व्याख्यानमाला-१९७५-२५

जयप्रकाशांच्या आंदोलनासंबंधी सद्यःस्थितीत विश्लेषण करावेच लागणार आहे. जयप्रकाश ज्या वेळेला असे सांगतात की अमूक एका ठिकाणी भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत आहे, पण त्यांच्याजवळ असा विशिष्ट विधायक आर्थिक कार्यक्रम काय आहे की जो योग्य आर्थि आणि सामाजिक दास्यातून या देशाला मुक्त करू शकेल? या विषयी सुस्पष्ट असे दिग्दर्शन अद्यापतरी त्यांनी केले नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये जयप्रकाशजींनी जे आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन दिशाहीन वहात जाणा-या प्रवाहासारखे वाटते. सत्तारूढ पक्षाला कदाचित जाग निर्माण करायला उपयोगी होईल. सत्तारूढ पक्षाला जबाबदारीविषयी जाणीव करून देणरा समर्थ अस विरोधी पक्ष या देशात निर्माण होऊ नये असे लोकशाहीवर प्रेम असणारा कोणीही नागरिक म्हणणार नाही. गेल्या २५ वर्षात ग्रेटब्रिटन किंवा अमेरिका या देशातल्याप्रमाणे समर्थ संघटित व जबाबदार असा विरोधी पक्ष विरोधी नेत्यांना दुदैवाने निर्माण करता आला नाही. कसेही करून सत्तारूढ पक्षाला सत्ताभ्रष्ट करणे हे एवढे एकच ध्येय ठेवण्यामुळे विरोधी पक्षांना जरी सत्ता मिळाली तरी देशाचा पद्धतशीर विकास करता येणार नाही. याशिवाय आपल्या घटनेचे स्वरूप असे होते की केवळ काही राज्यामध्ये विरोधी पक्षाची सरकारे प्रस्थापित झाली तरी सबंध देशाचा एकसंघ असा आर्थिक विकास त्यांना करता येणार नाही.

या देशात कोणत्याही पक्षाचे का होईना परंतु ते सरकार भक्कम आणि संघटित असणे आवश्क आहे. केंद्र सरकार संघटित असणे आवश्यक आहे. केंद्र सरकार दुर्बल झाल्यास देशाच्या आर्थिक विकासात तर फारच अडचण निर्माण होईल. परंतु या खेरीज गेल्या २५ वर्षात लष्कराने दाखविलेला एकजिनसीपणा हा देखील नाहीस होण्याचा धोका राहील. केंद्रसत्ता दुर्बल झाल्यास कांहीना आपल्याकडे लष्करी शासन येईल असे वाटते. ही लष्करशाही धोक्याची व हुकूमशाहीची ठरेल. हे तर खरेच आहे. परंतु शिवाय अशी लष्करशाही आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिवर्तन करू शकणार नाही. असा आजपर्यंतचा इतर देशातील लष्करशाही राजवटीचा अनुभव आहे. आपल्या देशांत लष्करशाही प्रस्थापित होईल असा धोका वाटत नाही, परंतु देशाच्या कांही भागांत संकुचित ध्येयाच्या आहारी गेलेले प्रादेशिक पक्ष बळकट झाल्यास आपल्या देशातून एखादा प्रांत फुटून मात्र निघण्याचा धोका राहील, आजच्या सध्याच्या महागाईने त्रस्त झालेल्या आणि आर्थिक विषमतेमुळे बेजार झालेल्या लोकांना प्रादेशिक पक्ष किंवा लष्करशाही नवीन आर्थिक क्रांती देऊ शकणार नाही, हा सगळा संभाव्य धोका डोळ्यापुढे ठेवून जयप्रकाशजींच्या आंदोलनाकडे आणि त्यातून निर्माण होणा-या संभाव्य धोक्याकडे आपण बघायला हवे.

मी असे जेव्हा म्हणतो तेव्हां सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे अपयश किंवा त्या पक्षाजवळ असलेली कांही वैगुण्ये डोळ्याआड करतो असे नव्हे. कांही स्वार्थी हेतूमुळे अनेक लोक आणि गट काँग्रेस पक्षाला येवून मिळत गेले. काँग्रेस पक्षामध्ये शिस्त बाळगणारे, कष्ट करणारे, उद्योगी व नवीन जीवनदृष्टी असणारे असा नवा अनुयायी वर्ग तयार झाला नाहीत काँग्रेस पक्ष म्हणजे एक अनेक प्रकारच्या वृत्तींचा स्वार्थी लोकांचा कडबोळे होऊन बसेल. अशा आळशी आणि स्वार्थी अनुयायांकडून समाज प्रबोधनाचे कार्य निर्माण करणे नेत्यांना अशक्यच आहे. विरोधी पक्षाजवळ चांगला कार्यक्रम नसल्यामुळे व विरोधी पक्षही अनेक प्रकारचे छोटे छोटे निर्माण झाल्यामुळे प्रत्येक निवडणूकीत त्यातल्यात्यात काँग्रेस पक्षाला अधिक मते मिळाली. आणि या मुळेही प्रांतिक आणि जिल्हा पातळीवर कित्येक काँग्रेस नेते निवडणूकीतील यशाचे धुंदीने गाफील झाले. आणि म्हणूनच त्यातून ठिकठिकाणी लाचलुचपत, भ्रष्टाचार, काळा बाजार, चोरटी आयात इत्यादि आर्थि गुन्हेगारी करणा-या समाजकंटकांनी काँग्रेमध्ये शिरून काँग्रेसचे नांव बदनाम केले.