व्याख्यानमाला-१९७५-२०

सद्यःस्थितीविषयीचे मुल्यमापन तरी कसे करायचे याच्या काही कसोट्या तरी आहेत का, सद्यःस्थिती चांगली आहे की वाईट आहे हे ठरविण्याच्या कसोटीचे काही एक गमक पाहिजे, कारण अमेरिकेतील कित्येक लोक आज वैभवामध्ये लोळताहेत आणि तरी देखील ते आज दुःखामध्ये आहेत. तिथले आर्थिक जीवन समृद्ध आहे, दर दोन माणसांमागे एक मोटारगाडी आहे. टेलिव्हिजन आहे आणि तिथला शेतकरी हेलिकॅप्टरने आपल्या शेतामध्ये जातो अशी वर्णने आपण ऐकतो, जपानसारखा दोन्ही युद्धामध्ये होरपळून निघालेला देश अवघ्या १०।१५ वर्षांच्या आत अमेरिकेच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि जपान देशामध्ये प्रत्येक शहरामध्ये इतके टेलीफोन आहेत की सध्या भारतामध्ये जितकी टेलिफोनची संख्या आहे त्याच्या दीडपट. इतके टेलिफोन एकेका शहरामध्ये तेथे आहेत. समृद्धीने हे सगळे वैभव आपण पहायला लागलो म्हणजे आपण थक्क होऊन जातो. सबंध जगाची स्थूलमानाने जर वर्गवारी केली तर अतिशय समृद्ध देश मध्यम वर्गातील देश आणि मागासलेला देश असे तीन गट पडतात आपण अतिशय मागासलेल्या वर्गामध्ये आहोत यात काही शंका नाही. पण जे समृद्ध देश आहेत  ते देश सुखी आहेत असे नव्हे. त्या देशामध्ये नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. औद्योगिक क्रांतीचा दुसरा टप्पा त्यांनी ओलांडला ही गोष्ट खरी आहे. आपण अजून शेणाच्या आमि मेणाच्या क्रांतीमध्ये आहोत. पोलदाची क्रांती, कोळशाची क्रांती, विजेची क्रांती, अशा अनेक प्रकारच्या क्रांत्या आपल्याला एकामागून एक पचवायच्या आहेत. पचवायची जिद्द आपण बाळगली होती. कारण आपण असे ठरवलं होत की ज्या वेळेला आपण स्वतंत्र झालो त्या वेळेला आम्ही शेणा-मेणाच्या क्रांतीतील लोक जरी असलो, जरी आमचा देश खंडप्राय असला, अठरापगड जातीचा असला अनेक धर्म अनेक भाषा असल्या तरीसुद्धा हा देश आम्ही एकसंघ ठेवू. या देशामध्ये लोकशाही ठेवू आणि आर्थिक पायाही मजबूत करू. जे लोक आपल्या देशाची अमेरिकेशी तुलना करतात ते लोक हे विसरतात की अमेरिका काय, जर्मनी काय, जपान काय किंवा ग्रेट ब्रिटन काय ह्या देशामध्ये गेल्या १०० वर्षांमध्ये हळूहळू औद्योगिक क्रांती होत गेलेली आहे. आणि आपण इतके मागासलेले असताना आपण सगळ्या औद्योगिक क्रांत्या एका पिढीत आपल्याला साध्य करायच्या आहेत. या सगळ्या पाश्चात देशामध्ये व्यापारी क्रांती अगोदर झाली होती. आणि पैसा उपलब्ध होता. सोन्याची चणचण नव्हती. या पाश्चात्य देशांमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली आणि जे लोक वैभवामध्ये लोळत आहेत या सगळ्या देशांमध्ये धर्माचा किंवा जातीचा किंवा भाषेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. राष्ट्राचे तुकडे होण्याचे भय कधी या देशात निर्माण झाले नाही. राष्ट्रीय प्रश्न कधी फारसे निर्माण झाले नाहीत. आणि म्हणून आर्थिक समृद्धी आणि वैभव हळूहळू ते मिळवत गेले. आणि आपल्याकडील परिस्थिती आपण जाणून घ्यायला पाहिजे. मुळामध्ये आपले राष्ट्र हे राष्ट्र होते किंवा नाही हा प्रश्न आपण स्वतःला कितीतरी वेळा विचारला आहे. ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या कारकिर्दीमुळे राजवटीमुळे आपली एकराष्ट्रीयत्वाची अस्मिता अधिक जागृत झाली आणि आपण एकसंघ राष्ट्र झालो. आणि हा विशाल महाभारत निर्माण झाला. पण त्याबरोबरच अनेक समस्याही ब्रिटिशांनी आपल्यापुढे ठेवून दिल्या. धर्मांधता आहे. जातीयता आहे. स्पृशास्पृश्यता आहे. सामाजिक मगासलेपणा आहे. अंधश्रद्धा आहे. अनेक प्रकारच्या सामाजिक राष्ट्रीय समस्या तर आहेतच परंतु आर्थिक दुर्भिक्षताही आहे. किती लोक गरीब आहेत आपल्या देशामध्ये आपण ‘गरीबी हटाव’ हे ध्येय ठेवले आहे पण गरीब कोणकोण व किती असावेत? आज १९७५ मध्ये, ह्या देशामध्ये ४० टक्के लोक दारिद्र रेषेच्या खाली आहेत. २४ कोटी लोक भारतामध्ये अजून असे आहेत की ज्यांना दोन वेळेला पुरेसे जेवायला मिळत नाही. ज्यांना दररोज ५० पैशांपेक्षा जास्त पैसे खर्च करता येत नाहीत. म्हणजे आजच्या किंमतीच्या मानाने! असेही लोक आपल्या देशामध्ये आज ६० टक्के आहेत. म्हणजे भयानक दारिद्र आहे. दारिद्र्यही आणि विषमताही आहे. आणि दुस-या टोकाला इन्कम टॅक्स भरणारे लोक फक्त एक टक्का या देशामध्ये आहेत. अशा या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक तिन्ही क्षेत्रांमध्ये अनेक समस्या बरोबर घेऊन जन्माला आलेला आपला देश अवघ्या २५ वर्षांमध्ये एकदम पाश्चात्य देशांची बरोबरी करू शकेल अशी अपेक्षा करणे मला थोडसं गैर वाटते. परिस्थिती चांगली आहे असं प्रतिपादन करण्याचा आग्रह नाही. मी सुरवातीलाच आपल्याला सांगितले की आपल्याला सर्व कंगोरे बघायचे आहेत. पण ते बघताना आपली दृष्टी समतोल हवी आहे, एक समाजशास्त्राचा विचार करून मी ज्या वेळेला मूल्यमापनाच्या कसोट्या लावून मी माझ्या देशाची प्रगती काय आहे आणि आज माझ्या देशाच्या समस्या काय आहेत असं जेव्हा बघतो तेव्हा मला आजपर्यंतच्या प्रगतीचे खूप उत्साहवर्धक चित्र दिसते. १९४७ साली मोठमोठ्या पाश्चात्य आणि पौर्वात्य साम्यवादी देशातील तत्त्वज्ञान्यांनी असं भाकित केलं होतं की भारताचे पाच दहा वर्षात अनेक तुकडे होतील.