व्याख्यानमाला-१९७९-३०

महाराजांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी ज्या कालखंडात बहुविध चळवळी केल्या त्याच कालखंडात आणखी एक थोर पुरुषाचे नाव आपल्याला घेतले पाहिजे. ते म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. त्यांचा पिंड मूळचा धार्मिक सत्त्वशील होता. ब्राह्मोसमाजाचा त्यांच्या आचार विचारांवर फार परिणाम झाला होता. सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी म्हणून ब्राह्मोसमाजाने त्यांना इंग्लंडला पाठविले होते. न्या. रानडे, डॉ. भांडारकर यांनी स्थापन केलेल्या प्रार्थना समाजामध्ये ते नियमितपणे भाग घेत असत. ते स्वत: पदवीधर होते. नोकरीच करायची असती तर त्यांना कुठेही चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळू शकली असती. परंतू ते स्वत: आपल्या सर्व कुटुंबियांसह अस्पृश्यांची सेवा करण्यासाठी चंदनासारखे झिजले. १९०६ साली त्यांनी 'डिप्रेसड् क्लास मिशन' या नावाची संस्था स्थापन केली. आणि महाराष्ट्रामध्ये अस्पृश्याच्या शिक्षणासाठी शाळा व वसतिगृहे काढली त्यांच्यासाठी रात्रीच्या शाळा सुरु केल्या. सुरूवातीला त्यांचे कार्य मुंबईला होते. त्यानंतर ते पुण्याला आले व पुण्याला त्यांनी 'अहिल्याश्रम' या संस्थेची स्थापना केली.या अहिल्याश्रमातर्फे चालविलेल्या प्राथ. शाळा, माध्य. शाळा व वसतिगृहे यांतून बरीच अस्पृश्य समाजातील मंडळी शिकून बाहेर पडली.

काँग्रेसची स्थापना १८८५ साली झाली होती. सुरुवातीला अतिश्रीमंत व अतिशिक्षित अशा उच्चवर्णीयांनाच काँग्रेसमध्ये स्थान होते. १९०७-८ साली सुरतेला काँग्रेस अधिवेशन भरले. त्यावेळी लो. टिळकांनी जी आक्रमक भूमिका घेतली त्या वेळेपासून सुशिक्षित, उच्चवर्णीय व मध्यमवर्गीयांचा भरणा काँग्रेसमध्ये झाला. परंतु बहुजन समाज, शेतकरी, कामगार, हरिजन, स्त्रिया यांना काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काही स्थान नव्हते. १८८५ साली पुण्यास काँग्रेसचे अधिवेशन भरले त्यावेळी म. फुल्यांनी एक शेतक-याचा भव्य पुतळा काँग्रेसच्या अधिवेशनाच्या मंडपापुढे उभा करुन शेतक-यांच्या गा-हाण्याकडे काँग्रेसचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. १९१६ सालापर्यंत काँग्रेसचे या वर्गाकडे लक्ष गेलेले नव्हते. परंतू डॉ. अॅनीबेझंट या १९१६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतर महर्षी वि. रा. शिंदे यांच्या प्रयत्नाने डॉ. अॅनीबेझंट यांनी हरिजना संबंधीचा ठराव मांडला. तो ठराव पासही झाला. ही महर्षी शिंदे यांची विशेष व बहुमोल कामगिरी होय.

सामाजिकदृष्ट्या प्रतिगामी असलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हरिजनांसंबंधी सहानुभूति दाखविण्याचा ठराव मंजूर करुन घेणे ही हलकी-सलकी गोष्ट नव्हती. परंतू महर्षी शिंदे यांच्या प्रयत्नाने व डॉ. अॅनीबेझंट यांच्या सारख्या सगळी मानव जात ही परमेश्वराची लेकरे आहेत असे मानणा-या थिऑसाफिस्ट बाईच्या पाठिब्याने हा ठराम मंजूर झाला. १९२० नंतर म. गांधी हे भारताच्या राजकीय व्यासपीठावर काँग्रेसचे नेते म्हणून आले. आणि स्वराज्याची चतू:सूत्री म्हणून हरिजनोद्धार हा काँग्रेसच्या कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग होऊन बसला.

छत्रपती शाहू महाराज सर्व आकाश दीप्तिमान करणारा एक विजेचा लोळ म्हटला तर  महर्षी विठ्ठल रामजी शिदे हे नंदादीपाप्रमाणे किंवा समुद्रातील दीपस्तंभा प्रमाणे होते असे म्हणावयास हरकत नाही. शांत व धीम्मेपणाने, सेवावृत्तीने त्यांनी स्वत:ला सहकुटुंब सहपरिवार सार्वजनिक सेवेला वाहून घेतले. अध्यात्म शक्तीवर त्यांचा फार मोठा भर होता. इतिहास संशोधनाची त्यांना आवड होती. मराठ्यांच्या इतिहासावर त्यांनी अनेक लेख लिहले. 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा ग्रंथ लिहून अस्पृश्यतेच्या उगमस्थानावर त्यांनी बोट ठेवले. अस्पृश्य मंडळी पूर्वाश्रमीची बुद्ध असली पाहिजेत हा एक नवीन शोध त्यांनी लावला. हाच धागा हाताशी धरुन डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य हे पूर्वाश्रमीचे बुद्धधर्मीय होते हे Who were the Shudras ! या आपल्या ग्रंथात साधार, सुस्पष्टपणे व विस्तारापूर्वक मांडले आहे. अस्पृश्य हे क्षत्रिय होते. ब्राह्मणांचं नेहमीचं कसब म्हणजे एखाद्याला हिंदुधर्मातून दूर लोटायच झालं तर त्याला चौथ्यावर्णात टाकत म्हणून अस्पृश्य हे क्षत्रिय असून त्यांना ब्राह्मणांनी शूद्र म्हणायला सुरुवात केली. आणि त्यामुळे अस्पृश्य हे हिंदू समाजापासून दुरावले गावच्या कुसवाबाहेरच त्यांना स्थान मिळे. आणि शहरामध्ये गलिच्छ वस्तीत त्यांच्यासाठी जागा ठेवली जात असे.