व्याख्यानमाला-१९७९-३६

महाराजांच्या या कृत्याबद्दल महाराष्ट्रातील काही विचारवंताच्याकडून त्यांना दोष दिला जातो त्यांच्या म्हणण्याचा आशय असा असतो की महाराजांनी शेंडीवाला भटजी काढून शेमलेवाला भटजी नेमला. महाराजांनी ही एक क्रांतिकारक सुधारणा केली होती ही गोष्ट ही विचारवंत मंडळी सोईस्करपणे विसरतात. पिढ्यानुपिढ्या आणि शतकानुशतके पुरोहिताच्या धंद्याची ब्राह्मणसमाजापुरती मक्तेदारी निर्माण झालेली होती. अन्य कोणत्याही जातिला या व्यवसायात मज्जाव असे. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे १९३६ साली केलेल्या खालील विधानावरुन महाराजांनी उचललेले पाऊल किती दूर दृष्टीचे, समर्पक आणि योग्य होते याची प्रचिती आल्याशिवाय रहाणार नाही. डॉ. आंबेडकर म्हणतात. "जन्मजात पुरोहित गिरीची पद्धत बंद करुन पूरोहितांचा धंदा सर्व हिंदूना खुला केला पाहिजे. जो हिंदू उपाध्यायाची परीक्षा उत्तीर्ण होईल त्याला पुरोहिताची सनद दिली पहिजे. पुरोहितांची संख्याही कमी केली पाहिजे. यामुळे ब्राह्मणी धर्माचा शेवट होऊन हिंदू धर्मं तरेल." शंकराचार्य पीठ हे संबंध हिंदूधर्माचे नसून केवळ ब्राह्मणांचेच आहे हे शंकराचार्यांच्या वागणूकीवरुनच सिद्ध झाल्यामुळे महाराजांनी शंकराचार्यांची पीठाला समांतर असे बहुजन समाजासाठी क्षात्र जगद्गुरुपीठाची स्थापना ब्राह्मणांच्या धार्मिक मक्तेदारीला सुरूंग लावला.

महाराजांनी सामाजिक क्रांतीच्या दिशेने आपल्या ह्यातीत ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्यांपैकी बहुजनसमाजात शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्यता निवारण, वेदोक्त प्रकरणामुळे धर्ममार्तंडाच्या विरुद्ध पुकारलेले बंड आणि त्यात मिळविलेले यश, बहुजन समाजाला मुंबईच्या कायदेमंडळात सात राखीव जागा मिळविण्यात आलेले यश या सर्वांचा उहापोह वर केलेला आहे. याशिवाय त्यांनी केलेल्या इतर अनेक गोष्टीसंबंधी आपल्याला माहिती पुरविण्याची इच्छा असूनसुद्धा वेळेच्या अभावी तसे करणे शक्य होत नाही. याबद्दल मला दिलगिरी वाटते. परंतु वर सांगितलेल्या गोष्टीवरुन महाराजांची पावले सामाजिक क्रांतीच्या दिशेने कशी कशी पडत होती हे एवढ्यावरुनही कळून येण्यासारखे आहे.

६ मे १९२२ रोजी महाराजांचा अकाली अंत झाला. आपल्या मृत्यूनंतर सामाजिक क्रांतीचे नेतृत्व कोणी करावे याबद्दल महाराजांनी माणगावच्या अस्पृश्य परिषदेमध्ये डॉ. आंबेडकरांना पुढे आणण्याचे प्रयत्न केले होते. 'मूकनायक' या डॉ. आंबेडकरांच्या वर्तमानपत्राला व खुद्द डॉ. आंबेडकरांनी कायदेपंडित होऊन सामाजिक कार्याला वाहून घ्यावे म्हणून महाराजांनी सढळ हाताने मदत केली होती.

डॉ. आंबेडकर हे १९२३ साली इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांच्यावर सामाजिक क्रांतीची नवीन जबाबदारी येऊन पडली. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ही जबाबदारी पेलण्यास डॉ. आंबेडकर सर्वथैव समर्थ होते. त्यांचे अमेरिका, इंग्लंड व जर्मनी या तीन देशांतील तीन विद्यापीठांत शिक्षण झाले होते. भरपूर अनुभव पाठीशी होता. या देशात आणि हिंदुसमाजात अस्पृश्यांचे हाल कसे होतात याचा लहानपणापासून त्यांना कटू अनुभव होता. म्हणून आपल्या समाजाचा विकास व्हायचा असेल तर आपण शिक्षणात पुडे सरसावले पाहिजे असे त्यांचे मत होते. पोटाला चिमटा घेऊन त्यांनी आपला विद्याव्यासंग अखंडपणे चालू ठेवला. ते अभ्यासात इतके गढलेले असत आणि दारिद्रयाने इतके पिचलेले असत की ते कधी कधी आपल्या मित्रांना म्हणत असत की मला जेवणाला पैसा नाही आणि झोपायला वेळ नाही. अशा अवस्थेत डॉ. आंबेडकरांनी समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, राजकारण, कायदा, अर्थकारण इ. विषयांचा सखोल अभ्यास करुन 'Ancient Indian Commerce' ( प्राचीन भारतातील व्यापार ) 'Casts in India; their mechanism, Genesis and development' ('भारतातील जातीसंस्था : तिची उत्पत्ती आणि वाढ') 'Evaluation of provincial finance in British India' ( 'ब्रिटीश भारतातील प्रांतिक, भौतिक उत्क्रांति') 'Small Holding in India and their Remedies' ( 'भारतातील लहान जमिनी आणि पद्वविषयक उपाययोजना') आणि 'The Problem of the Rupee' ('चलनाचा प्रश्न') अशा प्रकारचे प्रबंध लिहून आपल्या गुरूजींना व त्या त्या विषयातील तज्ञांना आश्चर्य चकित करुन टाकले. प्रतिभा आणि ज्ञान असलेल्या एक प्रकांडपंडित, एक स्वाभिमानी आणि बाणेदार व्यक्ती, कर्तव्य आणि नेतृत्व हे गुण असलेले एक तरुण या नात्याने त्यांनी सामाजिक क्रांतीची सूत्रे हाती घेतली.