व्याख्यानमाला-१९७९-३३

प्रो. विजापूरकर यानी आपल्या समर्थ पत्रात महाराजांना ते शिवाजी महाराजांचे वंशज असले तरीसुद्धा वेदोक्ताचा तिळमात्र अधिकार नाही असे स्पष्टपणाने लिहिण्यास सुरुवात केली. विजापूरकरांचे मते गागाभट्टान वेदोक्त पद्धतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला यामुळे गागाभट्टाला शौचकूपात मरण आले आणि शिवाजी महाराज व त्यांचा मुलगा संभाजी यांचा वेदोक्त पद्धतीने राज्यभिषेक झाल्यामुळे अकाली अंत झाला.

राजोपाध्यांचे मते महाराज हे घाटगे घराण्यातून दत्तक आल्यामुळे आणि घाटगे घराणे हे शूद्र घराणे असल्यामुळे शाहू महाराज हे दत्तक विधानाने जरी ते छत्रपती झाले तरी त्यांना वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्याचा हक्क पोहोचत नाही.

लो. टिळकांनी वर्तमानपत्रातून वेदोक्त प्रकरणात महाराजांचे विरोधी भूमिका घेतली. त्यांच्या मते गादीवर बसलेल्या छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा आशय असा की गादीवर बसलेल्या राजाला जर दोन मुले असतील तर त्यातील वडिल मुलगा गादीवर जो बसणार असेल तो क्षत्रिय व त्याला फक्त वेदोक्ताचा अधिकार आहे. आणि दुसरा मुलगा शूद्र, त्याला वेदोक्ताचा अधिकार नाही.

इतिहासाचार्य राजवाडे यांनी शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार आहे की नाही. याबद्दल निवाडा देण्यासाठी एक लवाद मंडळ नेमावे व त्याच्यामध्ये एक युरोपियन संस्कृत पंडित असावा असे आपले मत व्यक्त केले होते.

प्रो. विजापूरकर हे राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. लो. टिळक हे देशाचे नेते म्हणून विख्यात आहेत. राजवाडे हे इतिहासाचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत. या तिघांनी वेदोक्त प्रकरणामध्ये जी भूमिका घेतली ती राष्ट्रीय शिक्षणाच्या पुरस्कर्त्याचा, देशाला नेत्याला व इतिहास संशोधकाला साजेशोभेशी नव्हती. केवळ सनातनी ब्राह्मण समाजाच्या पुढा-याला शोभेल अशीच ही तर्कदुष्ट भूमिका होती असे त्यांच्या बद्दलचा रास्त आदरभाव बाळगूनही मोठ्या खेदाने म्हणावे लागते. गागाभट्टाच्या नंतर जवळ जवळ दोनशे वर्षांनी ही मंडळी महाराष्ट्रात जन्माला आली तर ती गागाभट्टाने जी कृती केली त्यापुढे जाऊ शकली नाहीतच परंतू त्याच्याही पाठीमागे राहिली.

महाराजांनीही या मोठमोठ्या मंडळींच्या संघटित विरोधाला भीक न घालता आपला हक्क बजावण्याचा निर्धार केला. आपण क्षत्रिय असता व छत्रपती घराण्यात शिवाजी महाराजांचे पासून वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्याची प्रथा असता महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी आपली जाणून बुजून मानहानी करण्याचा जो प्रयत्न चालविलेला आहे तो सर्व शक्तीनिशी मोडून काढण्याचा महाराजांनी निश्चय केला.

महाराजांनी राजोपाध्यांना राजघराण्यातील धार्मिक कृत्ये वेदोक्त पद्धतीने करावीत म्हणून लेखी व तोंडी कळविले. महाराजांनी राजोपाध्यांवर एकदम कारवाई न करता त्यांनी गोखले, पंडित व खुद्द राजोपाध्ये यांची कमेटी नेमून वेदोक्त पद्धतीने विधी करण्याबाबत वस्तुस्थिती काय आहे या संबंधीचा अहवाल सादर करण्यास सांगितले. राजोपाध्यांनी या कमेटीशी असहकार केला. कमेटीच्या राहिलेल्या दोन सभासदानी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून सर्व कागदपत्रे पाहिली. आणि त्यांत त्याना आढळून आले की १८६० सालापर्यंत कोल्हापूरच्या राज घराण्यांतील सर्व धार्मिक वेदोक्त पद्धतीने होत असत. परंतू बाबासाहेब महाराज गादीवर असताना १८६० सालच्या सुमारास रघुनाथशास्त्री पर्वते या नावाच्या एका शास्त्र्याने महाराजांच्या मनात भरवून दिले की महाराजांना पुत्रसंतती होत नाही याचे कारण राजघराण्यांत वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी केली जातात हेच होय!  त्या भोळ्याभाबड्या राजाने त्यावेळे पासून या शास्त्र्याच्या बद सल्यानुसार राजघराण्यातील धार्मिक विधी पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. लवकरच बाबासाहेब महाराजांचे १८६६ साली निधन झाले. त्यांनी मृत्यूच्या आदलेच दिवशी आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले व त्याचे नाव राजाराम असे ठेवले. राजाराम असे ठेवले. राजाराम महाराजही वयाच्या विसाव्या वर्षी इटलीत मरण पावले. त्यांच्या पत्नीने चौथ्या शिवाजी महाराजांना दत्तक घेतले. परंतु हातात राज्यसूत्रे येण्यापूर्वीच त्यांचाही अहमदनगरच्या किल्यात ब्रिटीश रखवालदारानी निर्घुणरित्या खून केला. या दोन अल्पवयस्क कारकिर्दीत वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. म्हणजे १८६० सालापासून ते १९०० सालापर्यंत या ४० वर्षाच्या कालावधीत कोल्हापूरच्या राजघराण्यातील धार्मिक विधी पुराणोक्त पद्धतीने होऊ लागले होते.