधनच थांबलेलं आहे म्हणून सांगतोय, जोतिराव फुल्यांची आठवण आम्हाला आज का होते. जोतीराव फुले ज्या ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढले ते ते सगळे प्रश्न आज सुटायचे राहिलेले आहेत. लोकशाही येऊन आमचे सरकार येऊन सुद्धा, गोरा साहेब जाऊन काळा साहेब आला. प्रवृत्ती तीच चालू आहे. त्या संबंधी मी उद्या जास्त बोलेन.

जोतिराव फुले हे समाजाच्या प्रत्येक प्रश्नांवर विचार करत होते, ते सोडविण्यासाठी झटत होते. प्रश्न जातीचा नव्हता. जे लहान असतात ना? ते जातीचं डबकं करुन त्यात आरामात पोहतात, खातात, पितात, बेडकासारखं त्यांचं विश्व छोटं असतं यशवंतराव चव्हाणांनी एक ठिकाणी म्हटलेलं आहे. "माणस जन्माने मोठी होत नाहीत. माणसं मोठी होतात त्यांच्या कर्तृत्वान." पण इथं तर सगळं कर्तृत्व जातीच्या पाळण्यात ! मराठा मोठा का? मराठ्यात जन्मला म्हणून त्याच यश काय? त्याचे आईबाप मराठा होते मग गर्वसे कहो आम्ही म्हणायचं 'हम मराठा है' गर्व काय? ही काय गर्व बाळगायची गोष्ट आहे ? काय चालवलं हे ? या सर्वांच्या पलिकडे जाऊन जोतिराव फुल्यांनी तळातळा माणूस उभा करण्यासाठी, सामान्य माणूस उभा करण्यासाठी त्याला त्याचं हरवलेलं जीवन देण्यासाठी चळवळी केल्या त्यावेळी किती चळवळी चालू होत्या?

जेव्हा जोतिराव फुले काम करत होते तेव्हा लो. टिळक हे १८५६ ला जन्मले, आगरकर त्यावेळी आहेत, महादेव गोविंद रानडे त्यावेळी आहेत. किती माणसे आहेत ते पहा भारतात त्यावेळी ! महादेव गोविंद रानडे म्हणाले - "जो समाज पन्नास पाऊले पुढे जात नाही. तो समाज पांचशे पाऊले मागे जातो" तर समाज पुढे गेला पाहिजे. मात्र प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांनी कच खाल्ली, विधवा विवाह झाले पाहिजेत अशा परिपत्रकावर त्यांनी सह्या केल्या. त्यांची पहिली पत्नी मेल्यानंतर स्वत: ज्यावेळी लग्न करावयाची वेळ त्यांच्यावर आली तेव्हा त्यांनी विधवेशी लग्न करा असे त्यांचे मित्र म्हणाले. पण त्यांनी ते केले नाही. प्रत्यक्ष कृती करण्यासाठी जे मानसिक बळ लागतं ते मानसिक बळ, बौद्धिक बळ, ते सामाजिक धाडस ते जोतिराव फुल्यांच्याकडे होते. ते रानड्यांच्या जवळ नव्हते. जोतिरावांनी कुणाची पर्वा केली नाही.