व्याख्यानमाला-१९७६-३५

शाहू महाराजांनी तीन अभूतपूर्व व क्रांतिकारक घोषणा केल्या. पहिल्या घोषणेप्रमाणे त्यांनी असे जाहीर केले की, ‘आपल्या संस्थानातील मागसवर्गीयांना आपल्या राज्याच्या कारभारात ५० टक्के नोक-यांसाठी जागा राखून ठेवण्यात येतील’ त्यामुळे कोल्हापुरच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ३ टक्केही लोकसंख्या नसणा-या ब्राम्हणांच्या हाती जी कोल्हापूरच्या राज्यकारभारात सत्ता होती ती त्यांची सत्ता कमी होऊ लागली. त्या वेळी संस्थानामध्ये साठ ब्राह्मण अधिकारी होते, तर पाच-सहा ब्राह्मणेतर अधिकारी होते. सहाशे कारकुनांपैकी पाच-सहा जणच ब्राह्मणेतर होते व बाकीचे इतर व तत्सम समाजापैकी होते. बहुतेक ठिकाणी शिपाईसुध्दा ब्राह्मणच होते. शाहूंनी ब्राह्मणेतर समाजाला ही नवीन संधी मिळवून देताच अनेक ब्राह्मणेतर तरूण राज्यकारभारात अधिकारी होऊ लागले. ते अधिकारी स्वत: बहुजन समाजापैकी असल्यामुळे लोककल्याणासाठी अधिक झटू लागले. ब्राह्मणांच्या एकाच जातीच्या हाती जी राज्यकारभाराची सत्ता होती, ती कमी होऊन त्यात समतोलपणा येऊ लागला. राज्यकारभारात आपला ही काही भाग आहे असा ब्राह्मणेतरांना आनंद व अभिमान वाटू लागला.

शाहू छत्रपतींनी केलेली दुसरी घोषणा अशी की to enthrone the Indian Nation, We must dethrone Brahminism. जर आपणास राष्ट्रवादाची स्थापना करावयाची असेल, तर आपण ब्राह्मणशाहीचा नायनाट केला पाहिजे. ही ब्राह्मणशाही म्हणजे ब्राह्मणधर्म-इतर समाजास कमी लेखणारा, अस्पृश्यांस कमी लेखणारा, त्यांची मानवी प्रतिष्ठा न मानणारा, त्यांची मानवी समानता न मानणारा. यास्तव हिंदी नेत्यांना खरा राष्ट्रवाद स्थापावयाचा असेल तर त्यांनी अस्पृश्य गणलेल्या कोट्यावधी लोकांना शिक्षण देऊन त्यांची उन्नती केली पाहिजे. अस्पृश्यांचा उध्दार केला तरच राष्ट्राची खरी प्रगती होईल, असे शाहूंना वाटे.

तिस-या घोषणे प्रमाणे छत्रपतींनी असे जाहीर केले की, the peace and prosperity of the nation depends upon the elevation of the Backward and Depressed classes. ह्या देशाची शांतता आणि उन्नती ही मागासवर्ग व अस्पृश्य वर्ग यांच्या उन्नतीवर अवलंबून आहे. ज्या प्रमाणात ह्या वर्गांची उन्नती होईल त्या प्रमाणात राष्ट्राची उन्नती होईल, असे त्यांना वाटे. हल्ली वीस कलमी योजना भारतीय सरकारने जारी केली आहे. तिचे सूत्र हेच आहे. आशय तोच आहे, हे सांगावयास नको. ह्या तिन्ही घोषणा म्हणजे शाहू छत्रपतींनी केलेल्या नवभारताची मागंणी होय. आणि नवभारताची मागणी म्हणजे नवा भारत सामाजिक समता, समान संधी आणि मानवी हक्क सर्व वर्गांना समान असावेत अशा तत्त्वावर अधिष्ठित झाला पाहिजे ही होय.

त्या काळचे राष्ट्रवादी ब्राह्मण पुढारी केसे होते ते पहा. टिळकांचे ध्येय – धोरण कसे होते ते वर सांगितलेच आहे. राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ करणारे प्रा. विष्णु गोविंद विजापूरकर यांचे धोरण कसे होते ते पाहा – त्यांच्या समर्थ विद्यालयामध्ये जातिभेदाची कडक बंधने पाळण्यात येत असत. प्रा. विजापूरकर यांनी राष्ट्रीय शाळा व सरकारी शाळा यांतील फरक सांगितला आहे. ते म्हणतात, ‘ब्रिटिश सरकारी शाळा व राष्ट्रीय शाळा यात अंतर काय असे विचारणारे लोक आहेत. बळजबरीने धर्म सोडला जातो ती सरकारी शाळा, आणि चातुर्वर्ण्य व पुनर्जन्म या मूळ तत्त्वांवर अवलंबून असणा-या सनातन धर्माप्रमाणे चालणारी ती राष्ट्रीय शाळा, असे एक भेदक लक्षण पुरे लक्षात घ्यावे.’

विष्णू गोविंद विजापूरकर यांचे चरित्रकार गं. दे. खानोलकर यांनी विजापूरकरांच्या शाळेत कशी कडक जातिबंधने पाळली जात असत ते सांगून म्हटले की, ‘परस्परांच्या मनोभावना दुखवणारा जातिभेद व स्पृश्यास्पृश्य भेद राष्ट्रीय शिक्षण देऊ इच्छिणा-या संस्थांनी कायम ठेवणे हे राष्ट्रहितवर्धक कार्य नव्हे, राष्ट्रविघातक कार्य आहे म्हणून समर्थ विदयालयाचे नाव बदलून त्या विद्यालयाचे नाव द्रविड ब्राह्मण विद्यालय असे ठेवले असते तर चालले असते’ आपल्या देशबांधवांना कमी लेखणारी ही राष्ट्रभक्ती कसली ? विजापुरकरांनी सांगितलेले ‘चातुर्वर्ण्य व पुनर्जन्म यांचे मूळ तत्त्व याचा अर्थ पुन्हा उघड करून सांगण्याची जरूरी नाही. चातुर्वर्ण्यामुळे सामाजिक मतभेद व उच्चनीचता पाळली जाऊन माणसाची माणुसकी हिरावून घेतली जाते. पण पुनर्जन्माचे हे तत्त्व फार मोठे भयंकर आहे. पुनर्जन्म तत्त्वाप्रमाणे महार – मांगादी अस्पृश्यांना सांगण्यात येई की, ‘तुमचे पूर्वसंचितच खोट आहे; तुम्ही मागील जन्मात काही पापे केल्यामुळे ह्या जन्मात नशिबाप्रमाणे आलेले दैन्य भोगले पाहिजे.