शाहू हे महापुरुष होते. महापुरुष कोणाला म्हणावे? जो पुरुष आपल्या काळातील वाईट, अनिष्ट व अन्यायी मूल्ये काढून त्या जागी काळाला अनुरूप व न्याय्य अशी मूल्ये रूजविण्यासाठी अत्यंत कळकळीने, धैर्याने व त्यागाने झगडतो तो महापुरुष! समाजास हितकारक; कामगार, शेतकरी व दलित समाजाचा उत्कर्ष साधणारी व त्यांचे मानवी हक्क मान्य करणारी मूल्ये शाहू छत्रपतींनी आपले जीवित व तक्त धोक्यात टाकून रुजविण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच ते महापुरुष होत.
शाहू छत्रपतींनी सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन का केले हे आपण समजून घेतले पाहिजे. जेव्हा वर्णवर्चस्ववादी ब्रह्मवृंदांनी व त्यांच्या पाठीराख्या ब्राह्मण समाजाने वेदोक्त प्रकरणात छत्रपतींना हैराण केले, त्यांचा अपमान केला व महाराजांची मागणी धुडकावली तेव्हाच ते सत्यशोधक समाजाकडे वळले. महाराजांची ती मागणी कोणती ? वैदिक धर्माला सामाजिक समतेची बैठक देऊन वेदोक्ताचा अधिकार सर्व हिंदूंना देऊन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करावे अशी छत्रपतींची मागणी होती. ह्यास्तव त्यांनी वरिष्ठ समाजास मानवी समानतेविषयी कळकळीने आवाहन केले. वेदोक्ताचे निमित्ताने महराष्ट्रातील ब्राह्मणांना त्यांनी नवीन समाजरचनेच्या निर्मितीसीठी आवाहन केले. परंतु ते त्यांनी आपल्या वर्णवर्चस्ववादी वृत्तीमुळे धुडकावून लावले. नवीन विचारांची नवीन प्रेरणांची त्या धर्ममार्तंडांनी अशी वाताहत केली.
त्यामुळे साहजिकच शाहू छत्रपती सत्यशोधक समाजाकडे वळले. त्यांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची जी ज्योत तेवत होती ती प्रज्वलित केली. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना पैसा दिला, राजवाडयावरील विठ्ठलराव डोणे यांचे मासिक वेतन चालू ठेवून सत्यशोधक समाजाचे कार्य करावयास सांगितले. संस्थानचे मोठे अधिकारी भास्करराव जाधव, म. ग. डोंगरे, आण्णासाहेब लठ्ठे हे सर्व सत्यशोधक समाजाचे पदाधिकारी म्हणून कार्य करू लागले. जातिभेद व मूर्तिपूजा न मानणारा, ‘मानवाचा धर्म सत्यनीती एक’ असे मानणारा तो सत्यशोधक समाज. अस्पृश्यांचे निर्मूलन करून अस्पृश्यांना मानवी हक्क द्यावेत असे मानणारा तो समाज. त्यात ते पडले ब्रह्मण पुरेहिताशिवाय विवाह व इतर धार्मिक संस्कार करणारे महाराज साहजिकच सत्यशोधक समाजाकडे वळले. सत्यशोधकांना त्यांनी स्फूर्ती दिली. पैसा दिला. पाठिंबा दिला. छत्रपतींनी ब्रिटिश सरकारकडे त्यांची बाजू मांडली. सत्यशोधक चळवळ ही ग्रामीण भागा पर्यंत सुधारणा व ज्ञान घेऊन जाणारी भारतातील पहिली सामाजिक चळवळ होय. त्यांनी ग्रामीण भागात जागृती केली व यथामती शिक्षण प्रसाराचे कार्य केले.
पण महाराज आर्यसमाजाकडे का वळले ! सत्यशोधक समाजाचे कार्य जितके पुढे जावे तितके गेले नव्हते. त्याचे कार्यकर्ते मोठे प्रतिष्ठित बुध्दिवान पुढारी नव्हते. त्य़ांचे प्रचारकार्य ग्रामीण भागातच चाले. मोठ्या शिक्षणसंस्था ते उभ्या करू शकले नाहीत. आर्यसमाजिस्ट कार्यकर्ते हे मोठया शिक्षणसंस्था चालविणारे मोठे पंडित व विद्वान. सत्यशोधकांप्रमाणे अस्पृश्यता निवारण व सामाजिक समता ही तत्त्वे प्रस्थापित केली पाहिजेत असे ते मानीत. त्यामुळे शाहूंना ते आपल्या ध्येयाजवळचे वाटत. द्यानंदांना म. फुले यांनी सहानुभूती दाखवली होती. शिवाय शाहूंचा हेतू असा होता की, आर्यसमाजिस्ट सत्यशोधकांना समाजकार्यात साहाय्य करतील व शिक्षणप्रसार झपाट्याने होईल. त्याकाळी आर्यसमाज राजकारणात लक्ष देत नसे. ब्रिटिश सरकारही त्यांच्या शिक्षणसंस्थाना साहाय्य करी.
कुलकर्णी वतने शाहूंनी नष्ट केल्यामुळे, सत्यशोधकाची चळवळ वाढल्यामुळे व मॉन्टेग्यूच्या जाहीरनाम्यानंतर मद्रासकडील व त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाच्या चळवळीने राजकीय स्वरूप धारण केल्यामुळे राष्ट्रवादी ब्राह्मण पुढारी खवळले. ते ब्राह्मणेतरांशी धार्मिक व सामाजिक बाबतीत ब्राह्मण पुढारी म्हणून झगडले. शाहूंच्या चळवळीचा महाराष्ट्रातील राष्ट्रीय पुढा-यांना अडथळा होऊ लागला. त्यामुळे टिळकांनी चिडून जाऊन रागाच्या भरात वा. द. तोफखाने यांच्याबरोबर शाहू छत्रपतींना ‘तुमचा रँड करू’ असा निरोप पाठविला. असे व्हायला नको होते. टिळकांना रागाच्या भरात महाराज्यपाल मिंटो यांच्याविषयी असेच उद्गार काढले होते.