व्याख्यानमाला-१९७९-४

त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोंगलाशी लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजकीय क्रांतीबरोबरच महाराजांना सामाजिक क्रांतीची दृष्टी होती, याची चुणूक दाखविणा-या काही घटना महाराजांच्या चरित्रात आपणाला दिसून येतात. दुर्दैवाने शिवाजी महाराज वयाच्या ५० व्या वर्षी दिवंगत झाले.  सगळी ह्यात आदिलशाही, निजामशाही आणि मोगलाई यांच्या विरुद्ध लढण्यात गेल्याने समाजकारणाकडे त्यांना फारसे लक्ष देता आले नाही. परंतु तशाही प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेल्या २।३ गोष्टी सामाजिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या आहेत. फलटणचे बजाजी निंबाळकर आणि महाराजांचा सेनापती नेताजी पालकर या दोन पराक्रमी पुरुषांना मोगलांसी सक्तीनं धर्मांतर करावयास लावलं होतं या दोन्ही लोकांना महाराजांनी परत हिंदूधर्मात घेतले आणि बजाजी निंबाळकरांच्या मुलाला आपली मुलगी देऊन रक्तामासाची नाती जोडण्यास महाराजांनी मागे पुढे पाहिले नाही. नेताजी पालकर याला औरंगजेब बादशहाने महमद कुलीखान हे नाव दिले होते आणि त्याला अफगणिस्थान जिंकण्यासाठी उत्तरेकडे पाठविले होते. या पराक्रमी पुरुषाने काबूल, कंदाहार जिंकून बादशहाच्या मुलखात सामीलही केले होते. नतंर त्याला औरंगजेब बादशहाने दिलेरखानाबरोबर महाराष्ट्र जिंकण्यासाठी पाठविले. महाराष्ट्रात आल्यानंतर इथले डोंगर, इथल्या द-या, इथल्या नद्या हे पाहून त्याला पश्याताप झाला आणि आपण महाराजांची पूर्ववत सेवा करावी म्हणून तो दिलेरखानाच्या छावणीतून महाराजांना भेटण्यासाठी गेला. महाराजांनी त्याला उपाशी कवटाळून धरलं आणि परत हिंदू धर्मात घेतलं. बजाजी निंबळाकर व नेताजी पालकर यांना परत हिंदुधर्मात घेण्याची जी गोष्ट महाराजांनी केली त्यांत त्यांची सामाजिक दृष्टीच व्यक्त होते हे आपल्याला विसरता येणार नाही. आणखी दोन गोष्टी छ. शिवाजी महाराजांनी केल्या. मराठी भाषेवर आधीच्या तीनही शतकांत बहामनी राज्याच्या स्थापनेपासून फारशीभाषेचा पगडा फार मोठ्या प्रमाणात बसला होता तो नाहीसा करण्यासाठी त्यांनी अमात्य रघुनाथपंथ हणमंते यांचेकडून "राज्यव्यवहारकोश" लिहून घेतला. त्या प्रमाणेच महाराजांनी पोर्तृगीजांचेपासून एक छापखानाही विकत घेतला होता. त्या छापखान्याचा निश्चितपणे काहीतरी उपयोग करावा ही महाराजांची मनीषा होती. महाराज जर अधिक काळ जगले असते तर त्यांच्या ह्यातीतच मराठी ग्रंथ छपाईला सुरुवात झाली असती. इ.स. १८०५ साली पहिले मराठी पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या ऐवजी ते महाराजांचे कारकीर्दींतच झाले असते. महाराजांच्या मृत्युनंतर १५० वर्षांनी पेशव्यांची सत्ता संपुष्टात आली. इंग्रजांचा बावटा शनिवारवाड्यावर चढला. इंग्रजांशी संबंध आल्यानंतर पौर्वात्य संस्कृती आणि पश्तिमात्य संस्कृती यांचा एक प्रकारे संघर्षही सुरु झाला. आणि सहकार्यही सुरू झाले. हिंदी लोकांना इंग्रजीभाषेतून पाशच्यात्य पद्धतीचे शिक्षण देण्याचा निर्णय लॉर्ड मेकॉले आणि माऊंट स्टुअर्ट एलफिनस्टन यांनी घेतला आणि इथून पुढेच भारतातील सामाजिक क्रांतीला सुरुवात झाली. इंग्रजी शिक्षणाची संबंध आल्यामुळे इंग्रजांची राज्यपद्धती, इंग्रजांच्या लोकशाहीच्या कल्पना, इंग्रजांच्या राजकीय व सामाजिक संघटनात्मक संस्था, लेखन स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य वगैरे नव्यानव्या कल्पनांचा एत्तदेशीय लोकांना परिचय होऊ लागला. या परिचयातूनच स्थानिक लोकांनी ब्रिटीश परिचय होऊ लागला. या परिचयातूनच स्थानिक लोकांनी ब्रिटीश सरकारचा अनुग्रह घेत आपल्या संस्था वाढवायला सुरुवात केली.

आपला धर्म म्हणजे पवित्रधर्म, आपल्या धर्मामध्ये काहीही न्यून नाही अशी त्या वेळच्या लोकांची ठाम कल्पना होती. कदाचित वेद आणि वेदांत यांच्या मधला धर्म आणि तत्त्वज्ञान चांगलेही असू शकेल. परंतू प्रत्यक्षात जो धर्म आचरला जात होता त्या मध्ये कर्मकांडाचे स्तोम फार मोठ्या प्रमाणात होतं. जप, तप, उपास, तापास व्रतवैकल्यं या मधेच सर्वं सामान्य माणूस पूर्णपण बुडालेला होता. समुद्रपर्यटन करणे हे पापात गणलं जात होतं. एकवेळची आणखी भारतीय संस्कृती दक्षिणेत जावा-सुमात्रा पर्यंत उत्तरेत, मध्य आशियातील उझबेगिस्थान पर्यंत आणि आग्नेय आशियात जिथं आज युद्ध चाललेलं आहे. त्या व्हिएनाम, लाओस, कंबोडिया, सयाम व अतिपूर्वेकडे चीन आणि जपान वगैरे राष्ट्रांत पसरलेली होती. या सर्वभागांत बुद्धभिक्षू चालत गेलेले होते. समुद्र पर्यटन करुन गेलेले होते. अशा प्रकारे ही भारतीय संस्कृती मोठ्या वैभवाने दशदिशांना पसरत असतानाच महाराष्ट्रातील स्थानिक कूपमंडुकवृत्तीची मंडळी समुद्र पर्यटन करणें हा गुन्हा आहे, हे पाप आहे आणि याबद्दल प्रायश्चित घेतले पाहिजे अशा प्रकारची दुराग्रही वृत्ती दाखवित होती. सुदैवाने छत्रपती शिवाजी महाराजांनी असल्या मनोवृत्तीला मुळीच भीक घातली नव्हती. १५ व्या शतकापर्यंत हिंदुस्थानावर ज्या स्वा-या झाल्या होत्या त्या सर्व उत्तेरकडून खैबरखिंडीतून झाल्या होत्या. शक आले, हूण आले, मोगल आले पण हे सर्व खैबरखिंडीतून आले. परंतू ब्रिटीश, फ्रेंच, डच, पोर्तृगीज वगैरे पाश्चात्य सत्ता समुद्रमार्गानें आल्या. त्यांच्याशी जर मुकाबला करायचा असेल, त्यांच्याशी जर यशस्वी तोंड द्यावयाचे असेल तर आपले आरमार सुसज्ज पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वेळेच्या धार्मिक रुढी आणि अंध श्रद्धा यांचा मुलाहिजा न ठेवता आपलं स्वत:चं सुसज्ज असं आरमार तयार ठेवलं आणि डच, पोर्तृगीज, फ्रेंच, ब्रिटीश यांना यशस्वीपणे तोंड दिले.