व्याख्यानमाला-१९७५-२३

दरिद्री असल्यामुळे संचय वृत्ती होत नाही. आणि त्यामुळे भांडवल निर्मिती होत नाही. कोणताही उद्योगधंदा निर्माण करायचा, बेकार लोकांना रोजगार द्यायचा किंवा शेतीमध्ये विकास करायचा असा कुठलाही प्रश्न घ्या त्या करता आर्थिक निधी लागतो. हा आर्थिक निधी उबा करण्याचे आमचे सगळे अंदाज फसले. त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या बरोबरीला आपण येऊ शकलो नाही. आणि त्यामुळे औद्योगिक उत्पादनामध्ये आणि राष्ट्रीय उत्पादनामध्ये ज्या किमान आमच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पु-या झाल्या नाहीत. सबंध आर्थिक समालोचन मी करणार नाही. परंतु सद्यःस्थितीला जे महत्वाचे घटक कारणीभूत आहेत त्यामध्ये आमची कमालीची आर्थिक दुर्भिक्षता ही कशी कारणीभूत आहे हे मला मुद्दाम आग्रहपूर्वक सांगावेसे वाटेत. आपण २० वर्षे नियोजन केले. हे नियोजन ठिगळ लावण्यासारखं होतं हे मी का म्हणतो तर काही किमान अपेक्षा धरून आमची आर्थिक वाढ होईल. दरवर्षी अमुक इतकी होईल पण ती तशी काही झाली नाही. आमच्या आर्थिक विकासामध्ये ५ टक्के वाढ होईल अशी अपेक्षा आम्ही नेहमी धरत आलो. ती किमान होती. ही पांच टक्के वाढ झाली म्हणजे आमच्या सगळ्या जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणता येईल असेही नाही. कदाचित आपल्याला यासाठी १०० वर्षे लागतील. पण ही ५ टक्के वाढ सुद्धा आमची होऊन शकली नाही. तर निदान पहिल्या १० वर्षामध्ये ३ टक्के वाढ आणि दुस-या दहा वर्षामध्ये २।।। टक्के वाढ इतकीच झाली. आपण असं गृहित धरू या की दरवर्षी ३ टक्क्यांनी वाढ होते आहे पण त्याबरोबरच लोकसंख्या २।। टक्क्यांनी वाढत आहे. म्हणजे निव्वळ अशी झालेली आर्थिक वाढ ही अर्धा टक्कासुद्धा नाही. अतिशय जर्जर आणि क्षीण झालेल्या देशामध्ये अर्धा टक्का वाढ दरवर्षी होणार असेल तर साहाजिकच आपल्याला अनंत काळ या दारिद्र्यामधून बाहेर येण्यासाठी आपल्याला वाट पहावी लागेल.

आर्थिक दारिद्र्यातून वर येण्याकरता अनेक प्रकारची पथ्थे आपल्याला पाळावी लागतात.ही पथ्थे आपण पाळू शकलो नाही. आपले आपणचयाला अंशतःतरी जबाबदार आहोत. परदेशातले लोकही याला जबाबदार आहेत, त्यांनी आपले राजकारण चालवले, आपल्या शत्रूलाही मदत केली. परकीय अतिक्रमणें आली आणि त्यामुळे आपल्या योजनामध्ये खंड पडला. पाकिस्तानशी तीनवेळी युद्ध झाले. चीनचा धोका आहेच. त्यामूळे आपल्या संरक्षणावरचा खर्चही वाढत गेलेला आहे. एकच लक्षात घ्या की आपण सबंध पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे ३७ हजार कोटी रुपये आपण गुंतवणार आहोत हा खर्च अमेरिकेमधींल लष्कराचा केवळ एक आठवड्याचा असू शकतो. इतके अंतर त्या देशातील आणि आपल्या देशातील आर्थि परिस्थितीमध्ये आहे. आणि त्यामध्ये शिवाय इतर अडचणी आहेत जनतेने अमुक एक त्याग केला, इतकी बचत केली, इतकी भांडवल निर्मिती केली, अमूक एक शिस्त पाळली तर ३७ हजार कोटी रुपयांची पांचवी योजना पार पाडता येणार आहे. त्यामुळे ती यशस्वी होणार किंवा नाही याला मी महत्व देत नाही. कारण आपण अशा स्थितीत पोचलो आहोत. आपण इतके मरगळलेले झालो आहोत व आम्हाला नैराशाने इतके घेरलेले आहे की कित्येक लोक असे म्हणतात की आम्हाला प्रथम आर्थिकदृष्ट्या दारिद्र्याच्या रेषेच्यावर ताबडतोब यायला पाहिजे. अंधारात चाचपडाव किंवा अंधारामध्ये भिंतीवरच आपल डोक आपटत रहावं अशी आपली सर्वाची, स्थिती झाली आहे. सरकारची झाली आहे. तशीच विरोधी पक्षाची झाली आहे. जे लोक असं म्हणतात की आज या देशामध्ये सत्तारूढ पक्षामुळेच केवळ लाचलुचपत निर्माण झाली आहे भ्रष्टाचार निर्माण झाला आहे आणि त्याचा नाश करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे त्याच्याह जवळ विकासाचा स्पष्ट दिसणारा आर्थिक कार्यक्रम नाही. हे असाकरता मी सांगतोय की भिंतीवर अंधारामध्ये सगळेच लोक डोके आपटीत आहेत.