व्याख्यानमाला-१९८९-१७

सगळे त्यांना म्हणाले हे ब्राह्मणद्वेष्टे आहेत. पण टिळकांसाठी त्यांनी फंड जमा केलेला आहे. टिळकांचा सत्कार त्यांनी केलेला आहे आणि चिपळूणकरांची शाळा अतिशय चांगली चालते म्हणून सरकारने तिला ज्यास्त अनुदान दिले पाहिजे अशी शिफारस केली आहे. ही माणसं मोठी असतात. मोठी माणसं नेहमी साधी असतात. साधं असण्यासाठी जीवन कळावं लागतं. जीवन कळण्यासाठी माणसं वाचावी लागतात. कुठंतरी मळ्यात काम करणारा माणूस, कुठंतरी तळ्यात हरवणारा दलित आदिवासी, स्त्री ही फुल्यांना दिसत होती आणि जी आमची महान संस्कृती म्हणतो आम्ही. ज्या रोज आरत्या म्हणतो आम्ही की-भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. क-हाडमध्ये आमचं कुणी नाही.

आमच्या औरंगाबाद शहरामध्ये जातीय दंगली मोठ्या स्वरुपात होऊ लागलेल्या आहेत. मागच्या वर्षी झालेल्या दंगलीत आमच्याकडे शेकडो माणसे मेली. संचारबंदी उठल्यानंतर कॉलनी कॉलनीतील माणसं आपसात कुजबूजू लागायची. त्यात हिंदू होते. मुसलमान होते. हिंदू हिदूना विचारायचे 'दंगलीत आपली किती माणसं मेली' म्हणून. मुस्लीम मुस्लिमांना विचारायचे 'अपने कितने लोग मर गये' म्हणून. म्हणजे दंगलीत मरणारे हे लोक जिवंत होते तेव्हा यांचे कुणीच लागत नव्हते. मेल्यानंतर यांना शोध लागायचा ते आपल्या धर्मातील होते म्हणून. कोणत्याही जातीय दंगलीमध्ये फक्त गरीबच मरत असतात आणि गरीबांची गरीब हीच जात असते. गरीब हाच धर्म असतो. ही आमची पद्धत आहे. बोलायचा काय जातं तुमचं माझं. पण क-हाडमधल्या एखाद्या गरीब पोराला मदत करणं किंवा दलितांची झोपडी पेटली तर ती विझवायला धावून जाणं यासाठी जे मानसिक आणि सामाजिक धाडस लागतं ते आपल्यापैकी कितीजणाजवळ आहे.

जोतिराव फुल्यांनी अशा अनेक गोष्टी केल्या त्याची यादीही इतकी मोठी आहे. भारतातील पहिली मुलींची शाळा त्यांनी काढली, ती शाळा काढणारे पहिले भारतीय ते, आपल्या पत्नीला शिकवून तिला भारतातील पहिली स्त्री शिक्षिका केलं. बालहत्या प्रतिबंधक गृहातील परिचारिका म्हणून त्यांनी काम केलं. सावित्री बाई फुल्यांना एकदा जोतिराव फुल्यांनी विचारलं की "शाळा चालवायला तुला काही अडचण येते काय!" त्यांनी सांगीतल की, अडचण येते. भिडे यांच्या वाड्यात शाळा घ्यायला जाते तेव्हा पुण्याचे विशिष्ट लोक त्यांना कॉमेंटस् करायचे, शेण फेकून मारायचे. त्यांनी सांगितलं, त्यासाठी मला आणखी एक लुगडं पाहिजे. शाळेतजाऊन मी ते लुगडं बदलीन व मग मी मुलींच्या शाळेतील वर्ग घेईन.

आज आमच्या महाविद्यालयाच्यामध्ये, शाळांच्यामध्ये हजारो मुली शिकत आहेत. मी माझ्या विद्यार्थिनीना विचारतो नेहमी की, मुलीनो तुम्हाला सावित्रीबाई फुल्यांचे नांव माहिती आहे काय? मुली म्हणतात, त्या कवयित्री होत्या. मग मी विचारतो तुम्हाला जया भादुरी-जयाप्रदाचं नाव माहिती आहे काय? त्या हो म्हणतात. त्या आमच्या बहिणी आहेत.  आणि मेहुणा अमिताभ बच्चन ! महात्मा फुले माहीत नाहीत पण निळू फुले माहीत आहेत. माहीत असायला माझा विरोध नाही. आमचं शिक्षण पांढरपेशी वृत्तीतून आम्ही बाहेर  काढलेलं नाही. चातुर्वर्णीय प्रेरित अशा मुशीतच त्याला अजून ठेवलेलं आहे.

जे कुणी शिक्षक आहेत त्यांचंच प्रबोधन होण्यासाठी गरज आहे. जे कोणी लेखक आहेत त्यांचंही प्रबोधन होण्याची फार गरज आहे. पण आमच्याकडे असे विद्वान आहेत की ते समाजासाठी लिहित नाहीत. दुस-या विद्वानाला कळावं म्हणून लिहितात. तेवढं अवघड लिहितात. सोपं लिहीत नाहीत. सोपं लिहिलं तर विचारवंत कसले ! मी जरा अवघड बोललो तर तुम्ही म्हणाल? काय बा. ह. कल्याणकर बोलले ! बघा स्टॅंडर्ड बोलले ! दुसरा म्हणेल 'स्टॅंडर्ड बोलले पण काय बोलले ते कळलं नाही" तिसरा म्हणेल, 'कसं कळेल ते विचारवंत आहेत. तो असा बोलला पाहिजे की, आकाशातून बोलला पाहिजे. की एका विद्वानाने दुस-या विद्वानास कळावे असे बोलायचे जीवाच्या अज्ञानाचाच हा अवघडपणा परिणाम होय.

जोतिराव फुल्यांना या स्कॉंलरशिपची हाव नव्हती सबंध समाजाला कळलं पाहिजे म्हणून ते सगळे दु:ख समाजाच्या भाषेत मांडत होते. तु्म्ही त्याला कलात्मक मूल्ये लावा, लावू नका. त्यामुळं काही आडलं नाही. समाजाची समग्र पुनरचना झाला पाहिजे. समाजा हा अंधश्रध्देतून बाहेर पडला पाहिजे. त्याच्या पायातील रुढीचे साप संपले पाहिजेत. त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती रुढीच्या वाईट चालीरीतीच्या ज्या बेड्या आहेत त्या तुटल्या पाहिजेत. आणि एक मुक्त माणूस, एक सुंदर माणूस, एक नवा माणूस स्वत:च्या कर्तृत्वावर, स्वत:च्या पायावर, स्वत:च्या विवेक बुद्धीवर जगणारा एक छान माणूस निर्माण झाला पाहिजे. अशा समाजाचं एक सुंदर चित्र त्यांच्या डोक्यामध्ये होतं ते मी मघाशी तुम्हाला सांगितलं.