व्याख्यानमाला-१९८०-३२

ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना आर्थिक न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने कुळकायदा आणि जमीनधारणेचा कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक होते. “कसेल त्याची जमीन” हे घोषवाक्य स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात देखील आम्ही कंठरवाने उच्चारित होतो. थोड्या बहुत फरकाने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या तिन्हीही विभागांमध्ये अंमलात आला. सामाजिक व आर्थिक परिवर्तनाच्या दिशेतील हे एका दृष्टीने क्रांतीकारक पाऊल होते. जमीनमालकी संबंधीची परंपरेने चालत आलेली जी संकल्पना जनमानसात रूजलेली होती तिलाच या कायद्याने धक्का दिला, प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्राला कुळकायद्याने एक नवीन मानसिकता दिली यात वादच नाही, “कसेल त्याची जमीन” या तत्वावर आधारलेल्या शासनाच्या धोरणाने आर्थिक स्वातंत्र्यासाठी आवश्यक असणारी मनोभूमिका तयार केली. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळताच नवनिर्मितीचे चैतन्ययुक्त वारे वाहू लागले. आमच्या स्वातंत्र्याला सुराज्याचे डोहाळे लागले. त्यामुळे सामाजिक व आर्थिक पुनर्रचनेच्या दिशेत वाटचाल सुरू झाली हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. जमीन धारणेच्या कायद्याने अतिरिक्त जमीन भूमिहीनांच्या पदरात टाकण्याची सोय निर्माण केली. महाराष्ट्रात अतिरिक्त जमी अधिक नव्हती. थोडीशी जमीन भूमिहीन लोकांच्या व दलितांच्या पदरात पडली. पण त्यामुळे आर्थिक प्रश्न पूर्णतः सुटणे शक्य नव्हते. या कायद्याने नवीन जाणीव मात्र जनमानसात निर्मिली हे मला येथे अभिप्रेत आहे.

सामाजिक आणि आर्थिक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात झालेल्या शिक्षण प्रसाराकडे आपण पाहिले पाहिजे. या संदर्भात शिक्षण प्रसाराला मी महत्व देतो. सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने शिक्षणाला प्राथमिकता द्यावीच लागेल. शिक्षण ही समाजाला नवीन दृष्टी देणारी आणि त्याला पुढे घेवून जाणारी प्रभावी शक्ती असते. त्या शक्तीची पूजा बांधण्याचा अधिकार आणि अवसर आमच्या समाजव्यवस्थेतील सर्व जातींच्या लोकांना पूर्णतः नव्हती ही वस्तुस्थिती आहे. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शिक्षणाची संधी ग्रामीण भागातील जनतेलाही मिळाली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन ती पोचावी म्हणून स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वीही काही ध्येयवादी मंडळींनी प्रयत्न आरंभिले होते. ज्या ज्या व्यक्तींनी अशा एकारचे प्रयत्न ग्रामीण महाराष्ट्रात केले त्यात कर्मवीर भाऊराव पाटलांचा क्रम अगदी वरचा आहे. आणि म्हणूनच त्यांची आठवण मी आपल्याला करून देऊ इच्छितो. सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने कर्मवीर आण्णांचे कार्य क्रांतीकारी स्वरूपाचे होते.

“समाज परिवर्तनासाठी शिक्षण” हे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक तत्वज्ञानातील एक महत्वाचे सू होते. या सूत्राचे सातत्याने ध्यान ठेवून शिक्षण प्रसारासाठी त्यांनी समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर प्रयत्न केले. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातले ते भगीरथ होते. असे मी म्हणालो तर त्यात कसलीही अतिशयोक्ती होणार नाही. रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी अतिशय व्यापक अशा सामाजिक तत्वज्ञानाच्या आधारे केली. आणि म्हणून त्यांच्या शैक्षणिक कार्याला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्याम बनता आले. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात कर्मवीरांनी ज्ञानाचा वटवृक्ष लावला व वाढविला. तो जो डेरेदारपणे वाढला व डंवराल त्याचे कारण असे की त्याच्या मुळ्या भोवतालच्या जमीनीत सर्वबाजुंनी अगदी खोलवर गेल्या. एखाद्या वृक्षाच्या मुळ्या सर्व बाजूंनी व खोलवर गेल्या की त्याची उंची अधिक वाढते, त्याच्या फांद्या सर्व बाजूंनी चांगल्या प्रकारे वाढतात. कर्मवीर आण्णांनी लावलेल्या ज्ञानांच्या वटवृक्षाच्या मुळ्या सर्व जातींच्या जीवनात वाढल्या. इतकेच नव्हे तर त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटून त्याही बहुजन समाजाच्या जीवनात खोलवर गेल्या. त्यांच्या शैक्षणिक कार्याला जी आशयगर्भता मिळाली ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही संकुचित जातीय अस्मितेला प्रोत्साहन न देता, कुठल्याही जातीय अभिनिवेशाला न कुरवाळता, आण्णांनी रयत शिक्षण संस्थेची जोपासना केली. या शिक्षण संसथेचा व्याप लक्षा घेतला तर आपण स्तिमित होऊन जाऊ. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात बहुजन समाजाचे जे नेतृत्व उदयाला आले त्याच्यामागे कर्मवीर भाऊराव पाटलांचे परिश्रण उभे आहेत हे आपण कृतज्ञपूर्वक मान्य करणे आवश्यक आहे. कर्मवीरांनी बहुजन समाजाला शिक्षणा बरोबर स्वालंबनाची व सामाजिक जाणीवांची प्रेरणा दिली. “कमवा व शिका” ही प्रेरणा त्यांचीच. त्यांच्या संस्थेत अनेकांनी खडी फोडीन, शेतीत काम करून शिक्षण घेतले. महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात तो एक अभिनव प्रयोग होता. ज्ञानाला कामधेनू मानण्याची महाराष्ट्रात जुनी परंपरा आहे. शिक्षणामुळे आमचे सर्वच प्रश्न सुटतील असे समजणे चुकीचे ठरेल. महाराष्ट्रातील शिक्षण प्रसारामुळे आमचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सुटू शकलेले नाहीत असे असले तरी शिक्षण हे मूल्यपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे हे मान्य करावेच लागेल. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ही बाब लक्षात घेवून शिक्षण प्रसाराचे प्रचंड कार्य महाराष्ट्रात उभे केले. आणि म्हणून त्यांच्या सहवासात राहून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या समाजाशी असणारी नाळ तोडली नाही. राजकीय लोकशाहीला सामाजिक आशय देण्याच्या कार्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.