व्याख्यानमाला-१९७६-३७

राज्यशकट यशस्वीरीतीने हाकावयाचा असेल तर राज्यकारभारात सर्व त-हेचे लोक असावेत. एकाच जातीचा त्यात भरणा नसावा. इंगज वरिष्ठ अधिका-यांनी शाहूंना एकदा पत्र लिहून कळविले की, तुमच्या राज्यप्रतिनिधी मंडळामध्ये एकाच जातीचे कौन्सिलर नेमू नका. सर्व जातींच्या लोकांना शाहूंनी राज्यकारभारात घेतल्यामुळे राज्यकारभारात समतोलपणा आला व सर्वाच्या हिताकडे ते अधिकारी लक्ष देऊ लागले. मद्रासमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात तीन टक्के असणा-या ब्राम्हणांचे हाती सत्ता होती. राजपत्रित नोक-या त्यांना सत्तर टक्क्यांवर मिळत असत. तेथे ब्राह्मणांनी पारियांना म्हणजे अस्पृश्यांना ७० फूटांवर उभे केले तर शूद्रांना आपल्यापासून ३० फूटांवर उभे केले. त्याची प्रतिक्रिया कशी झाली ते आपण पाहतो. ती कशी होऊ नये पण झाली हे खरे. मद्रास प्रांतात ब्राह्मणांचे विरूध्द नायर आदी नेत्यांनी सामाजिक समतेची आणि सामाजिक प्रतिष्ठेची ज्वलंत चळवळ केल्यामुळे ब्राह्मणांची सभा व प्रतिष्ठा तेथे नष्ट झाली.

दक्षिण भारतात नर्मदेच्या खाली भारतात दोन ब्राह्मणेतर चळवळी झाल्या. महाराष्ट्रात महत्मा फुले आणि शाहू यांनी केलेली चळवळ व मद्रासमध्ये डॉ. नायर आणि मुदलीयार यांनी केलेली चळवळ. ह्या दोन्ही चळवळींमध्ये थोडा फरक आहे. दोन्हीमध्ये साम्य म्हणजे ब्राह्मणांची सत्ता व सामाजिक जुलमी रूढी यांविरूध्द त्यांनी केलेला झगडा व सामाजिक समता व मानवी हक्क हे ब्राह्मणेतरांना मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला झगडा यात साम्य आहे. परंतु मद्रासकडील चळवळीत ब्राह्मणांचा अतिशय  द्वेष केला गेला. तो इतका की त्यातील धग शाहूंनाही सोसवली नाही. कारण शाहूंनी वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांचा व ब्राह्मण्याचा द्वेष केला. ब्राह्मण सामाजाचा द्वेष केला नाही. कारण १९२२ साली सुध्दा कोल्हापुरात काही ब्राह्मण अधिकारी होते व शाहूंचे मित्र व सल्लागार हे ब्राह्मण होते पण ते ब्राह्मणवर्चस्ववादी नव्हते. मद्रासकडील ब्राह्मण चळवळीने आर्य व अनार्य आपल्या झगड्याला स्वरूप दिले. त्याचे कारण रामायणातील द्रविड लोकांचा उल्लेख वानर म्हणून केला आहे. म्हणून त्यांचा आर्यांवर राग आहे. फुले यांचा राग ब्राह्मण्यावर होता ब्राह्मणावर नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या चळवळीस दिलेले मानवतावादाचे स्वरूप महाराष्ट्रात परिणामकारक ठरले. हिंदवी स्वराज्य स्थापन करणा-या शिवछत्रपतींचे शाहू वारस होते, शाहू, फुले यांनी राष्ट्रात फुटीरपणाची वृत्ती जोपासली नव्हती. दक्षिणेकडील चळवळीने फुटाळ वृत्ती दाखविल्यामुळे त्यांचे मंत्रीमंडळही त्या कारणाने बरखास्त करावे लागले असे म्हणतात. शाहू तर महान देशभक्तांचे मोठे पाठीराखे होते, टिळकांना व अरविंदाना त्यांनी हजारो रुपयांची मदत केली. हे सर्वांना माहित आहेच.

शाहू हे देशभक्त, राष्टभक्त होते, त्यांच्या मृत्यूनंतर केसरीने म्हटले की शाहू पूर्वीच्या काळात जन्माला आले असते तर त्यांनी साम्राज्य स्थापन केले असते. निरुपाय म्हणून व काही वेळा इंग्रजांचे मांडलिक म्हणून शाहूछत्रपतींना काही इंग्रजांचे कायदे व हुकूम पाळावे लागत. परंतु त्यांना त्या परिस्थितीतसुध्दा मागासवर्गीयांच्या व अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी जे महान कार्य केले, ते नवभारताच्या इतिहासात अपूर्व व मार्गदर्शक असे ठरले. “गरिबांच्या उध्दाराचे कार्य करण्याची माझी इच्छा अनिवार झाली आहे. मी शक्यतो सर्व हक्कासाठी उपाय योजित आहे. ती माझी एक प्रकारची आत्मिक पवित्र भावना आहे आणि ती मंगल भावना मला पुढे जाण्यासाठी स्फूर्ती देत आहे. मी मागासवर्गीयांचे उन्नतीचे कार्यात थोडा जरी यशस्वी झालो, तरी मी माझे अंशत: जीवितसाफल्य झाले असे मानीन. आपण लक्षात ठेवा की, ज्या बोलक्या आणि चळवळ करणा-या लोकांची भीती सरकारलाही  वाटते, त्यांची मी खुशामत केली असती तर माझ्या वैयक्तिक जीवनात शांतता लाभून मी सुखी झालो असतो. पण मी तसे केले असते तर माझ्या कर्तव्यास मी चुकलो अशी माझी मनोदेवता मला सांगते.” असे ब्रिटिश राज्यपालाला लिहिणारा हा छत्रपती ह्द्यात ख-या राष्ट्रान्नतीची किती चिंता वाहत होता हे यावरून दिसत नाही काय ? मागासवर्ग व दलितवर्ग यांची उन्नती प्रथम केली पाहिजे हे सांगणारे शाहू नवभारताचेच उद्गाते होते.