व्याख्यानमाला-१९७६-४२

लजपतराय सारखा देशभक्त हद्दपार होतो आणि मिंटो जिवंत कसा राहतो! टिळकांनी आपणास धमकी दिली आहे असे शाहूंनी मुंबई सरकारास कळविले व हुबळीच्या भाषणात त्यांना तसा उल्लेखही केला. शाहूंनी टिळकांना उलट निरोप पाठविला की, “माझा प्राण गेला तरी मी हे गरिबांचे कार्य सोडणार नाही . ही गरिबांच्या उध्दाराची चळवळ थांबविणार नाही ! I shall fight for the poor at the risk of my life and crown !”

शाहू छत्रपती स्वदेशीचे मोठे पुरस्कर्ते होते. स्वदेशी उद्योगधंद्यांचे पाठीराखे होते. ‘स्वदेशी पेपरमील, चे ते भागीदार होते. ते स्वदेशी कागद वापरीत. मुलीला स्वदेशी पातळे विकत आणून देत. स्वत:चे कुडते स्वदेशी कापडाचे वापरीत. घोंगडया व इतर बैठकाचे कापड स्वदेशी असे. कोल्हापुरात कापडाची गिरणी निघाली तेव्हा त्यांनी त्या गिरणीकरता तलाव व जमीन देऊन आर्थिक साहाय्यही केले आणि व्यवस्थापकांना असे बजावले की, ‘ही गिरणी लाक्षाधीशांच्या ताब्यात जाता कामा नये. जे भागधारक आहेत त्यांच्या हितासाठी जपा व गिरणी चालविणे हे मुंबईचाच मक्ता आहे हे म्हणणे खोटे पाडा.’ छत्रपतींनी क-हाडला निघालेल्या आगपेटीच्या कारखान्यातीलच आगपेट्या वापाराव्यात असे जनतेला व संस्थानातील व्यापा-यांना आवाहन केले होते. किर्लोस्कर कारखान्याला तर जुन्या तोफा देऊन व दुसरी सामग्री पुरवून त्या कारखान्याच्या पडत्या काळात चालकांना अमोल सहाय्य केले, धीर दिला व उत्तेजनही दिले.

राज्यकारभारात सुधारणा व्हावी, आपण कायदे करतो त्याचा फायदा गरिबापर्यंत पोचावा, त्याप्रमाणे आधिका-यांनी त्या बाबतीतले कर्तव्य निष्ठेने करावे म्हणून छत्रपतींनी बरेच कडक नियम केले होते. दौ-यावर जाणा-या अधिका-यांनी धान्य वगैरे वस्तू बरोबर न्याव्या. जे काही सामन गावक-यांपासून घेतले असेल त्याचे पैसे पोलिस पाटील किवां पोलिस आधिका-यांसमोर ग्रामस्थांना द्यावेत, कोणतीही वस्तू गावक-यांकडून पोलिसाना आणावयास सांगू नये. आधिका-यांनी आपल्या किंवा आपल्या नातलगांच्या नावावर गहाण खते वा इस्टेट विकत घेऊ नये, व्यापार करू नये, असा नियम केला होता.

शाहू कित्येक वेळा मित्रांच्या सांगण्यावरून आधिका-यांची नेमणूक करीत. अशाच एका अधिका-याच्या घरी त्याच्या स्नेह्याला घेऊन शाहू गेले. त्याचे वैभव पाहून त्याच्या मित्राला शाहूंनी विचारले, ‘तुझ्या मित्राच्या मासिक वेतनात हे सर्व वैभव मिळाले काय ? लाचलुचपत करणा-या व भ्रष्टाचारी अधिका-यांना ते बडतर्फ करीत. मग त्यांची जातपात ते पाहात नसत. लाच खणा-या एका अधिका-याला ते आपल्या दिवाणखान्यात कुत्र्या मांजराप्रमाणे फिरत असलेल्या वाघ सिंहाकडे सोडून हळूच आत गेले. वाघ सिंहाच्या तडाख्यात सापडलेला तो अधिकारी गर्भगळित झाला आणि ओरडला, “महाराज, मी माझां गुन्हा कबूल करतो पण ह्या जनावरांपासून माझा प्राण वाचवा!”

राज्य कारभारात गोंधळ होऊ नये, काढलेले हुकूम कार्यवाहीत येतात की नाही, गरिबांचे अर्ज किंवा गा-हाणी येतात त्यांचे निर्णय झाले की नाही, ती प्रकरणे कोठे आहेत, निर्णय झाले ते संबंधितांना कळविले की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी एक अधिकारी नेमला होता. त्याचा हुद्दा ‘इन्स्पेक्टर ऑफ ऑर्डर्स’ असा होता. शासकीय विभागात गरिबांचे कागद हरवतात, त्यांचे अर्ज वा फायली भ्रष्टाचारामुळे बेपत्ता होतात. ही सर्व जगात कमी आधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती असावी. अर्जदारांना दोन वर्षांनंतर सांगण्यात  येते की, “अहो, तुमचे कागद गहाळ झाले आहेत !” ज्यांनी ज्यांनी महत्त्वाचे कागद हरवले, त्यांना त्यांना शाहू छत्रपतींनी बडतर्फ केले.