व्याख्यानमाला-१९८९-१८

जे जे गरजू आहेत त्यांना मदत मिळायला हवी. समाजाची गरज त्यांनी ओळखली . मी म्हणालो तत्त्ववेता असो, लेखक असो, कवी असो. कोणीही असो त्यांना समाजाची गरज कळली पाहिजे. त्यांच्यावर दुसरा एक आरोप होता की ते ख्रिश्चन धार्जिणे होते, ते मुस्लिम धार्जिणे होते. त्याचे उत्तर नवाकाळचे संपादक नीळकंठराव खाडिलकर यांनी फार छन दिलेलं आहे. खाडिलकरांनी सांगितलं की, जेव्हा जोतिराव फुले ख्रिश्चन धर्म चांगला म्हणायचे, मुस्लीम धर्म चांगला म्हणायचे याचे कारण तो चर्चेस सर्वांना खुला होता, मोकळा होता.

इथं तंस नाही, इथं वेदाचा शब्द ऐकला की, कानामध्ये तुम्ही तप्त शिसे ओतता. ब्राह्मण स्त्रीचा एका शुद्र माणसाशी विवाह झाल्याबरोबर तु्मही त्यांच्या मुलाला चांडाळ म्हणता, डोंब म्हणता. मग तुमच्यापेक्षा तो धर्म चांगला आहे. वधा एवढंच फुले म्हणाले. नीळकंठरावांनी सांगितलं, आई काय म्हणते ! आपल्या मुलाला रागावतांना, अरे तू कसला वेडा, हे बघ, शेजारचा रमेश कसा अभ्यास करतो. याचा अर्थ रमेशची ती बाजू घेते असा नाही. त्याचं जे चांगल आहे ते आपल्या मुलाला यावं म्हणून ती बोलते. फार छान उत्तर दिलंय त्यांनी? पण आमची मंडळी म्हणाली, ते ख्रिश्चन धार्जिणे होते, ते मुस्लिम धार्जिणे होते, ते इंग्रज धार्जिणे होते. जोतिराव फुल्यांनी सांगीतलं हे इंग्रज आज आहेत, उद्या जातील, पण या भटांच्या पासून दास्य मुक्तीसाठी तुम्ही इंग्रजी राजवटीतील फायदे घ्या, पण कायद्याचं राज्य ज्या इंग्रजांच आहे तिथंच तुमचा फायदा होईल, लवकर मुक्त व्हा.

माधवराव बागलांचं 'महाराष्ट्राचे शिल्पकार' नावाचं हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये माधवराव बागलांनी टिळकांबद्दल असं लिहिलंय की,  टिळक आजारी पडले आणि जर्जरावस्थेत जेव्हा ते होते तेव्हा ते त्यांच्या मित्राला असे म्हणाले. हा माधवराव बागलांचा विचार! मोठ्या माणसाचे नांव घेऊन सांगितले म्हणजे माझ्यासारख्या लहान माणसाचे काम सोपे होते. खरा विचार सांगतो. त्यांनी सांगीतला-मांडला म्हणून मी सांगतो तुम्हाला. टिळक असे म्हणाले, "खरंच पेशवाई पुन्हा येईल कां हो !" राष्ट्रवादाच्या प्रेरणा कोणत्या, कुणासाठी तुम्हाला स्वराज्य पाहिजे होतं. कुणासाठी तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे होत?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. इंग्रजांच्या हातून राज्य या देशातल्या मूठभर लोकांच्या हातात जात असेल तर ते स्वराज्य आम्हाला नको आहे. असं स्वराज्य आम्हाला पाहिजे आहे की, या देशातल्या प्रत्येक माणसाला वाटले पाहिजे की, माझं राज्य आहे. म्हणून राष्ट्रवादी चळवळीपासून फटकून ही दोन्ही माणसं वागली. वर्ण संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणा-या माणसापासून ती फटकून वागत होती. काँग्रेस संस्कृतीपासून सुद्धा फुले फटकून होते. जेव्हा काँग्रेसचे अधिवेशन झाले तेव्हा फुल्यांनी त्या शामियान्यासमोर, मंडपासमोर मोठा असा शेतक-याचा पुतळा उभा केला. त्याची अवस्था वर्णन करुन सांगितली की, तुमच्या काँग्रेसमध्ये हा जर माणूस नसेल तर काँग्रेस पाहिजे कशाला? हा सवाल विचारला.

ज्यांना संस्कृतीपासून तोडलेलं आहे., पण ज्याने संस्कृती निर्माण केली. कोणत्याही समाजाची संस्कृती लोक निर्माण करतात. यावर जोतिरावांचा विश्वास होता. आणि मग ते सतत बाजू घेतात शेतक-यांची, विधवांची, परित्यक्त्यांची. बाल विवाह थांबले पाहिजेत म्हणून सांगतात. विधवा विवाह स्वत: लावून देतात. नुसते व्यासपीठावर बोलत नाहीत आमच्यासारखे ते म्हणजे जोतिराव फुल्यांनी स्त्रियांची शाळा काढली, अस्पृश्य मुलांची शाळा काढली, विधवा विवाह लावून दिले, बाल विवाह थांबले पाहिजेत म्हणून चळवळी केल्या, लोकांना जागाविण्यासाठी पुस्तके लिहिली, लोक जागृती ( जागरण) हा त्यांचा हेतू होता. जोतिरावांनी 'दीनबंधू' हे वर्तमानपत्र काढलं, मुंबईला लोखंडे या मित्राच्या मदतीने कामगार संघटना काढली. ब्राह्मण विधवांचे केस तुम्ही कापू नका ( वपन करु नका ) म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला.

जोतिराव फुल्यांचे ब्राह्मण समाजावर फार मोठे उपकार आहेत. त्यांना मराठ्यांनी कधी समजून घेतलं नाही. ज्या पुरोहितशाहीला त्यांनी सुरुंग लावला त्यामुळे ब्राह्मणांचा फायदा झाला. पुरोहितशाही काय होती, गरीब ब्राह्मणं होती बिचारी, भिक्षुकीचा धंदा करायचा,जे काही मिळे त्यावर उदरनिर्वाह चालवायचा वाईट अवस्था होती त्यांचीसुद्धा. जोतिराव फुल्यांचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा तो समाजसुध्दा विचार करु लागला. ब्राह्मण परिषदा होऊ लागल्या.

जोतिराव फुले यांनी 'सत्यशोधक समाज' काढला चिपळूणकरांनी १८८८ ला ब्राह्मणसभा काढून जातीय संघटना काढण्याचं विष पेरलं त्यांनी आपली आत्मटीका सुरू केली. त्यांना पटलं ही पुरोहितशाही म्हणजे काय आहे. आज आहे उद्या नाही. चला आता जीवनाच्या नव्या नव्या क्षेत्रामध्ये पडू म्हणून ब्राह्मण समाजाचं प्रबोधन त्यांनी सुरू केलं, ब्राह्मण समाज विचार करु लागला. ब्राह्मण समाजाचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्टय असं आहे. तो समाज परिवर्तनाचं नवं वारं चटकन ओळखतो आणि परिवर्तनाच्या संबंध चळवळीबरोबर तो एकदम बदलून घेतो. स्वत:ला Renew करुन घेतो. इतर समाजाला हलवावे लागते.