व्याख्यानमाला-१९७९-२

यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे अध्यक्ष, नगरपालिकेचे उपाध्यक्ष, नगरसेवक आणि महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतिबद्दल कुतूहल असणा-या क-हाड निवासी माझ्या बंधू भगिनींनो !

माझे परममित्र श्री. पी. डी. पाटील हे क-हाड नगरपालिकेचे गेली सतत २५ वर्षे अध्यक्ष आहेत. याचाच अर्थ नगराध्यक्ष या नात्याने यंदा त्यांचे रौप्यमहोत्सवी वर्ष चालू आहे. साधारणपणे कुठल्याही नगरपालिकेची परिस्थिती पाहिली तर एखाद्या व्यक्तीला नगराध्यक्षपदाचा मान हा एक वर्षापेक्षा अधिक काल मिळत नाही. परंतु श्री. पी. डी. पाटील हे या गोष्टीला ठळक अपवाद आहेत. त्यांनी हा विक्रमच केलेला आहे. क-हाडवासी जनतेचा श्री. पी. डी. पाटील यांच्यावर किती लोभ आहे याचेच दे दृष्य प्रतीक आहे. असा लोभ असण्याचे कारण श्री. पी. डी. पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत नवीन नवीन उपक्रम सुरु करुन क-हाड नगरपालिकेला एक आदर्श नगरपालिका असा दर्जा मिळवून दिला आहे श्री. पी. डी. पाटील यांनी नगरपालिकेतर्फे अनेक उपक्रम सुरु केलेले आहेत याची प्रचीती क-हाडचे नागरिक या नात्याने आपणाला आहेच परंतु माझ्यासारख्या त्रयस्थ माणसाला त्यांचे दोन उपक्रम विशेषत्त्वाने आकर्षित करतात. पहिला उपक्रम नगरपालिकेने चालविलेले अद्यावत सुखसोयींनी यक्त असे एक उत्कृष्ट ग्रंथालय आणि दुसरा उपक्रम म्हणजे महाराष्ट्राचे थोर सुपुत्र मा. यशवंतरावजी चव्हाण यांनी देशासाठी आतापर्यंत जो त्याग केलेला आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला' हा होय. गेल्या ७ वर्षापासून ही व्याख्यानमाला अखंडपणे चालू आहे. या व्याख्यानमालेत मी दोन पुष्पे गुंफावीत अशी नगराध्यक्ष मला गेल्या तीन चार वर्षांपासून आज्ञा करीत आहेत. मीही त्या गोष्टीला होकार देत आलो आहे. परंतु या ना त्या कारणामुळे आजपर्यंत तो योग जमून आला नाही. चालू वर्षी मात्र मी या व्याख्यानमालेत आपली हजेरी कोणत्याही परिस्थितीत लावायचा दृढनिश्चय केलेला होता. आपल्या दिलेला शब्द पाळण्याची संधी आपण मला आणून दिलीत याबद्दल श्री. पी. डी. पाटील यांचे, नगरपालिकेचे, नगरपालिकेने चालविलेल्या वाचनालयाचे आणि या ठिकाणी उपस्थित असणा-या आपल्या सर्वांचे मी अंत:करणपूर्वक व कृतज्ञनापूर्वक आभार मानतो.

क-हाड नगरीला अभिमान वाटावा असेच मा. यशवंतरावांचे कृर्तृत्त्व आहे पण ते महाराष्ट्राचे नेते आहेत आणि अखिल भारतीय कीर्तीचे राजकीय पुढारी आहेत. यशवंतरावजींच्या संबंधी थोडक्यात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल :

"प्रज्ञा आणि प्रतिभा, विवेक आणि विचार, संयम आणि सहिष्णुता, मर्दुमकी आणि मुत्सदेगिरी या गुणांनी मंडित असं हे व्यक्तिमत्व आहे. यशवंतरावाजी ही नुसती व्यक्ती नाही. ती एक शक्ती आहे. नुसती शक्ती नाही तर तो एक विचार आहे. नुसता विचारही नाही. ती एक विचारधारा आहे. नुसती विचारधारा नाही तो एक आचार आहे. किंबहुना आचार संहिता आहे. या व्यक्तीत, या शक्तीत, या विचारात, या आचारात, या विचारधारेत आणि या आचारसंहितेत महाराष्ट्राचं आणि भारताचं महन्मंगल करण्याचं प्रचंड सामर्थ्य साठविलेलं आहे."

तेव्हा अशा प्रकारच्या थोर आणि महननीय व्यक्तीच्या नावानं जी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे त्यामध्ये सहभागी होण्याचा मान व सुवर्णसंधी मला आपण प्राप्त करुन दिली याबद्दल मी पुन्हा एक वेळ आपले आभार मानतो.