व्याख्यानमाला-१९७९-७

महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने ख्रिश्चन मिशन-यांचे प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात झाले आहेत.  ख्रिश्चन मिशनरी हिंदुस्थानात आले ते मुख्यत: आपल्या धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आले. परंतू आपल्या धर्माचा प्रसार करीत असताना त्यांनी दीन-दलित, दुर्बल, रंजलेले, गांजलेले यांची सेवा करण्याचे व्रत घेतले होते. ही गोष्ट आपण कटाक्षाने लक्षात ठेवली पाहिजे. हिंदुधर्माने विद्येत मागासलेल्यावर्गांना आणि गोरगरिबांना ज्या सवलती नाकारल्या होत्या त्या ख्रिश्चन मिशन-यांनी सामान्य जनतेला देऊ केल्या. मिशन-यांनी शाळा काढल्या, दवाखाने काढले. दुष्काळामध्ये गोरगरिबांना अन्नधान्य पुरवून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. या मुळे गोरगरिब लोक मिशन-यांकडे आकर्षित होऊ लागले व स्वेच्छेने धर्मांतर करु लागले. मिशनरी एवढेच करुन थांबले नाहीत तर हिंदूधर्मामध्ये ज्या अनिष्ट रुढी व अनिष्ट चाली होत्या त्यांच्यावरही हल्ले करायला सुरुवात केली. मिशन-यांनी बाटवाबाटवीचे जे प्रकार चालविले होते त्याबद्दल नापसंती दाखवित असताना सुद्धा त्यांनी समाजसेवेचा जो धडा घालून दिला त्यामुळे हिंदूसमाजातील सुशिक्षित आणि विचारवंत मंडळींचे डोळे उघडले. आणि या ख्रिश्चन मिशन-यांप्रमाणे आपण सुद्धा आपल्या धर्मातील दोष आणि उणीवा नाहिशा केल्या पाहिजेत अशी प्रबल भावना मूठभर का होईना सुशिक्षित लोकांत निर्माण होऊ लागली. त्यामुळेच पूर्वी शिक्षण ही केवळ ब्राह्मण समाजाची मिरासदारी होती. ती नाहीशी करुन सर्व सामान्य जनतेत शिक्षण प्रसार व्हावा, हिंदू स्त्री ही शिक्षणापासून वंचित होती, तिलाही शिक्षण द्यावं, बालविवाहाची पद्धत नाहीशी व्हावी, विधवाविवाह सुरु करावेत आणि जरठकुमारी विवाह मोठ्या प्रमाणावर होत होते त्याना आळा घालावा या दृष्टीने हिंदू समाजातील विचारवंत प्रयत्नशील झाले. मुंबईच्या आणि पुण्याच्या काही विचारवंतांनी जाणीव पूर्वक प्रयत्न केले.

मुंबईत विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी मिशन-यांचे हिंदुधर्मावरील हल्ले परतवून लावण्याचा फार मोठा प्रयत्न केला व त्याचवेळी आपल्या धर्मांतील दोष दूर करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले.

विष्णुशास्त्री पंडित या नावाचे पुण्याला एक गृहस्थ होते. त्यांचा शास्त्री घराण्यात जन्म जरी झाला असला तरी विधवा विवाह शास्त्र समंत आहे अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती. म्हणून त्यांनी आयुष्यभर विधवा विवाहाचा पुरस्कार फार मोठ्या प्रमाणात केला. किंबहुना याच ध्येयासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. "विधवा विवाहोत्तेजक सभा' या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती. त्या आधी १८५६ साली ईस्ट इंडिया कंपनीने विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदाही केलेला होता. कायद्यामुळे प्रश्न सुटतात अशातला भाग नाही. परंतु कायद्यामुळे अशा प्रकारचे विवाह सुलभ होण्याला मदत होती. विष्णुशास्त्री पंडितांना या कामी न्या. रानडे, महात्मा जोतिबा फुले, विष्णुशास्त्री बापट यांच्या सारखी थोर थोर मंडळी मदत करत होती. त्यावेळी प्रामुख्याने ब्राह्मण समाजात दोन तट पडलेले होते. या सुधारणांना विरोध करणारे सनातनीही ब्राह्मणच आणि सुधारणांचा पुरस्कार करणारे सुधारक हे सुद्धा ब्राह्मणच. विष्णुशास्त्री पंडित अगर विष्णुशास्त्री बापट ही वेदसास्त्रसंपन्न अशा शास्त्री घराण्यातील मंडळी परंतू हिंदू ध्रमाचा संकुचितपणा उणिवा आणि दोष यावर कोरडे ओढण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पहिला विधवा विवाह १८४२ साली बेळगाव येथे झाला. या नंतर विशेषत: १८५६ च्या कायद्यानंतर असे विवाह तुरळकपणे होत होत. विष्णुशास्त्री पंडित आणि त्यांची 'विधवा विवाहोत्तेजक सभा' या संस्थेतर्फे अशा विवाहांचा जाणीव पूर्वक पुरस्कार करीत असत. असे विवाह, पत्रके काढून समारंभपूर्वक जाहीररीत्या वधू-वरांना आहेर वगैरे करुन घडवून आणित असत. त्यामुळे सनातन्यांचे पित्त खवळत असे. त्याच्यांकडून असा प्रकारच्या विवाहाला अडथळे करण्याचा प्रयत्न होत असे. न्या. रानडे, विष्णुशास्त्री पंडित, विष्णुशास्त्री बापट हे विधवा विवाहशास्त्र संमत आहे अशा भूमिकेतूनच त्यांचे कार्य चालू होते. एखादी गोष्ट शास्त्र संमत आहे की नाही या बद्दलचा दाखला वेद पुराणे, महाभारत, रामायण यातून शोधून काढायचा प्रयत्न होत असे.