व्याख्यानमाला-१९८०-३४

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या लाखो अनुयायांनी केलेल्या धर्मांतराविषयी मी मघाशी बोललोच आहे. दलितांचे धर्मांतर प्रामुख्याने महार समाजाचे धर्मांतर हे राजकीय व सामाजिक या दोन्हीही दृष्टीने दूरवचे परिणाम करणारे होते यात शंका नाही.

मित्रहो, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे विविध विभागात किंवा राज्यात विभागलेलेल्या किंवा विखुरलेल्या मराठी भाषिक लोकांना एकत्रित येता आले. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही मराठी भाषिकांच्या जीवनात स्वप्नपूर्तीचा आनंद देणारी गोष्ट होती. त्यासाठी संघर्षही कराव लागला. त्यासाठी कटुताही निर्माण झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा काळ हा यशवंतरावांच्या नेतृत्वाच्या कसोटीचा काळ होता. द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी अतिशय संयत व संतुलित मनाने या प्रश्नाला तोडं दिले. काकासाहेब गाडगीळ, आचार्य प्र. के. अत्रे, एस्. एम्. जोशी, सेनापती बापट, भाई माधवराव बागल, ना. ग. गोरे, क्रांतीसिंह नाना पाटील, दाजीबा देसाई, उद्धवराव पाटील आदी व्यक्तींचे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान आहे. मराठी भाषिकांच्या एकात्म भावनेला उजाळा देणारी ही घटना होती. “माझी मराठी, मराठाच मीही” अशा प्रकारची भावनिक एकता व भाषिक अस्मिता या घटनेने महाराष्ट्रीय जनतेच्या मनात निर्माण केली होती.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर येथील राजकीय सामाजिक व आर्थिक जीवनाला नव्या दिशा दाखविणा-या ज्या इतर घटना घडल्या त्यामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण व सहकारी चळवळ या दोन घटनांचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बहुजन समाजाच्या हातात सत्ता आली. शिक्षणाचा प्रसारही ग्रामीण भागात होऊ लागला. सत्तेचे विकेंद्रिकरण होताच ग्रामीम नेतृत्वाला अधिक संधी प्राप्त झाली. विकेंद्रिकरणाचा प्रयोग हा लोकशाहीच्या कक्षा रुंदावण्याचा आणि त्याची क्षितीजे विस्तारण्याचा प्रयोग होता. या प्रयोगाने महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला पुढे जाण्याची संधी तर दिलीच पण त्याचबरोबर तिच्या समोर त्याने काही आव्हानेही उभी केली. लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रश्नांची उकल आणि सोडवणूक ही त्या त्या स्तरांवर होणे आवश्यक असते. त्या त्या स्तरांवर नेतृत्व निर्माण झाले तर लोकविकासाची कामे अधिक वेगाने सुटतील हा या विकेंद्रित लोकशाहीच्या मागचा हेतू असतो. तो कार्यान्वित करण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदा त्यामुळे अस्तित्वात आल्या. लोकजीवनाला स्पर्श करणारी ही घटना होती असे मत आहे.

सहकारी चळवळीचा अवलंब केल्यानंतर आजच्या विकेंद्रित लोकशाहीला ग्रामीण भागात एक वेगळीच गतिमानता प्राप्त झाली. आमच्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी चळवळीला एक विशेष व स्वायत्त स्थान प्राप्त झालेले आहे. सहकारी चळवळ ही एक नवीन जीवन मार्ग निर्माण करणारी चळवळ आहे. परस्पर सहकार्यातून स्वावलंबनाकडे घेऊन जाणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्हा सहकारी बँकांनी आणि जिल्हा सहकारी भूविकास बँकांनी शेती विकासासाठी कर्ज पुरवठा केल्यामुळे ग्रामीण भागात आर्थिक व पर्यायाने सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला गती मिळू लागली. जलसिंचनाच्या व वीज पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे व वाढल्यामुळे ऊसासारखे व्यापारी पीक शेतक-यांना घेता आले. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांची उभारणी ग्रामीण महाराष्ट्रात करता आली. आणि आज सहकारी साखर कारखानदारी आमच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे एक व्यवच्छेदक लक्षण बनली आहे. वस्तुतः आज सहकारी साखर कारखाने हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तास्थानांचे कार्य करीत आहेत. दबाब गटांचे कार्य करण्याच्या कामी ते गुंतलेले आढळतात. सत्तास्पर्धेच्या कामी त्यांचा उपयोग होऊ लागलेला आहे. कारखानदारी ही काय चीच असते याचा प्रत्यय ग्रामीण महाराष्ट्राला साखर कारखान्यांच्या उभारणीने पहिल्यांदाच आणून दिली ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.