व्याख्यानमाला-१९८०-२८

मित्रहो, ज्यावेळी गांधीजींच्या आदर्शवादी नेतृत्वाचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनावर पडत होता त्याच वेळी डॉ. आंबेडकरांचे वास्तववादी विचार संघर्षमय समाजजीवनाचे सर्जन करण्यात गुंतले होते; आणि त्याच बरोबर ते सामाजिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा आविष्कार करीत होते. या गोष्टीचा उल्लेख मी कालच्या भाषणात केलाच आहे. आंबेडकरांचे मन भ्रमनिरास करणा-या कोणत्याही स्वप्नवादात फार काळ अडकून पडले नाही. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर जे भेसूर वास्तव आमच्या समोर “आ” वासून उभे राहिले त्याची कल्पना बाबासाहेबांना होती. आंबेडकरांचा पींड कुठल्याही स्वप्नरंजनात अडकणारा नव्हता. त्यांचे मन कुठल्याही युटोपियाच्या (utopia) प्रदेशात भटकणारे नव्हते. या देशाला Promised Land बनविण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवट पर्यंत प्रयत्न केले, यात शंका नाही. पण स्वप्नरंजनात ते कधीही बंदिस्त झाले नाहीत. वास्तविक हिंदुधर्माने व संस्कतीने भारतीय दलितांना व पददलितांना स्वप्ने पाहण्याची संधी कधीही दिली नाही. त्यंचे जीवन म्हणजे पिढ्यानपिढ्यांचे एक प्रदीर्घ दारूण दुःस्वप्नाशिवाय दुसरे काय पडणार होते? ज्यांचे माणुसपणच नाकारण्यात आले त्यंच्या वाट्याला अमानुषते शिवाय दुसरे काहीही येणे शक्य नव्हते. “हा माझा देश आहे” आणि “ ही माझी संस्कृती आहे” असा प्रकारची भाषा- अभिमानाने आणि आत्मविश्वासाने वापरण्याची संधी या देशातील पददलितांना मिळू शकली नाही ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. हिंदु समाज हा एक बंद समाज आहे. It is indeed a closed society.  आणि या बंद समाजाच्या तळातल्या अंधारी कप्प्यात अस्पृश्यांना राहावे लागले. त्या अंधारी कप्प्यात जाण्यासाठी थोड्याबहुत प्रकाश किरणां लहानसा झरोखा सापडलाही असेल. पण तो अंधारी कप्पा सोडून दुस-या चांगल्या कप्प्यात आजही दलितांना जाता आलेले नाही, ही देखील एक वस्तुस्थिती आहे. आहे त्या ठिकाणीच दलितांचे पुनर्वसन करण्याचे थातूरमातूर प्रयत्न होत आहेत.

या बंद समाजाला खुल्या समाजाचे रूप देण्याचा क्रांतीकारी प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरंभिला होता. प्रॉमिथिअस प्रमाणे त्यांनीही क्रांतीकारी विचारांचा शोध घेतला, स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जिथे सापडतील तिथून आणण्याचा प्रयत्न केला. खरेतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रॉमिथिअसच्याच शोधात होते. भारतीय इतिहासाच्या पृष्ठांवर एखाद्या तरी प्रॉमिथिअसची सावली पडलेली सापडते का याचा शोध त्यांनी घेतला. पंख कापलेल्या काही प्रॉमिथिअसच्या प्रतिमा त्यांना भारताच्या इतिहासात आढळल्या. बुद्ध, कबीर आणि फुल्यांच्या क्रांतीकारी विचारात मात्र त्यांना प्रॉमिथिअसच्या शोधात स्पष्ट व पूर्ण प्रतिमा सापडल्या. आणि एका सुरम्य सकाळी प्रॉमिथिअसच्या शोधात एकाकी निघालेला हा कृतीशील विचारवंत स्वतःच या शतकातला एक महान क्रांतीकारी प्रॉमिथिअस बनून भारतीय समाजासमोर निखारे उधळीत उभा ठाकला. धर्मांतराची घोषणा ही एका प्रॉमिथिअसचीच झेप होती हे मी आपणास सांगू इच्छितो. महात्मा गांधी हे भारतीय अस्पृश्यांचे नेतृत्व करीत होते. त्यांचे दालित्य त्यांना घालवायचे होते यात शंका नाही. पण ते एका विशिष्ठ मर्यादेपलिकडे जाऊ शकले नाहीत. या गोष्टीची विस्तारपूर्वक चर्चा वेळेअभावी मी या ठिकाणी करून शकणार नाही. आंबेडकरांनी मात्र दलित व बहिष्कृत भारताला एक पर्यायी नेतृत्व दिले. वास्तविक आंबेडकरांनी दिलेल्या या “पर्यायी” नेतृत्वाला पुढे कुठलाही ‘पर्याय’ उरला नाही. त्यांच्या नेतृत्वाने गांधीजींच्या नेतृत्वालाच आव्हान दिले. सबंध हिंदुसमाजा समोरच आंबेडकर हे एख आव्हान बनून राहिले.

१९३५ साली बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. पण प्रत्यक्ष धर्मांतर मात्र त्यांनी १९५६ साली केले. धर्मांतर करण्यासाठी त्यांनी वीस-एकवीस वर्षांचा विलंब का लावला? इतर धर्मांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना एवढ्या कालावधीची आवश्यकता होती म्हणून त्यांनी हा विलंब लावला का? बुद्धांच्या तत्वज्ञानाने त्यांना त्याचवेळी झपाटले होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. १९३५ साली जरी त्यांनी धर्मांतर केले असते तरी लाखो अस्पृश्यांनी त्यांना साथ दिली असती. त्यांच्या बरोबर त्यांनीही तितक्याच उत्कट श्रद्धेने धर्मांतर केले असते. पण बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा करूनही अनेक वर्षांच्या कालावधीपर्यंत धर्मांतर केले नाही. या मागची कारणमीमांसा आपण शोधली पाहिजे.