भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-३३

४३

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा* (२० मार्च १९६२)
--------------------------------------------------------------
चर्चेस उत्तर देताना मा. श्री. यशवंतराव चव्हाण यांनी सरकारच्या धोरणाचे समर्थन केले व ग्रामीण विकास व समाजवादी समाजरचनेवर भर दिला जाईल असे आश्वासन दिले.
---------------------------------------------------------------------------
*M.L.C. Debates, Vol, Part II, 20th March 1962, pp. 62-69.

अध्यक्ष महाराज, नामदार राज्यपाल महोदयांचे त्यांच्या अभिभाषणाबद्दल आभार मानणार्‍या ठरावावरील काही भाषणे मी प्रत्यक्ष ऐकली आहेत आणि काही भाषणांचा सारांश मी पाहिला आहे. या भाषणांचा सामान्यपणे जो सूर होता त्यामध्ये राज्यपाल महोदयांच्या भाषणातील महत्वाच्या गोष्टींचे स्वागतच केले आहे. अर्थात काही टीकाही केली गेली आणि त्या टीकेचा विचार केला पाहिजे. या भाषणाच्या स्वरूपाबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती मी स्पष्ट करू इच्छितो. सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणारे राज्यपाल महोदयांचे हे पहिलेच भाषण आहे. अशा वेळी महत्त्वाच्या प्रमुख अशा धोरणांचे यामध्ये स्पष्टीकरण असावे अशी अपेक्षा असते. परंतु निवडणुकीत मतदारांनी यापूर्वीचे असणारे सरकार परत अधिकारावर आरूढ करण्याचा आदेश दिल्यामुळे महत्त्वाच्या क्षेत्रातील कामे जुन्या वळणानेच चालू राहणार आहेत. फक्त मतदारांशी निवडणुकीत प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे ज्या प्रश्नांची तीव्रतेने जाणीव झाली किंवा दरम्यानच्या काळात जे नवीन प्रश्न, नवीन समस्या निर्माण झाल्या त्यांच्या आधारावर काही गोष्टींचा उल्लेख करण्याची गरज होती तो उल्लेख राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणात केला आहे. त्या दृष्टीने राज्यपाल महोदयांच्या सबंध भाषणाचे स्ट्रक्चर, रचना पाहिली तर त्यामध्ये निवडणुकीसंबंधीचा पहिल्या परिच्छेदामधील उल्लेख संपल्यानंतर या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेशी प्रस्थापित झालेल्या संपर्कातून जे महत्वाचे प्रश्न पुढे आले त्यांचा उल्लेख करण्याचा प्रयत्‍न केला आहे असे दिसून येईल. त्यासंबंधी जी टीका झाली तिचा मी जरूर उल्लेख करणार आहे. काही सन्माननीय सभासदांनी धोरणाच्या मूलभूत प्रश्नासंबंधी चर्चा केली. सन्माननीय सभासद श्री. फाटक यांनी सैद्धांतिक समाजवादाचा उल्लेख करून सरकारच्या धोरणावर टीका केली. त्यांना काय म्हणावयाचे होते हे माझ्या लक्षात आले नाही. परंतु सरकार ज्या मार्गाने समाजवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न करीत आहे तोच मार्ग योग्य आहे असा सरकारचा विश्वास आहे. त्यांनी आपल्या भाषणात ''सधन शेतकरी'', ''सधन शेतकरी'' असा शब्दप्रयोग केला आणि म्हटले की सहकारी चळवळीचा प्रमुख ''सधन शेतकरी'' आहे. कोणत्या अर्थाने त्यांनी हा शब्दप्रयोग केला हे मला समजत नाही. ५-१० एकर जमिनीचा मालक जो शेतकरी आहे त्याला कोणी सधन शेतकरी म्हणणार नाही. तेव्हा सधन शेतकरी असे म्हणण्यात काही अर्थ आहे काय? महाराष्ट्रातील शेतकरी समाजाबद्दल त्यांच्या काहीतरी चुकीच्या कल्पना आहेत.

कारण महाराष्ट्रामध्ये सधन शेतकरी नाहीत. कदाचित ते महाराष्ट्रातील शेतकर्‍याबद्दल बोलले नसावेत. परंतु महाराष्ट्रातील शेतकर्‍याना उद्देशून त्यांनी तो शब्दप्रयोग केला असला तरी मी जरूर असे म्हणेन की, आम्ही त्या शेतकर्‍याचे प्रतिनिधी आहोत आणि यापुढेही त्यांचे प्रतिनिधी राहू इच्छितो आणि आम्हाला शेतकर्‍याचे कल्याण करावयाचे आहे. अर्थात शेतकर्‍याचे कल्याण करीत असताना इतरांचे अकल्याण होणार नाही, इतरांचाही फायदा व्हावा अशी आमची भूमिका आहे. सहकारी चळवळीमध्ये महाराष्ट्र पुढे आहे असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ते केवळ साखर कारखान्यांच्या दृष्टीने म्हणतो असे नाही. महाराष्ट्रात सहकारी चळवळीने अनेक क्षेत्रात प्रवेश केला आहे. इंडस्ट्रियल किंवा बँकिंग सिस्टिम या सगळया क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षांत सहकारी चळवळीने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. तेव्हा महाराष्ट्रातील आर्थिक प्रश्नांचा निःपक्षपातीपणाने विचार करावयाचा असेल तर तो पूर्वग्रहरहित दृष्टीने केला पाहिजे. सहकारी साखर कारखान्यांचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांची सामाजिक परिस्थिती आपण जरूर पाहिली पाहिजे. कोणत्याही अर्थाने आपण म्हणता तशी तुलना करता येत नाही. तेव्हा चुकीच्या कल्पना मनात ठेवून परिस्थितीचे अनुमान करू नये असे मला म्हणावयाचे आहे. आपण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे सार कृपा करून समजून घ्यावे म्हणजे विरोधी पक्षाला आपले काम करताना सामर्थ्य वाढविता येईल. आज त्यांचे सामर्थ्य वाढत नाही याचे कारण चुकीचे पूर्वग्रह मनात ठेवून तो पक्ष विरोध करीत आहे.