हिंदुधर्म व्यवस्थेत पुरोहितपणा हा जन्माधिष्ठित होता. त्यात एकाच विशिष्ट जातीचे पुरोहित असतात. इतर धर्मात तसे नसते. फुले व शाहू छत्रपती यांनी ह्या धार्मिक मक्तेदारीविरूध्द प्रचंड चळवळ केली. कोणत्याही जातीच्या लोकांना पुरोहित व्हायचा अधिकार असला पाहिजे, हा हक्क त्यांनी प्रस्थापित केला. म. फुले यांनी जन्माधिष्ठित पुरोहितगिरीच्या तत्त्वांशी न्यायालयात झुंज देऊन ते यापूर्वीच यशस्वी झाले होते. शाहूंनी मराठे व इतर समाजातील व्यक्तींना पुरोहित केले. त्यासाठी त्यांनी संस्कृत, वैदिक शाळा काढल्या नी जन्माधिष्ठित पुरोहितशाहीला मूठमाती दिली. जन्माधिष्ठित पुरोहितगिरी नसावी हे तत्त्व पुढे वीर सावरकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मान्य केले.
ख-या थोर पुरुषाची सहानुभूती ही व्यापक असते. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी हीच शिवाजी महाराजांची जशी इच्छा होती. तशीच छत्रपती शाहूंची होती. हिंदवी स्वराज्याचीही तीच कल्पना होती. शाहूंना वाटे, मुसलमानांचेही शिक्षण झाले पाहिजे. राष्ट्राचे ते ही अंग सुधारले पाहिजे. त्यांचे जीवन अज्ञानाच्या अ:धकारातून बाहेर पडले. पाहिजे. असे तत्त्व सांगणारा शाहू हा अधुनिक भारताला पहिलाच हिंदु राजा होय. त्यांनी मुसलमानांना शाळा काढून दिल्या, वसतिगृहे स्थापना केली. त्यांच्या शाळांना जमिनी व अनुदान दिले. एवढेच नव्हे तर त्यांच्या शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष झाले.
दुसरे असे की, शाहू छत्रपतींचे धार्मिक धोरण अत्यंत सहिष्णू होते, मुसलमानांच्या बाबतीतही ते सहिष्णू होते, पक्षपाती नव्हते. धार्मिक सहिष्णुता हे मोठया माणसाचे लक्षण आहे. आपल्या वंशातील महापुरुष शिवाजी यांच्या सहिष्णु धोरणाचे शाहू छत्रपती मोठे अभिमानी. शिवाजीला लुटीत वा लढाईत कुराण सापडले तर ते आदराने मुसलमान संस्थाना अर्पण करी. शिवाजी मुसलमान संतांना वंदन करी. शाहूंची कारकीर्द अशीच सहिष्णुतेविषयी प्रसिध्द होती. १८९४ साली शाहू छत्रपती आपल्या वयाच्या २४ व्या वर्षी पुण्याला गेले होते. तेथे मुसलमानांचा दंगा नुकताच होऊन गेला होता. पुण्यातील सत्काराला उत्तर देताना शाहू म्हणाले, “आपल्या प्रजेच्या बाबतीत व महाराष्ट्राच्या बाबतीत आपले कोणते कर्तव्य आहे हे सांगून त्यांनी त्या मुसलमानांच्या प्रश्नाकडे पुण्यातील नेत्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले, ‘आपण ह्या प्रश्नाच्या विवेकाने विचार करावा आणि शांततापूर्ण तडजोड घडवून आणावी.” धार्मित सहिष्णुता दाखवणारे शिवाजी व अकबर हे शाहूंना आदर्श राजे वाटत असत, त्याचे कारण शाहूंच्या अंगची धार्मिक सहिष्णुता ही होय. हे नवभारताला एक आदर्श उदाहरणच ठरावे.
धर्माच्या बाबतीत शाहू छत्रपतींनी आणखी एक क्रांतिकारक अशी सुधारणा केली. हिंदू लोक देवाला पैसे, सोने व संपत्ती अर्पण करतात. देवाला दागिन्यांची जरूरी नसते. आज त्या पैशांचा लक्षावधी गरिबांच्या दारिद्र्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होणार आहे. ह्या बाबातीत नवभारताला मार्गदर्शक ठरावी अशी शाहू छत्रपतींनी एक गोष्ट केली. आपल्या राज्यातील सर्व देवस्थाने दरबारच्या ताब्यात घेतली. देवस्थानांचे उत्पन्न हे समाजाची मालमत्ता आहे असे जाहीर केले. तेथील नोकर सरकारी नोकर गणले जाऊ लागले. अहो, एका तिरूपती मंदिरांचे उत्पन्न लाखो रुपये ! भारतातील सर्व देवस्थानांची संपत्ती समाजोध्दारासाठी सरकारने घ्यायचे ठरविले तर राष्ट्राची एक पंचवार्षिक योजना तडीस जाईल.