भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-३६

आम्हाला शक्य आहे तेवढे सर्व प्रयत्‍न होत असताना ते होत नाहीत असे म्हणावयाचे असेल तर यशाचे सूत्र तरी काय? आम्ही एक सूत्र ठरवून त्याप्रमाणे हजारो लोक काम करीत आहेत. पण हा प्रश्नच इतका मोठा आहे की, त्याला आणखी किती तरी काल लागेल. आमच्या दृष्टीने एक सूत्र घेऊन आम्ही हजारो लोकांना निवारा देण्याचा प्रयत्‍न करीत आहोत, त्यांना शक्य तितकी मदत करीत आहोत. हे आमचे मानवी सूत्र आहे. आम्ही इतके केले आहे. सर्व माणसांना निवारा आहे. प्रत्येकाला खोली मिळाली आहे. काही म्हणतात अजिबात पत्रे नाहीत. हे खरे नाही. पुष्कळ घरांवर पत्रे आहेत. जी माणसे अजून मंडपात राहतात त्यांच्या बाबतीत तशी स्थिती असेल. परंतु या माणसांनाही मे अखेरपर्यंत बंदिस्त घरांमध्ये नेले जाईल. त्यासाठी जे बांधकाम चालू आहे ते लवकरच पुरे होईल. मी नुकताच पुण्याला गेलो होतो तो एवढयासाठीच. गेल्या दोन-अडीच महिन्यात गेलो नव्हतो. कारण इलेक्शनच्यावेळी मंत्री आले अशी टीका झाली असती. आता इलेक्शननंतर गेलो तर इलेक्शननंतरही पुण्याच्या जनतेला आम्ही विसरलो नाही हे दाखविण्यासाठीही मी तेथे गेलो असेही म्हटले जाईल. पुण्याला एप्रिल मे मध्ये वादळ झाल्यास लोकांना त्रास होईल म्हणून काय करणे आवश्यक आहे याचा विचार आम्ही केला आहे. मंडपात रहात असलेली माणसे तातडीने बंदिस्त घरात जावी म्हणून महाराष्ट्र हौसिंग बोर्डाकडून घरे बांधण्याचे काम चालू आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन पहा. इतके आम्ही केले आहे व करीत आहोत तरी आमचे सन्माननीय मित्र श्री. गोगटे म्हणतात की टोट्ल फेल्युअर आहे. कितीही प्रयत्‍न केले तरी श्री. गोगटे यांचे समाधान आपण करू शकणार नाही अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण होणे बरे नाही. सन्माननीय सभासद श्री. गोगटयांचे समाधान आपण करू शकू ही भावना माझ्या मनात निर्माण झाली तर ती चांगली गोष्ट होईल. गेल्या पाच वर्षांत आम्ही चांगला कारभार करण्याचा प्रयत्‍न केला आहे आणि करीत आहोत. श्री. गोगटे हे एक जबाबदार गृहस्थ आहेत. तेव्हा आम्ही जे प्रयत्‍न करीत आहोत, त्या प्रयत्‍नांच्या बाबतीत प्रती सहकाराची भावना ते ठेवतील अशी मला आशा आहे. 

त्यानंतर रत्‍नागिरी येथे नाविक शाळा काढण्यासंबंधीचा उल्लेख झाला. हा प्रश्न अनेक वेळा चर्चेला आला होता. रत्‍नागिरी येथे नाविक शाळा पाहिजे ही मागणी पूर्वीही केली आहे. परंतु त्यात काही अडचणी आल्या. द्विभाषिक असतानाच प्रथम ही मागणी करण्यात आली. ही मागणी मला मंजूर आहे. या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविण्याचे गुणधर्म तेथील लोकांमध्ये आहेत हे खरे आहे. तेव्हा याचा जरूर विचार केला जाईल.

निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीसंबंधी उल्लेख करण्यात आला. त्याबाबत कोठे काय झाले ते मला माहीत नाही. परंतु अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हे निवडणुका आल्या आणि नाही आल्या तरी काम करीत राहणार. निवडणुकीच्या काळात अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे काम थांबविता येत नाही. डिसेंबर जानेवारीत काही प्रश्न निर्माण झाले तर ते सोडवावेच लागतील. निवडणूक आली म्हणून काम करू नये असे होऊ शकत नाही, निवडणुकीच्या वेळी लोकांचे बरे केले तर ते उगाच आपल्याला मते देतील म्हणून बरे करू नये असे करता येणार नाही. परंतु या सर्व टीकेच्या बाबतीत माझा मोठा आक्षेप आहे. बर्‍याच वेळा बोलले जाते की लोकांनी अमुक केले, तमुक केले, दडपशाही झाली, लाचलुचपत झाली वगैरे. असे बोलणार्‍याना मला असे विचारावयाचे आहे की यामध्ये महाराष्ट्रातील जनतेची निंदा होत नाही काय? दडपशाहीला भिऊन किंवा लाचलुचपतीला बळी पडून मते देईल इतकी महाराष्ट्रातील जनता अवनतीला गेली आहे काय? गेल्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील जनतेने आम्हालाही बाजूला फेकले होते. आता त्या जनतेने काँग्रेसचा स्वीकार केल्याबरोबर ती इतकी बिघडली आहे असे म्हणणे बरोबर होईल काय? याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेचे अंतःकरण त्यांना समजले नसले पाहिजे. विरोधी पक्षांचे लोक काँग्रेसवाल्यावर टीका करतात तेव्हा ती गोष्ट मी समजू शकतो. परंतु निवडणुकीत आम्ही जो विजय मिळविला तो सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून आणि पैशाचा उपयोग करून मिळविला असे म्हणणे म्हणजे त्या जनतेचा अपमान आहे. सरकारी यंत्रणेबद्दलही अशा तर्‍हेने बोलणे बरोबर नाही. सरकारी यंत्रणा निःपक्षपाती आहे हे मी सांगू शकतो. मला तिचा अभिमान आहे. आपण जर व्होट्स पाहिली आणि त्यांचे अ‍ॅनालिसिस करून पाहिले तर आपल्याला असे दिसून येईल की सरकारी अधिकार्‍यानी जरूर मंत्र्यांच्या विरुद्धदेखील मते दिली आहेत. तेव्हा असे म्हणणे की काँग्रेस पक्षाने सरकारी यंत्रणा वापरली, मतदारांना धाकदपटशा दाखविला हे मुळीच बरोबर नाही. असे म्हणणे म्हणजे इलेक्शनचा अर्थ समजून घेण्याचे नाकारणे किंवा जनमनाचा कानोसा समजून घेण्याचे नाकारणे होय. अशा तर्‍हेने निवडणुकीचा वास्तविक अर्थ समजून घ्यावयाचा नाही असे जर विरोधी पक्षांनी ठरविले तर ती लोकशाहीला पोषक अशी गोष्ट होणार नाही. निवडणुकीत पराभव झाला तरी तो धैर्याने स्वीकारला पाहिजे आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. यावेळी आमच्या पक्षाचा जय झाला असला तरी मागच्या निवडणुकीत आम्हालादेखील कित्येक ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता. परंतु आम्ही तो धैर्याने स्वीकारला, आम्ही त्या निवडणुकीत जे लोकमत प्रकट झाले त्याचा अर्थ समजून घेतला आणि तो समजून घेतल्यामुळे आमचा यावेळी विजय झाला. विरोधी पक्षांनीदेखील आपल्या पराभवाचा अर्थ अशाच तर्‍हेने समजून घेतला पाहिजे. कशामुळे आपला पराभव झाला, त्याची काय कारणे आहेत हे विरोधी पक्षांनी समजून घेतले पाहिजे. त्या पराभवाला काहीतरी पॉझिटिव्ह अर्थ आहे. हा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे. त्यांच्याविरुद्ध एवढे जे लोकमत तयार झाले त्याला काहीतरी अर्थ आहे. आमच्यावर जी टीका होते ती आम्ही सहन करतो. परंतु निवडणुकीत जनतेने जो कौल दिला त्याचा राजकीय अर्थ समजून घेतला नाही तर त्यामुळे जनतेवर अन्याय केल्यासारखे होईल आणि ते एक देशाचे दुर्दैव ठरेल.