व्याख्यानमाला-१९७५-२८

राजकीय आंदोलन आणि प्रादेशिक निष्ठा या गोष्टींना सद्यःस्थितीत तरी वाव नसावा. त्यामुळे अनेक वर्षे हलाखीत जीवन काढलेल्या सामान्य माणसाचीही दिशाभूल मात्र करण्यासारखे होणार आहे. जागतिक राजकारणातही आपल्याला प्रतिष्ठेचे स्थान मिळवायचे असेल तर प्रथम आपण आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावयास पाहिजे. सात वर्षे युद्धात खिचपत पडलेल्या व्हिएटनामने देखिल बाहेरच्या देशाकडून धान्यासाठी भीक मागितली नाही. चारही बाजूंनी अरब राष्ट्राचा वेढा असूनही इस्त्रायलने स्वाभिमान दाखविला आहे. याचे मुख्य रहस्य म्हणजे या देशातील लोकांना दारिद्र्याची जशी चीड आहे तसाच स्वावलंबनाचा अभिमान आहे. लढण्याची जिद्द आहे आणि त्यासाठी राष्ट्र म्हणून एक संघ राहाण्याचा निर्धार आहे. असा हा प्रखर निर्धार ही सद्यःस्थितीतील गरज आहे. आणि म्हणूनच या दृष्टिने इंदिरा गांधींना देखील वेळ पडल्यास सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी पूर्वी घेतलेल्या प्रमाणे धक्का देणारे आणखी काही निर्णय यापुढे कदाचित घ्यावे लागणार आहेत. दूरगामी राष्ट्रीय हित डोळ्यांपुढे ठेवणा-या आजच्या पंतप्रधानांना ही गोष्ट करणे कठीण नाही. ज्या पंतप्रधानांनी बांगला मुक्त करून नेत्रदीपक विजय मिळविला त्यांना देशातील हे अंतर्गत शुद्धीकरण का करता येऊन नये हा एवढा प्रश्न साहाजिकच सध्याची त्रस्त अशी जनता विचारत आहे.

सद्यःस्थितीचे हे विश्लेषण प्रत्येक नागरिक सर्वसाधारणपणे याच दृष्टिने जवळ जवळ करत आहे. स्पेन, इटलीसारखी राष्ट्रे आळसामुळे व व्यसनाधिनतेमुळे मागे पडली. त्याचबरोबर जपान, जर्मनारखी राष्ट्रे केवळ शिस्तीमुळे, उद्योगामुळे पुन्हा २५ वर्षात समर्थ बनली. त्याचे रहस्य शोधून काढणे मोठे कठीण नाही. व त्यावरची उपाययोजना हीही सर्वांना माहीत आहे. आज म्हणून आपल्या राष्ट्राला जी गरज आहे ती जाणत्या व जबाबदार अशा अनुयायीवर्गाची, निर्धारपूर्वक काम करणा-या अशा यंत्रणेची, कष्ट करणा-या कामगारांची आणि शेतक-यांची, नवे तांत्रिक, वैज्ञानिक प्रयोग करणा-या शास्त्रज्ञांची. कल्पकतेने नवी बाजारपेठ मिळविणा-या आणि नवे उत्पादन करणा-या उद्योजकांची. सद्यःस्थितीवरील उपाययोजना ही अशी आहे. व म्हणूनच सामान्य माणसाला राजकीय क्रांती, राजकीय अशांतता संप आणि सत्याग्रह हे म्हणजे खरे आता नको आहेत. कारण त्यामुळे कमकुवत (weak) होत गेलेला आर्थिक प्रश्न सुटणार नाही. हे आव्हान पत्करणे आणि सद्यःस्थितीतून मार्ग काढणे हे तरुण पिढीच्या हाती आहे. ही तरुण पिढी कोणत्या संस्काराने आणि विचाराने प्रभावित होते यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणूनच जाणत्या नेत्याबरोबरच सामान्य माणसानेही सद्यःस्थितीची राजकीय भूमिका बाजूला ठेवून वस्तूनिष्ठपणे व डोळसपणे विचार करायला हवा. येथील व्याख्यानमालेच्या संयोजकांनी या दृष्टीने या विषयावर बोलण्याची मला संधी दिली हे मी माझे भाग्य समजतो कारण त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी अशात-हेच्या चाललेल्या वैचारीक मंथनातून नवे काहीतरी शिकण्याची संधी माझ्या सारख्याला मिळते. व म्हणूनच संयोजकांचे कृतज्ञापुर्वक आभार मानून मी माझे हे भाषण संपवितो.