व्याख्यानमाला-१९८९-११

पशुतुल्य कष्ट उपसणं हीच त्यांची संस्कृती होती. स्त्रिया, अस्पृश्य, शेतकरी आणि कष्टकरी समाज केवळ घाम गाळण्यासाठी जगत होता. घाम, अश्रू आणि शोषण हाच त्या समाजाचा हजारो वर्षांचा इतिहास होता. जोतिराव फुले आले आणि अज्ञानाच्या चाकावर धावणा-या अंधश्रद्ध इतिहासाला त्यांनी थांबविलं ते आले आणि रयतेच्या जीवनात तांबड फुटलं. त्यांनी भारतीय संस्कृतीच्या मक्तेदारांना ठणकावलं. वेद हे ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत. गुलामगिरीमध्ये ते म्हणतात.

"भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा  देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निपक्षपाती धर्माच्या आदराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात या सर्व गोष्टीविषयी 'म्या' एक लहानसे नाटक करुन सन १८१५ सालात दक्षिणा प्राईज कमिटीस अर्पण केले."

गुलामगिरीतच ते पुढे म्हणतात.

" कित्येक भटांनी चव्हाट्यातील मारुती सारख्या महावीराच्या देवूळी रात्री बसून मोठा धार्मिकपणाचा डौलू  घालून वरकांती ज्ञान सांगण्याचा भाव दाखवून आतून भागवतासारख्या ग्रंथातील खोट्यानाट्या गोष्टींचे पुरावे अज्ञानी शूद्रास सांगून त्यांची मने भ्रष्ट करुन त्यांनी त्या बळीच्या मतानुयायी लोकांच्या वा-यास देखील उभे राहू नये म्हणून उपदेश करुन उगीच तरी बसले ! नाही. पण त्यांनी संधी साधल्याबरोबर त्याच ग्रंथातील भाकडकथा सांगून एकंदर सर्व अज्ञानी लोकांच्या मनांत इंग्रजी राज्याचा द्वेष भरवून त्यांनी या देशात मोठमोठाली बंडे उपस्थित केली नाहीत काय?"

जोतिरावांनी ब्राह्मणप्रणीत ईश्वरशाहीला सुरुंग लावला. त्यांच्या लांडक्या लबाड्या चव्हाट्यावर आणल्या. ईश्वरशाहीच्या विरोधात त्यांच्या विचारांची निर्मिकशाही त्यांनी उभी केली. आणि सांगितलं, ईश्वर आणि माणसाच्यामध्ये दलालांची गरज नाही. ईश्वराला पर्यायी म्हणून निर्मिक हा शब्द त्यांनी वापरला. निर्मिक म्हणजेच निसर्ग आणि निसर्ग म्हणजे भौतिकवाद. ईश्वरशाहीच्या नांवानी हजारो वर्षे चालत आलेले वेदप्रामाण्य त्यांनी झुगारुन दिले. ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तात सांगितलं होत, ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मले. क्षत्रीय बाहूपासू जन्मले, वैश्य मांड्यापासून जन्मले, शूद्र हे पायापासून जन्मले, पंचम मात्र कुठून आले हे वेदकर्त्यांना अजून ठाऊक नाही. मनुष्यसमाजाविषयीचा सत्य विचार निर्भिडपणाने सांगणे हे जोतिरावांचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे. ब्रह्मदेव, विष्णू आणि अवतार कल्पना लोकांच्या डोक्यांत कोंबून त्यांच्या अज्ञानावर आपलं पोट चालवणं या बेछूट हिंदूशाहीवर जोतिरावांनी आपल्या तोफा डागल्या. शोषित समाजाला आपल्या जीवनांत उभे करण्यासाठी जोतिरावांना ज्ञान आणि शिक्षणातील समानसंधी हेच क्रांतीकारी श्स्त्र वाटत होतं. समाजाची अर्धी लोकसंख्या असलेल्या स्त्रिया, त्यांचा होणारा अमानुष छळ, स्त्रीदास्य आणि बाल विवाह, विधवा विवाहाला बंदी आणि मातृत्वाला शूद्रता प्रदान करणारी भ्रष्ट व्यवस्था इचा समूळ उच्छाद करण्यासाठी या शोषणाचं आणि अन्यायाचं मूळ जोतिरावांना सापडलं होतं. सत्य विचारावर आधारित नवा विचार, या नव्या विचाराचा विवेक बाळगणारा नवा माणूस जोतिरावांना ज्ञानाच्या चळवळीतून निर्माण करावयाचा होता. त्यांनी ब्राह्मणशाहीवर प्रहार करतांनाच ब्राह्मशाहीच्या अतिरेक झालेल्या पेशवाईतील अवकळेवरही प्रहार केले. इंग्रज भारतात आले आणि ब्राह्मण नोकरशाहीच्या मगरमिठीत भारतीय जनता सापडली. देशी आणि विदेशी शोषणकर्त्यांचं आक्रमण भारतीय जनतेवर सुरू झालं. या पार्श्वभूमीवर फुले म्हणतात -

"इंग्रज लोक आज आहेत, उद्या नाहीत. ते आपल्या जन्मास पुरतील म्हणून कोणाच्यानेही सांगवत नाही. यास्तव या लोकांचे राज्य या देशात आहे तोच सर्व शूद्रांनी जल्दी करुन भटांच्या दास्यत्वातून मुक्त व्हावे या मध्ये थोडा शहाणपणा आहे."