व्याख्यानमाला-१९७९-३७

डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी १९२४ साली 'बहिष्कृत हिताकारणी सभा' या नावाची संस्था स्थापन केली या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील अस्पृस्यांना संगठित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १९२७ च्या ऑगस्ट महिन्यात महाड येथे कुलाबा जिल्हा अस्पृश्य परिषद भरविली. या परिषदेला सुमारे पाच हजार लोक हजर होते. या वेळेपर्यंत डॉ. आंबेडकर स्वत:ला हिंदूच समजत होते. आणि एक हिंदू म्हणून समाजातील इतर घटकांप्रमाणे आपल्याला हक्क मिळाले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. १९२३ साली रावबहादूर सी के. बोले यांनी मुंबई कायदेमंडळात अस्पृश्यांना सार्वजनिक तळे, विहिरी, दवाखाने, विश्रांतिगृहे वगैरे खुली आहेत. असा ठराव मंजूर करुन घेतला. परंतु या ठऱावाची अंमलबजावणी करण्याचे धाडस कुलाब्याची परिषद होईपर्यंत भीतीच्यापोटी अस्पृश्यांनी दाखविले नव्हते. महाड गावाला पिण्याच्या पाण्याचे एक तळे आहे. त्याचे नाव चवदार तळे, या तळ्यात सुवर्ण हिंदू पाणी भरत असत. तसेच मुलसमान, ख्रिश्न परधर्मीय मंडळी पाणी भरत असत. पशू पक्षी सुद्धा पाणी पीत असत. परंतु अस्पृश्यांना मात्र या तळ्यातील पाणी भरण्यास मज्जाव होता. रावबहादूर बोल्यांच्या ठरावाचा आधार घेऊन डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांनीशी या तळ्यात पाणी पिण्याचा निश्चय केला. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चाराचारांच्या रांगेने अस्पृश्यमंडळी तळ्याच्या दिशेने निघाली. डॉ. आंबेडकर तळ्यात उतरले. ओंजळ भरून पाणी प्याले. त्यांच्या अनुयायांनी त्यांचे अनुकरण केले आणि अशा रीतीने हिंदू म्हणून पाणी पिण्याचा हक्क त्यांनी बजावला. ही सर्व मंडळी सभेच्या मंडपात परत फिरली. अस्पृश्यांनी तळ्यात जाऊन पाणी प्याल्याची बातमी हा हा म्हणता गावभर पसरली. सवर्ण हिंदू खवळून उठले. लाठ्या काठ्या घेऊन त्यांनी मंडपाकडे चाल केली व तिथे जमलेल्या अस्पृश्य मंडळींना बेदम झोडपून काढले. याबद्दल पुढे कोर्टात फौजदारी कज्जे चालून ब-याच सवर्ण लोकांना या प्रकरणात शिक्षा झाल्या.

अस्पृश्यांच्या पाणी पिण्यामुळे सनातनीवाद्यांनी 'तळे बाटले' असा एकच हलकल्लोळ केला. आणि मग तळे शुद्ध करण्यासाठी धर्ममार्तंडानी एक युक्ती योजिली. त्यांनी एकशे आठ घागरी तळ्यातील पाण्याने भरुन बाहेर काढल्या. त्या सर्व घागरीत गोमूत्र व गोमय मिसळले आणि वेदमंत्राच्या घोषात त्या सर्व घागरीतील पाणी पुन्हा तळ्यात ओतून तळे शुद्ध झाल्याचा गवगवा केला. डॉ. आंबेडकरांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या त्या तळ्यात पशुचे शेण व मूत्र मिसळून अशुद्ध झालेल्या तळ्यास त्यांनी शुद्ध म्हणण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्याच वर्षाच्या १९२७ चे डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा डॉ. आंबेडकरांनी पाणी पिण्याचा चवदार तळ्यातील सत्याग्रह करण्याचे ठरविले. कारण महाड नगरपालिकेने व स्थानिक जनतेने हरिजनांना चवदार तळ्यातील पाणी घेण्यास मनाई केली होती. डॉ. आंबेडकर आपल्या अनुयायांशी महाडला गेले पण त्यांनी सभा घेऊ नये अगर पाणी भरू नये म्हणून सवर्ण हिंदूनी केलेल्या दाव्यात कोर्टाकडून त्यास मनाई लावली. आंबेडकरांनी मनाई हुकूम मानला परंतू त्या दिवशी त्यांनी मनुस्मृतीचे दहन करुन सनातन्यांना पुन्हा एक धक्का दिला. त्यामुळे आसेतू हिमाचल सगळ्या भागातील मनुस्मृती जाळल्याबद्दल सनातनी ब्राह्मणांत खळबळ उडाली व चौहोंकडून डॉ. आंबेडकरांचा निषेध होऊ लागला.

१९२८-२९ साली हिंदुस्थानला काही नवीन राजकीय हक्क देण्याच्या इराद्याने ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन पाठविले. त्यांनी हिंदुस्थानातील निरनिराळ्या पक्षांच्या, पंथांच्या, धर्मांच्या, जातींच्या साक्षी घेऊन ब्रिट्रिश पार्लमेंटला आपला रिपोर्ट सादर करावयाचा होता. काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार घातलेला होता. लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनात पं. नेहरुंच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव झालेला होता. तेव्हा संपूर्ण स्वातंत्र्याखेरीज आपले कशानेही समाधान होणार नाही असे काँग्रेसचे म्हणणे होते.