व्याख्यानमाला-१९८०-३७

महाराष्ट्रात सत्तेच विकेंद्रिकरण झाले; पण त्या विकेंद्रित सत्तेमध्ये दुर्बल समाजघटकांना सहभाग मिळाला नाही. महाराष्ट्रात सहकारी चळवळीचा आवाका वाढला; पण तिलाही एका विशिष्ट अशा मर्यादेपलिकडे जाता आले नाही. निवडणुकीच्या राजकारणात जे वरचढ ठरले त्यांनाच सहकाराच्या क्षेत्रात आपले पाय रोवता आले. ग्रामीण भागात नव श्रीमंतांचा एक वर्ग निर्माण झालेला दिसतो आहे. साखर कारखान्यांचा फायदा काही मोजक्या लोकांच्याच पदरात पडला. लहान शेतकरी व शेतमुजरांचे हात मात्र कोरडेच राहिले. दारिद्र्या रेषेच्या वर त्यांना येण्याची संधी मिळू शकली नाही. ज्यांना कसलीच मालमत्ता नाही, त्यांना पत नाही; आणि ज्यांना पत नाही त्यांना अशा प्रकारच्या कोणत्याही उत्पादन व्यवस्थेत स्थान नाही. ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं आहेत त्यांच्याच खिशात पैसा जाणार. ज्यांच्या जवळ केवळ दोन हात आणि दोन पाय या शिवाय दुसरे काहीच नाही त्यांच्या पदरात स्वतःच्या घामाशिवाय दुसरे काहीही पडू शकले नाही, ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आणि म्हणून ग्रामीण भागाचं नष्टचर्य संपवू इच्छिणारी सहकारी चळवळ शेतमजुरांच्या व दलितांच्या दारापर्यंत जाऊ शकली नाही. सहकारी चळवळ ही एक पर्यायी अर्थव्यवस्था या नात्याने आमच्या समोर उभी आहे. भ्रष्टाचाराने ती आज सडलेली दिसते. राजकारणाच्या हातातील सत्ता संपादनाचं शस्त्र न बनता समाज परिवर्तनाचं साधन तिला बनता आलं असतं तर महाराष्ट्रात आज एक वेगळंच चित्र दिसलं असतं. उत्पादन व्यवस्थेत सर्वांना स्थान दिल्याशिवाय आर्थिक व सामाजिक परिवर्तनाची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल सामान्य माणसाचं नागरिकत्व हीच त्याची पत असा विचार केल्याशिवाय या देशात मूलगामी असं आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणता येणार नाही. उद्याच्या राजकारणाला या विचाराचा पाठपुरावा करावा लागणार आहे.

मागच्या दशकापासून सबंध देशातील राजकारणाला एक अतिशय अनिष्ट दिशा प्राप्त झालेली आहे. लोकशाहीला विडंबनाचे स्वरूप त्यामुळे प्राप्त झालेले आहे. सत्तास्पर्धेच्या रिंगणात अडकलेल्या राजकारणी लोकांपासून देशहिताच्या विचारांची व कार्याची बूज कशी राखली जाणार? अशा अवस्थेत देशहितापेक्षा पक्षहित अधिक मानले जाते. आणि आज तर अशी अवस्था निर्माण झालेली आहे की पक्षनिष्ठा नावाची चीज नामशेष होत चाललेली आहे. मूल्यनिष्ठा संपली की देशनिष्ठा, समाजनिष्ठा व पक्षनिष्ठा या सर्वच निष्ठा संपतात. मूल्यहीन समाज जीवनात प्रामाणिपणाला जागा मिळू शकत नाही. आणि म्हणूनच गांधीजींच्या समाधी जवळ घेतलेल्या देशहिताच्या शपथा ह्या खोट्या ठरतात. लोकांच्या भावनेला साद घालण्यासाठी अशा शपथांचा उपयोग होत असेलही, नाही असे नाही. पण स्वतःची, लोकांची व पर्यायाने देशाची केलेली अशा प्रकारची फसवणूक लोकांच्या लक्षात आल्यावाचून राहात नाही. लोकसेवेसाठी पक्षनिष्ठा न सोडण्याचा संकल्प व निर्धार किती फसवा असतो याचा दुःखदायी अनुभवही आता लाकांच्या पदरात भरपूर प्रमाणात पडलेला आहे. पंढरपूरच्या शेजारी उभे राहून एखादा राजकीय पुढारी लोकांना आश्वासन देतो की मी माझा पक्ष कधीही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही; अठ्ठावीस युगांपासून उभा असलेला विठोबा आपल्या पायाखालची वीट सोडून दुसरीकडे एखादेवेळी कदाचित जाईल, पण मी माझा पक्ष सोडून दुसरीकडे कुठेही जाणार नाही. किती सखोल आहे ही पक्षनिष्ठा! पण ही भाषा वापरणारा स्वार्थांध राजकीय पुढारी चार-दोन दिवसांच्या आतच पक्षांतराची घोषणा करतो. देशहितासाठीच त्याला हे करावे लागते असा त्याचा दावा असतो. पक्षनिष्ठे पेक्षा देशहिताला अधिक प्राध्यान्य दिले पाहिजे आणि म्हणून मला हा पक्षांतराचा निर्णय घ्यावा लागला, असे तो कुठलीही चाड न बाळगता लोकांना सांगतो. शेवटी ज्या राजकीय पक्षाला जनताजनार्दनाने निवडून दिले आहे त्या पक्षाचा स्वीकार करणे म्हणजे जनताजनार्दनाच्या इच्छेचा आदर करणे होय, अशा शब्दात आपल्या कृत्याचे तो समर्थन करतो. अशा पुढा-यांच्या अनुयायांनी काय करावे? त्याच्या पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनी कोणती भूमिका घ्यावी? तेही शेवटी आपल्या नेत्यांच्य पावलावर पाय ठेवून त्यांच्या मागे जातात. किंवा हतबल होऊन दुःखाचे सुस्कारे टाकतात. दुसरे करणार तरी काय?