व्याख्यानमाला-१९७५-२४

कोणाला मार्ग सापडलेला आहे असे नाही. फक्त चिडल्यामुळे, नैराश्यामुळे, मरगळल्यामुळे आम्हाला असं वाटतं की सत्तांतर करून पाहू या. इतकी वर्षे एकाच पक्षाने सत्ता भोगली आता दुस-याच्या हातात सत्ता दिली तर काही बदल होतो का काय पाहू या. ज्याला पाहायचे असेल त्यांनी जरूर पहावं कारण आपल्याकडे अजून लोकशाही आहे. मत स्वातंत्र्य आहे. परंतु या प्रयोगामुळे, सत्ता बदलल्यामुळे परिस्थितीमध्ये फरक पडणार आहे असं नाही. ज्या स्थितीला आपण येऊन पोचलो आहो, ज्या स्थितीला सर्वसामान्य जनता मग ती कुठल्याही राजकीय पक्षाची असो, विटली आहे. सर्वसामान्य जनता प्रथम राजकीय दृष्ट्या विचार करीत नाही, आर्थिक दृष्ट्या करते. सर्वसामान्य जनतेच्या मर्यादा, राष्ट्राच्या काही स्वाभाविक मर्यादा, काही कारणांमुळे निर्माण झालेले आजचे आतंरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय वातावरण अशा अनेक गोष्टींमुळे आज आपण थोड्याशा मरगळलेल्या परिस्थितीला आलेलो आहोत. आणि म्हणूनच सद्यःस्थितीतून मार्ग काढावयाचा असेल, स्वालंबी बनावयाचे असेल, प्रत्येक योजनेमध्ये स्वालंबी होणार आहोत असं उद्दीष्ट आपण लिहिलेलं आहे. पण ख-या अर्थाने स्वालंबी आपल्याला व्हायचं असेल, तर एकदम दोन आघाड्यावर आपल्याला लढावं लागेल. पहिली आघाडी ही की जे गरीब आहेत त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर जावयास पाहिजे. उत्पादनात वाढ न्यावयास पाहिजे. उत्पादन वाढ मग ती कोणीही करो आर्थिक क्षेत्रातील लोकांनी करो, सहकारी क्षेत्रातील लोकांनी करो, सार्वजनिक क्षेत्रातील लोकांनी करो, शेतक-यांनी करो, बागायतदारांनी करो, कोणीही करो, इथं राजकीय तत्त्वज्ञान नको, उत्पादनात वाढ, उत्पादनाच्या क्षमतेत वाढ, ही आम्हाला हवी ती आम्ही केलेली नाही. चीनमध्ये ती तशी झालेली आहे. चीनमध्ये प्रत्येक खेड्यामध्य आज पोलादाच्या भट्ट्या निघाल्या आहेत. आणि आमच्याकडे दुर्गापूर, राउरकेला, बोकारी, भिलाई अशा ३।४ ठिकाणी पोलादाच्या भट्ट्या निघाल्या की आम्हाला खूप केल्यासारखे वाटते.

जे निर्माण झाले आहे ते कमी असले तरी जे आहे त्याचा वापर आम्ही नीट करत नाही. या चीनचे उदाहरण सांगावयाचे झाले तर तेथे सिमेंटचा तुटवडा आहे. म्हणून अजूनही नवचीनमध्ये घराला सिमेंट वापरू देत नाहीत. अस माझ्या वाचण्यात आल आहे. घराला अजून चुनाच वापरला जातो. सिमेंट जर वापरायचे असेल तर त्याचा अग्रक्रम ठरलेला आहे. हे अग्रकम आपण पाळत नाही. मुंबईमध्ये आज गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. थिएटर्स उभी रहात आहेत तिथे सिमेंट वापरल जात आहे. म्हणजे ही आघाडी दोन प्रकारची आहे. आम्ही सगळे दुर्भिक्षित आहोत. दरिद्री आहोत. सगळ्याना दारिद्र्याच्या रेषेच्या वर यायला पाहिजे त्या करता उत्पादनात वाढ व्हायला पाहिजे पण निर्माण झालेले उत्पादन एका विशिष्ट अग्रक्रमाने वापरायला पाहिजे. मग ते खाद्य पदार्थ असो, सिमेंट असो पोलाद असो आणि दुस-या बाजूला जे समृद्धीच्या शिखरावर केवळ बडे लोक आहेत अशा लोकांना त्याग करायला लावला पाहिजे. प्रसिद्ध अर्थशास्त्र डॉ. वि. म. दांडेकर आणि श्री. पालखीवाला हे जे आजचे अर्थशास्त्र मांडतात ते लक्षात घ्या व या दोघांचेही या बाबतींत एकमत आहे की आर्थिक विषमता जर नष्ट करायची असेल तर वरच्या २० किंवा ३० टक्के लोकांचे उत्पन्न आजच्या २० टक्के लोकांना दिले तरी आर्थिक समतोल निर्माण होऊ शकेल. या बाबतीत आम्ही विशेष असे काही करू शकलो नाही. २० वर्षांमध्ये नियोजन ख-या अर्थाने झाले नाही. मी हे या करता म्हणतो की त्या करता लागणारी आर्थिक त्यागाची तळमळ ज्या वर्गाने दाखवायला पाहिजे, मग तो भांडवलदार असो, बागायतदार असो, सधन शेतकरी असो त्या वर्गाने ही तयारी दाखविली नाही आणि त्या वर्गाला तयारी दाखविण्याचे धैर्य हेही आपल्या विरोधी पक्षाने दाखविले नाही. सत्तारूढ पक्षाने दाखविले नाही जर आर्थिक आघाडीवर यश मिळवायचे असेल तर विरोधी पक्षाजवळ सुद्धा सुस्पष्ट असा आर्थिक कार्यक्रम असायला हवा.