ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य त्यांनी एका “क्रूसेडर” (crusader) च्या भूमिकेतून केले. म्हणूनच त्याला एका अभियानाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व करारी व विचार क्रांतीकारी होते. महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज ही त्यांची कुलदैवते होती. महात्मा गांधीच्या विचारांशीही त्यांनी भावनिक नाते जोडले होतो. शिक्षणावर त्यांनी श्रमसंस्कार केले. शिक्षणशास्त्रच त्यांनी निढळाच्या घामात भिजविले. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य हे सामाजिक समता व समभावाचे वक्तृत्वपूर्ण प्रकटन होते असे माझे प्रामाणिक मत आहे. अशा प्रकारचे शिक्षणच व्यक्तीचे व समाजाचे भाग्य घडवू शकते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. या प्रसंगी मला यशवंतरावजींच्या एका आशययुक्त वाक्याची आठवण होते. मागच्या ऑक्टोबरमध्ये आमच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या नवीन वास्तूचा कोनशिला समारंभ त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. त्या प्रसंगी त्यांनी माझ्या विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणातील ते विशिष्ठ वाक्य मला या ठिकाणी आठवते. ते म्हणाले; “शिक्षण हे एखादा माणूस जन्मण्यापूर्वीच त्याची कुंडली मांडित असेत.” फार गहिरा आशय त्यांनी या वाक्यातून व्यक्त केला आहे. ज्या प्रकारचे शिक्षण आपण एखाद्या व्यक्तीला देऊ त्या प्रकारचे भाग्य त्याला लाभते. कर्मवीर आण्णांनी सामाजिक मूल्यसंपन्न शिक्षणाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राची, बहुजन समाजाची कुंडली मांडली आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. शिक्षणाला त्यांनी दिलेला सामाजिक आश आपण दुर्लक्षिला तर महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाचे कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही.
कर्मवीर भाऊराव पाटलासारखा ध्येयवाद उरी बाळगून विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुखांनी शिक्षण प्रसाराचे कार्य केले. सामाजिक परिवर्तनाचे माध्यम म्हणून त्यांनी शिक्षणाकडे पाहिले. व्यावसायिक शिक्षणाचे महत्वही पंजाबरावांनी ओळखले होते. शिवाजी शिक्षण संस्थेचा कार्यभार लक्षात घेतला तर पंजाबराव देशमुखांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचे महत्व आपल्याला कळेल.
शिक्षण प्रसाराला आपले जीवितकार्य मानून समर्पणाच्या भावनेने काम करणारे फारच कमी लोक आपल्याला सापडतील. मामासाहेब जगदाळे यांचा अपवाद सोडला तर आज असा व्यक्ती क्वचितच आपल्याला महाराष्ट्रात आढळतील.
मराठवाड्याला मात्र कर्मवीर भाऊराव पाटलासारखा किंवा डॉ. पंजाबराव देशमुखासारखा शिक्षण महर्षी मिळू शकला नाही. निजामी राजवटीच्या पंजात सातशे वर्षापर्यंत सापडलेल्या मराठवाड्याचा सांस्कृतिक विकास फारसा होऊ शकला नाही. राष्ट्रीय भावना जनमानसात रुजविण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी शाळा काढून शिक्षण प्रसाराची नांदी घातली. पण हैद्राबाद संस्थान स्वतंत्र होईपर्यंत शिक्षण प्रसाराच्या कार्याला गती मिळू शकली नाही ही वस्तुस्थिती आहे. हैद्राबाद संस्थान स्वतंत्र होण्यापूर्वी शिक्षण प्रसाराचा जो काही प्रयत्न मराठवाड्यात झाला तो नगण्या स्वरूपाचा होता. महाराष्ट्रात मराठवाडा विलिन झाल्यानंतर मात्र सर्वच स्तरावरील शिक्षण भूमितिक वेगाने वाढले. मराठवाड्याचा शैक्षणिक पसारा आज ब-याच मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसेल.
महाराष्ट्र शासनाचे शैक्षणिक धोरणही पूर्वीपासून शिक्षण प्रसाराला प्रोत्साहन देणारे राहिले आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला शैक्षणिक शूल्काची पूर्ण सवलत शासनाने देण्याचे धोरण अवलंबिल्यापासून शिक्षण प्रसाराला खूप वाव मिळाला. मागास वर्गाला शिष्यवृत्या देण्याचे धोरण अवलंबिल्यामुळे दलितांना सामाजिक न्याय तर मिळालाच पण शिक्षणाचा फायदाही चांगल्या प्रकारे त्यांना घेता आला. दलित वर्गामध्ये शिक्षणामुळे जागृती निरमाण झाली. महाराष्ट्रात झालेल्या शिक्षण प्रसारामुले प्रत्यक्षतः किंवा अप्रत्यक्षतः आमच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक जीवनावर परिणाम झाला हे नाकबूल करता येत नाही.