व्याख्यानमाला-१९७९-३१

महर्षी शिंदे यांनी केलेल्या संशोधनामुळे मानववंशशास्त्र, समाजशास्त्र व इतिहासशास्त्र या शास्त्रांमध्ये मौलिकभर पडलेली आहे. महर्षी शिंदे यांनी अनेक हाल अपेष्टा सोसत अस्पृश्यांची सेवा करण्यामध्ये आनंद मानला परंतू त्यामुळे ते स्पृश्यापासूनही दुरावले व ज्यांची सेवा करण्यामध्ये त्यांनी आपली ऐन उमेद घालविली त्यांनीही त्यांना शेवटी दोष दिला. म्हणून महर्षी शिंदे यांचे बद्दल असे म्हणता येईल की महर्षी शिदे म्हणजे त्याग-मूर्तिमंत त्याग, महर्षी शिंदे म्हणजे सेवा-असीमसेवा, महर्षी शिंदे म्हणजे समर्पित जीवनाची उदात्त पण करूण कहाणी.

गेल्या १०० वर्षांत महाराष्ट्रामध्ये रखमाबाई प्रकरण, वेदोक्त प्रकरण, क्रॉफर्डमार्केट प्रकरण, खान-पाणंदीकर विवाह प्रकरण आणि हार्वे नरीमन प्रकरण, वगैरे प्रकरणे गाजली परंतू बहुजन समाज व ब्राह्मण समाज हे एकमेकाच्या विरोधात प्रथमच कोल्हापूरच्या वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने उभे ठाकलें त्यामुळे या प्रकरणाला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

वेद हे हिंदू समाजाचे धार्मिक ग्रंथ, परंतू विद्येची मक्तेदारी ब्राह्मण समाजाकडे आल्यामुळे पूर्वी वेदाध्ययनाचा अधिकार क्षत्रिय वैश्यांना होता. तो अधिकार ब्राह्मण समाजाने काढून घेतला. वेदाध्यायन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण समाजाचा खास अधिकार म्हणून वापर होऊ लागला. बहुजन समाजाला वेदाध्ययन करणं अशक्य झालं.

क्षत्रिय, वैश्यांचे धार्मिक विदी हे पूर्वी वेदोक्त पद्धतीने होत असत परंतू ब्राह्मणांनी मखलाषी करुन नंदांतानि-क्षत्रियकुलानि नंदांच्या नंतर कलियुगात क्षत्रिय कोणी उरलेच नाहीत. ब्राह्मणाशिवाय सगळे शूद्र म्हणून त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही. तस पाहू गेल्यास नंदांच्या नंतर हिंदुस्थानात मौर्य, शातवाहन, शिलाहार, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव वगैरे क्षत्रिय घराणी होऊन गेली. त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रदेशावर शतकानुशतके राज्ये केली. परंतू ब्राह्मण समाज अशा क्षत्रियांनासुद्धा क्षत्रिय मानायला तयार नव्हता. उलटपक्षी कलीयुगात दोनच वर्ण आहेत. एक ब्राह्मण व दुसरा शूद्र असे म्हणून ब्राह्मणांनी क्षत्रियांना व वैश्यांना शूद्र वर्णात ढकलून दिले पण हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला धसाला लागला. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करुन हिंदूपदपादशहा म्हणून मोंगलांच्या बरोबरीने आपले स्थान आहे हे दर्शविण्यासाठी स्वत:ला राज्यभिषेक करुन घेणेचे छ. शिवाजी महाराजांनी ठरविले. त्या वेळी महाराष्ट्रातील ब्राह्मण मंडळींनी शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाहीत म्हणून वेदोक्त पद्धतीने त्यांचा राज्यभिषेक करण्याचे नाकारले.

मुसलमानी हल्ल्यांपासून महाराजांनी ज्यांचे संरक्षण केले तीच मंडळी अशारीतीने महाराजांच्या विरोधात गेली. महाराजही चाणाक्ष आणि विचाराचे पक्के असल्यामुळे त्यांनी काशीहून गागाभट्टाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या नाकावर टिच्चून मुद्दाम पाचारण करुन आणले व वेदोक्त पद्धतीने त्यांचेकडून स्वत:ला राज्याभिषेक करुन घेतला. त्यावेळेपासन महाराष्ट्रातील ब्राह्मण मंडळीनी काहीसे नमते घेऊन छत्रपती घराण्याचे धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्याचे मान्य केले.व त्या प्रमाणे ते करु लागले. छ. संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेबांना मुलगा शिवाजी व संभाजीचा मुलगा शाहू यांच्या मुंजी लग्ने व राज्यभिषेक समारंभ हे वेदोक्त पद्धतीनेच झाले.परंतू पेशव्यांच्या अमदानीत सातारच्या शाहूच्या मृत्यूनंतर पेशवे छत्रपतींना डोईजड होऊन बसले त्या वेळेपासून ब्राह्मणांचा दूरअभिमान पुन्हा बळावल्यामुळे छत्रपतींना शूद्र लेखण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला. सातारच्या गादीवरील दुसरा शाहू यांची मुंज नाना फडणीसाच्या खास सूचनेवरुन पुराणोकत पद्धतीप्रमाणे करण्यांत आली. ती केल्याची बातमी नाना फडणीसाला कळताच छत्रपती हे शूद्र आहेत व त्यांना शूद्र लेखण्यात आपण यशस्वी झालो या बद्दल त्याला परमावधीचा आनंद झाला.