व्याख्यानमाला-१९७६-४०

शाहू छत्रपतींनी देवस्थानाचा पैसा जनतेच्या शिक्षणासाठी उपयोगात आणला. जनार्दनाचा पैसा जनता जनार्दनासाठी वापरला. पिराचे उत्पन्नातून महालक्ष्मीच्या देवळात दिवाबत्ती करावयास लावले. हे धार्मिक ऐक्य ! धर्माचे व हृदयाचे ! देवस्थानाच्या इमारतींचा काही भाग शाळेकरता व चावडीकरता राखून ठेवला. आमचे पंतप्रधान कै. जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले की, शिक्षणाचे कार्य तुम्ही झाडाखाली केले तरी चालेल. कारण लक्षावधी मुलांची सोय करावयाची म्हणजे लक्षावधी शाळागृहे पाहिजेत.

आता दुस-या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी वळतो. प्रश्न आहे कामगारांच्या हिताचा, उत्कर्षाचा. १९१७ सालच्या आक्टोबरमध्ये रशियात क्रांती झाली. त्या क्रांतीकडे बोट दाखवून शाहू छत्रपती मुंबईतील कामगारांच्या प्रचंड सभेत नोव्हेंबर १९१८ साली म्हणाले, ‘पाश्चात्य देशात भांडवलवाले व मजूर ह्या पक्षांचे भांडण चालले आहे. ह्या युध्दाचा परिणाम मजूर पक्षाच्या हाती सत्ता जाण्यात झाला आहे. रशिया व जर्मनी ही निरंकुश सत्तेची मोठी पीठे होत. त्या ठिकाणी मजूर पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक राज्ये स्थापन झाली आहेत. इंग्लंडातही मजूर पक्षाचा जोर वाढत आहे. हॉलंड वगैरे तटस्थ राष्ट्रांवरही ह्या लाटेचा परिणाम झाल्यावाचून राहणार नाही. येथेही बहुसमाजाच्या मनाप्रमाणे चालाला पाहिजे. येथेही इंग्लंडप्रमाणे मजुरांचे संघ झाले पाहिजेत व सर्वास आपले हक्क काय आहेत हे कळले पाहिजे.’

कामगारांनी मजूर संघ काढून त्यांनी आपली शक्ती वाढवावी असे सांगणारा हा अभिनव राजा. ब्रिटिश साम्राज्यातील मांडलिक राजा आणखी स्पष्ट काय सांगणार ? कामगारांच्या हाती राजसत्ता यावी असे सांगणारा त्याकाळी भारतात सार्वजनिक नेता दुर्मिळच होता आणि राजा तर अगदी दुर्मिळच असणार असे म्हटल्यास चालेल. त्याकाळी पं. जवाहरलाल नेहरु, श्री. अ. डांगे किंवा मानवेंद्र रॉय यांचा भारतीय राजकारणात उद्य झाला नव्हता.

जोतीराव फुले व नारायणराव लोखंडे यांचे कामगार कार्य शाहूंनी पुढे नेले असेच म्हणावे लागेल. त्यावेळी टिळक म्हणाले होते की, आमच्या वेदान्तात कम्युनिझम आहे. शाहूंचे लक्ष जगात कोणते विचार पुढे चालेले आहेत, कोठे काय घडते आहे याकडे कसे बारकाईने लक्ष होते व ते कसे दूर दृष्टी होते हेही दिसून येते एवढे सांगून शाहू छत्रपती थांबले नाहीत. त्यांनी सांगितले की, पुरोहित गेले, आता पुढे राजेही जाणार!!

भारतात आता सर्व भारताचे असे वरिष्ठ (Supreme Court) न्यायालय आहे. ते तसे असावे अशी नरेंद्र मंडळाच्या वतीने छत्रपतींनी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी अनेक खटपटी केल्या. भारतमंत्री मॉन्टेग्यूसाहेब यांच्यापुढेही ती मागणी मांडली. हेतू हा की, इंग्रजी वरिष्ठ आधिका-यांना अरेरावांना कुठेतरी दणका द्यायची संधी असावी. त्यांच्या निर्णयाविरुध्द न्याय मागण्यासाठीही जागा असावी.

१६९० पासून १८३२ पर्यंत तंजावरच्या भोसल्यांच्या राजवाडयात मराठी नाटके होत असत. तेथेच मराठी नाटकाचा पाळणा हालला. तेथील व्यंकोजी भोसल्याच्या वंशजाने नाटके लिहिली. विष्णूदास भावे यांनी १८४३ पासून नाटके सुरू केली. छत्रपती शाहूंनी मराठी रंगभूमीचे संवर्धन केले. मराठी रंगभूमीच्या विकासात शाहू छत्रपतींनी महत्त्वाची कामगिरी बजावली. बालगंधर्व, केशवराव भोसले, दत्तोपंत हल्याळकरादी अनेक नटांना त्यांनी उत्तेजन दिले. गंधर्वांनी नाटकात पहिले काम केले तेव्हा स्वत: शाहू छत्रपती रंगपटाच्या कडेला बसलेले होते. छत्रपतीनी रंगभूमीला सामुग्री पुरविली. ज्या काळी महाराष्ट्रातील नटांना समाज एखाद्या महारोग्याप्रमाणे बहिष्कृत मानी त्याकाळी शाहू छत्रपती त्यांना जवळ करून त्यांच्या पंक्तीला जेवत असत. गायन क्षेत्रात तर त्यांनी फारच मोठी कामगिरी केली आहे. अलादियाखाँ यांना राजाश्रय देऊन त्यांनी केसरबाईना उत्तेजन दिले. खाँसाहेबांना सूरश्री केसरबाईना तालीम द्यावयास सांगितले. प्रसिध्द गायिका अंजनीबाई मालपेकर यांनाही उत्तेजन दिले व त्यांना अनेक वस्तू देऊन त्यांचा गौरव केला. कोल्हापूर हे सांस्कृतिक दृष्ट्या कलापूर बनविले.