व्याख्यानमाला-१९७९-२८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टर ही पदवी घेऊन हिदुस्थानात आले. महार समाजातील एक ऐन पंचविशीतील तरुण डॉक्टर होऊन आलेला आहे. हे पाहून महाराजांना आनंद आणि अभिमान वाटला. डॉ. आंबेडकर त्यावेळी मुंबई येथे परळला बदक चाळीतील एक खोलीत रहात होते. महाराज जातीनिशी डॉ. आंबेडकरांचा शोध करीत त्या ठिकाणी गेले. महाराजांचा देह एवढा धिप्पाड होता की डॉ. आंबेडकरांच्या खोलीच्या अरुंद दारातून सरळ प्रवेश करणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून त्यांना आडवे होऊन प्रवेश केला. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपणहून आपल्या घरी आले हे पाहून डॉ. आंबेडकर स्तिमित झाले. त्यांना महाराजांचे स्वागत कसं करावं ह समजनास झालें. महाराजांनी डॉ. आंबेडकरांना आपादमस्तक न्याहळून पाहिले. त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली आणि अस्पृश्यांना डॉक्टरांच्या रुपाने त्याच्यातील खरा पुढारी मिळाला याबद्दल समाधआन व्यक्त केले. महाराज डॉ. आंबेडकरांना आपल्या रथात घेऊन खेतवाडी येथील आपल्या पन्हाळा लॉजमध्ये घेऊन गेले. त्यानंतर वेळोवेळी मुंबईच्या मुक्कामात डॉ. आंबेडकरांशी ते अस्पृशयता निवारण्याच्या संबंधाने चर्चा करीत असत. अस्पृश्यांच्यामध्ये स्वत्त्व, स्वाभिमान व जागृती करण्याच्या दृष्टीने एखादा वर्तमानपत्राची जरुरी आहे. ही गोष्ट डॉ. आंबेडकरांनी महाराजांच्या नजरेस आणून दिली. परंतू पैशाच्या अभावामुळे ही गोष्ट आपल्यास करता येणार नाही. म्हणून त्यांनी महाराजांच्याकडे आर्थिक सहाय्याची मागणी केली. महाराजांनी आंबेडकरांची ही अडचण जाणून त्यांना २५00/- रुपये दिले. या रक्कमेतून डॉ. आंबेडकरांनी 'मूकनायक' या नावाचं साप्ताहिक काढलं. या साप्ताहिकाची जाहिरात लो. टिळकांच्या केसरीमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी दिली होती. परंतू अस्पृश्याने काढलेल्या वर्तमानपत्राचा जाहिरातीने सुद्धा आपल्या लोकमान्य वर्तमानपत्राला विटाळ होऊ नये म्हणून केसरीने ती जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नाकारले.

या नंतर महाराजांचे व डॉ. आंबेडकरांचे संबंध दृढ व जिव्हाळ्याचे होऊ लागले. अस्पृश्यता निवारणावर त्यांच्या चर्चा होऊ लागल्या. या तरुणाला लोकांसमोर आणण्याच्या दृष्टीने महाराजांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील अस्पृश्यांची परिषद घेण्याचे ठरवून महाराजांनी डॉ. आंबेडकरांना अध्यक्ष पद देऊ केले. २१ मार्च १९२० साली हातकणंगले तालुक्यातील माणगाव या गावी ही परिषद झाली. महाराज या परिषदेला जातिनिशी हजर राहिले. आपल्या डोक्यावर जरीचा पटका डॉ. आंबेडकरांच्या डोक्यावर घातला आणि जमलेल्या अस्पृश्य शूद्र समुदायासमोर उत्स्फूर्तपणे भाषण केले. डॉ. आंबेडकर हे तुमचे खरेखुरे नेते आहेत, त्यांची विद्वत्ता, बुद्धिमत्ता,पांडिल्य, कर्तृत्व व सेवावृत्ती या गोष्टी विचारात घेता ते नुसत्या अस्पृश्यांचेच नव्हे तर संबंध हिंदुस्थानचे नेते भविष्यकालात झाल्याशिवाय रहाणार नाही. महाराजांची ही भविष्यवाणी स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. आंबेडकरांनी भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव झाल्याने खरी ठरली आहे.

डॉ. आंबेडकरांना या सभेचा मिळालेला अध्यक्षपदाचा मान म्हणजे त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा झालेला तो प्रारंभ होता. अस्पृश्य जमातीतील एका तरुणाची गुणवत्ता विचारात घेऊन त्याला पुढे आणण्याचे श्रेय छ. शाहू महाराजांना आहे.

माणगावची परिषद संपल्यानंतर महाराजांनी डॉ. आंबेडकर व परिषदेचे प्रतिनिधी यांना राजवाड्यावर भोजनाचे आमंत्रण दिले. आपल्या पंक्तीला अस्पृश्य समाजातील महारापासून भंग्यापर्यंत सगळ्यांना घेऊन त्यांनी जेवण केले. डॉ. आंबेडकर व त्यांच्या बरोबरीची मंडळीही त्या दिवशी सरकारी पाहुणे होती. डॉ. आंबेडकरांना त्या दिवशी महाराजांनी आपल्या रथात घेऊन कोल्हापूर शहरातून फिरविले. अशा रीतीने अस्पृश्यतेचा नायनाट करण्याच्या दृष्टीने महाराजांनी आपली पावले उचलली.