भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-२७

आता पोलिसांना लाठीमार का करावा लागला या मुद्याकडे मी येतो. खालच्या सभागृहात मी जी हकीगत सांगितली त्यातील मुख्य भाग असा आहे. त्या दिवशी चौपाटीवरून निघालेला मोर्चा ६.५० ला तेथे पोहोचला. पोलिसांची साखळी तयार होईपर्यंत सात वाजण्याची वेळ आली होती. माझे सन्माननीय मित्र, श्री. गायकवाड, यांनी १०० यार्डांची बंदीची जी मर्यादा होती तेथपर्यंत मोर्चा पोहोचलाच नव्हता असे सांगितले. माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांनी मोर्च्याला ८० यार्डांपर्यंत येऊ दिले होते. काही तरी कुभांड रचावयाचे आणि पोलिसांच्या कृत्याची चौकशी करण्याची मागणी करून पोलिसांमध्ये शिथिलता आणावयाची असे काही लोकांच्या मनात आहे की काय अशी मला शंका येते. आपल्याला ही गोष्ट स्वीकारावी लागेल की बंदीची मर्यादा होती तेथेच पोलिसांनी मोर्च्यातील लोकांना अडविले होते. त्यानंतर लाठीमार झाला. काही लोकांना जखमा झाल्या हे मी कबूल करतो. परंतु सुरुवातीला ज्या अधिकार्‍याने मोर्च्यातील लोकांना तुमच्यापैकी दोघांना तुमचे म्हणणे बेल्जियन वकिलातीच्या इमारतीवर लावण्यासाठी मी घेऊन जातो असे शांतपणे सांगितले त्या अधिकार्‍याला लाठीमार करावयाला कारण काय घडले याचाही विचार करणे आवश्यक आहे. सुरुवातीला काय घडले हे चौकशीतही सापडणे कठीण आहे. कारण त्या ठिकाणी पोलीस आणि कम्युनिस्ट एवढीच मंडळी होती. चौकशीचे काम ज्यांच्यावर तुम्ही सोपविणार त्यांनासुध्दा शेवटी सर्कमस्टॅन्शिअल एव्हिडन्सवर आपला निर्णय द्यावा लागेल. त्या ठिकाणी पोलिसांची सुरुवातीची भूमिका मोर्चा गडबड न करता शांततेने कसा परत पाठविता येईल एवढीच होती. लोकांना मारावयाचे अशी त्यांची नीती नव्हती. गोड बोलून का होईना दंगा न करता त्यांनी घातलेल्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे लोकांना नेणे हीच त्यांची सुरुवातीची भूमिका होती. त्यासाठी श्री.मिरजकर आणि श्री. वैद्य यांच्याशी पोलीस अधिकार्‍याचे बोलणे झाले आणि त्या दोघांना घेऊन हा अधिकारी त्यांना त्यांचे म्हणणे वकिलातीवर लावू देण्यासाठी घेऊन चालला. परंतु त्या दोघांना घेऊन तो पाठमोरा होतो न होतो तोच त्याच्या डोक्यावर दगड पडून त्याला जखम झाली. ही एकच हकीगत असे दाखविते की, कोणीतरी दगड घेऊन आले होते. त्या माणसाचे नाव मी या ठिकाणी घेत नाही. यासंबंधीची केस कोर्टापुढे जाईलच. तेव्हा त्या व्यक्तीचे नाव मी सांगत नाही. ज्याने दगड मारला त्याच्याबद्दल पोलिसांजवळ पुरावा आहे. प्रथम दोन माणसांना घेऊन जावयाचे असे ठरले. त्यांनी ते कबूलही केले आणि त्याप्रमाणे त्यांना घेऊन पोलीस अधिकारी जातही होता, परंतु एवढयात पाठीमागून ''आणखी लोक जावयास पाहिजेत'' अशा घोषणा लोकांनी केल्या आणि पुढे घुसण्याचा प्रयत्‍न सुरू केला आणि मागून दगड पडतात असे पाहिल्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. ह्या लाठीहल्ल्यामध्ये काही लोकांना लागले, काही कम्युनिस्ट सभासदांना जखमा झाल्या, मनस्ताप झाला त्याबद्दल मला फार वाईट वाटले आणि मी त्यांची माफी मागितली. पोलीस चांगले काम करतात आणि डेमॉनस्ट्रेटर्सकडून दंगा होत असताना उघडयावर त्यांना तोंड देतात ही परिस्थिती पाहून दुसर्‍या आणि तिसर्‍या रांगेत अशी अनेक माणसे होती की, त्यांना ते सहन होत नव्हते म्हणून त्यांच्यापैकी एका माणसाने दगडफेक केली व इतरांनी त्याला उत्तेजन देण्यास सुरुवात केली.

असे काही न होता आणि पोलिसांनी हात न उगारता मिरवणुकीचे विसर्जन झाले असते तर मला आनंद झाला असता. पोलिसांकडून थोडा एक्सेस झाला की, त्यांच्याबद्दल इन्क्वायरी करा अशी मागणी केली जाते पण बेल्जियन कॉन्सुलेटचे काही कमी जास्त घडले असते तर त्याबद्दल चौकशीची मागणी करण्यात आली नसती.