व्याख्यानमाला-१९८०-३५

महाराष्ट्रामध्ये या ज्या घटना किंवा घडामोडी घड्या त्या लक्षात घेतल्या तर शासनाने “सुधारकी” भूमिका अवलंबिली आहे असे म्हणावे लागेल. लोककल्याणवादी राजकीय तत्वज्ञानाचा स्वीकार भारतीय राज्य घटनेने केल्यामुळे ही भूमिका शासनाला पार पाडणे आवश्यक आहेच.

पण मित्रहो, स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देशात जे काही भलेबुरे घडले व घडत आहे त्याला महाराष्ट्रात तरी कसा अपवाद असू शकेल! भल्यबरोबर तसे बरेच बुरेही घडले आहे आणि घडत आहे हे सांगण्याची गरज मात्र आहे. आज आपला देश एका अतिशय विदारक व चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. त्या विदारक व चिंताजनक परिस्थितीला कोण जबाबदार आहे? ती परिस्थिती कुणी निर्माण केली? सत्ताधारी नेत्यांनी? राजकीय पक्षांनी? की लोकांनीच? आम्ही स्वीकारलेल्या लोकशाहीच्या अंगभूत दोषातून तर ती परिस्थिती निर्माण झाली नाही ना? या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. ज्या लोकशाहीचा आम्ही मोठ्या अपेक्षेने अंगीकार केला तिला विकृत स्वरूप मात्र निश्चित प्राप्त झालेले आहे. स्वतःच्या अंगभूत दोषातून ती एवढी विकृत कशी बनू शकेल? लोकशाही राज्यव्यवस्था चालवण्यासाठी देखील शेवटी सत्ताच वापर करावा लागतो. राजकीय सत्ता ही वारांगने सारखी असते. लोकशाहीच्या शील व सालिनतेला डाग लावण्याचा ती प्रयत्न करीत असते, हेही नाकबूल करण्यात अर्थ नाही. सत्तेच्या मोहपाशात अडकून आपले शील सांभाळण्याचा प्रयत्न तिला सातत्याने करता आला तर ती सामान्य लोकांच्या मनात स्वतःच्या पृथ्गात्म व्यक्तिमत्वाची प्रतिमा निर्माण करू शकते. पण लोकशाहीचा मार्ग हा देखील घसरणावरचा मार्ग आहे. तिला घसरणीवर चालावे लागते. पापणी विचलित झाली की पाय घसरतो. जगातील इतर लोकशाही राष्ट्रांमध्ये हा प्रकार घडलेला आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये निश्चितच काही अंगभूत दोष आपल्याला सापडतात. कदाचित यामुळेच इ. एम. फॉस्टर नावाच्या एका सुप्रसिद्ध इंग्रज लेखकाने लोकशाहीचा तीन ऐवजी दोनदाच जयजयकार (cheers) केला आहे. तीन जयजयकारास ती पात्र नाही, असे ह्या विचारवंताचे प्रामाणिक मत आहे. निर्दोष, बलशाही व सर्वोत्तम अशा राज्यव्यवस्थेला हा विचारवंत “प्रिय प्रजासत्ताक” (Beloved Republic) या नावाने संबोधतो. पण लोकशाही ही “प्रिय प्रजासत्ताक” होऊ शकत नीही. स्वभावतःच तिच्या अंगी काही दोष व दुर्बलता आपल्याला दिसते. तरी पण ती इतर राज्यव्यवस्थेपेक्षा अधिक चांगली व स्वीकारार्ह आहे. तिचे हे गुणदोष लक्षात घेवून चर्चील असं म्हणाला होता की, “लोकशाही ही निकृष्ट राज्यव्यवस्था आहे; पण तिच्या पेक्षा अधिक उत्कृष्ट शासनव्यवस्था अद्यापी आपल्याला सापडू शकलेली नाही.” लोकशाही शासनव्यवस्था व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि सर्वसामान्य लोकांना सत्तेत सहभागी होण्याची संधी प्राप्त करून देते. समाजजीवनातील विविधतेचा ती आविष्कार करते. तिच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्याचे ती लोकांना देते. ह्या सर्व गोष्टी इतर शासन व्यवस्थेला मंजूर नाहीत. म्हणून लोकशाही शासनव्यवस्था चांगली व स्वीकारार्ह आहे. “प्रिय प्रजासत्ताक” राज्याच्या आदर्श संकल्पनेला जे अभिप्रेत आहे ते कदाचित तिच्याद्वारे अभिव्यक्त होत नसेल. तिच्या अंगभूत दोषांमुळे कदाचित तिच्या हातून काही प्रमाद घडतही असती. “So two cheers for Democracy: one because it admits variety and two because it permits criticism. Two cheers are quite enough: there is no occasion to give three. Only Love the Beloved Republic deserves that.” फॉस्टरचे हे शब्द अतिशय अर्थपूर्ण आहेत.

परंतु आमच्या लोकशाहीला आज जे अतिशय भ्रष्ट व विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे ते तिच्या अंगभूत दोषांमुळे किंवा स्वाभाविक दुर्बलतेमुळे नव्हे. सत्तापिपासू, स्वार्थांध व भ्रष्ट राजकारणामुळे ते स्वरूप तिला प्राप्त झाले आहे. आणि म्हणून भारतीय लोकशाही two cheers साठी देखील पात्र राहिलेली नाही. One cheer for you, Democracy असे मी म्हणेन. तिची विक्री विकृती अशीच चालू राहिली तर एकाही जयजयकारासाठी पात्र राहणार नाही. तिला अभिशापित करण्याचे प्रयत्न थांबवले पाहिजेत.