व्याख्यानमाला-१९७९-३

प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अध्यक्ष महाराजांनी माझ्या वर आणखी एक कामगिरी सोपविली आहे ती म्हणजे गेल्या वर्षी माझे मित्र डॉ. भालचंद्र फडके यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक क्रांती" या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचं पुस्तक प्रकाशित करणं ही होय. प्रतिवर्षी वक्त्यांची व्याख्याने झाल्यानंतर ती व्याख्याने पुस्तकरुपाने प्रसिद्ध करण्याचा आपला हा उपक्रम अभिनंदनीय व स्तुत्य आहे. यामुळे कोणत्या वक्त्यांचे कोणत्या विषयावर केव्हा काय भाषण केले याची ग्रंथरुपाने नोंद रहाते. ही फार महत्वाची गोष्ट आहे. व्याख्यानाला वक्ता येतो. व्याख्यान देतो आणि निघून जातो. जी मंडळी व्याख्यानाला हजर राहू शकत नाहीत त्यांना अशा पुस्तकाच्या प्रसिद्धीमुळे वक्त्यांचे विचार काय मांडले आहेत ही वाचण्याची संधी मिळते. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेमध्ये आपण प्रामुख्याने राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तीन विषयावर प्रतिवर्षी व्याख्याने आयोजित करत आलेला आहात. विद्वान, व्यासंगी आणि विचारवंत मंडळींनी आतापर्यंत दिलेली व्याख्याने आपण पुस्तकरुपाने प्रसिद्ध केली आहेत त्या पैकीच गेल्या वर्षी झालेलं व्याख्यान ग्रंथरुपाने तयार झालेल असून ते आपण आज माझ्या हस्ते प्रकाशित व्हावं अशी इच्छा प्रदर्शित केली आहे याबद्दल मी आपणास धन्यवाद देत आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं असंही जाहीर करतो.

आज आणि उद्या असे दोन दिवस माझी आपल्यापुढे व्याख्याने आहेत. माझ्या व्याख्यानाचा विषय "महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे टप्पे" असा आहे. इ. स. १८१८ मध्ये पेशवाई बुडाली. ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आले. ब्रिटीश राजवट सुरु झाली. या दिवसापासूनच महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. इतिहास कालात सामाजिक क्रांतीच्या दिशेने चुकूनमाकून काही पावले पडलेली दिसून येतात. परंतु सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने जाणीवपूर्वक व सातत्याने प्रयत्न झाल्याचे दृष्य दिसत नाही. परंतु तो काल ही असा होता की सामाजिक प्रश्नाकडे लक्ष देण्याची समाजीची प्रवृत्तीही नव्हती व कुवतही नव्हती. या दृष्टीने तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदाच मराठी भाषेत भगवद्गीतेवरील टीका लिहून सनातन्यांच्या विरुद्ध पहिलं बंड पुकारलं. तत्पूर्वी ग्रंथनिविष्ठभाषा म्हणजे फक्त संस्कृत भाषा होती. विद्वता जी काय असेल ती फक्त संस्कृत भाषेतच व्यक्त करावयाची असा प्रघात होता. ज्ञानदेवांनी या वृत्तीविरुद्ध पहिला हल्ला चढविला :-

माझा म-हाठाचि बोलु कौतुके ।
परि अमृतातेहि पैजा जिंके ।।
ऐशी अक्षरें रसिके । मेळवीन ।।

असे म्हणून मराठी भाषेला अमृताची उपमा देवून वयाच्या १८ व्या वर्षी तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोहारी संगम झालेली अशी ज्ञानेश्वरी लिहिली.

त्या नंतर २०० वर्षे गेली. संत एकनाथ महाराजांनी ख-या खु-या अर्थाने सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पैठणमध्ये राणू नावाच्या एका महार समाजातील व्यक्तीच्या घरात जाऊन त्यांनी भोजन केले. आज आपण सर्वजण नेहमीच सहभोजन करीत असल्याने ही गोष्ट आपणाला फारशी महत्त्वाची वाटणार नाही. परंतु ६०० वर्षांपूर्वी अशा प्रकारे अस्पृश्याच्या घरी जेवण करणे हे निश्चित महत्त्वाचे होते.