भाग १ विधानसभेतील भाषणे-२

पूर्वीच्या काळी काही एका विशिष्ट हेतूने धार्मिक कल्पना म्हणून या प्रश्नाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते म्हणून आताही त्याच भावनेने पाहून या कायद्याचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही. आपली जर या कायद्याकडे पाहाण्याची धार्मिक दृष्टी असेल तर आपण तसे स्पष्ट सांगावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते श्री.गोळवलकर यांनी सांगितले आहे की, आमची या प्रश्नाकडे पाहाण्याची आर्थिक दृष्टी नसून सांस्कृतिक मानबिंदू म्हणून आम्ही या प्रश्नाकडे पाहातो. तशा प्रकारे भावनात्मक दृष्टीने या प्रश्नाकडे पाहाण्याचा या लोकांचा दृष्टीकोन असेल तर हा दृष्टीकोन आम्हाला मान्य नाही असे मी पूर्वीच सांगितले आहे. तसेच गायीबद्दल आपल्या मनात कितीही पूज्य भावना असली तरी त्याचा उपयोग राजकीय दृष्टीने करणे योग्य होणार नाही. गायीसंबंधी तुमच्या आमच्या आणि सर्वांच्या मनात पवित्र भावना आहेत, पण या प्रश्नाचा विचार करताना दुसरी एक बाजू लक्षात घेतली पाहिजे. या प्रश्नामागे मुळातच असलेल्या धार्मिक श्रध्देच्या भावना काही कारणामुळे पुढे कमी झाल्या म्हणून त्या धार्मिक भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी कायदे मंडळात बिल आणून शासनसंस्थेचा आधार घेणे इष्ट ठरणार नाही. या बाबतीत आमचा त्यांच्याशी मुळातच मतभेद आहे हे मी त्यांना सांगू इच्छितो. या जीर्ण श्रध्दा व भावना कायद्याने पुनरुज्जीवित होणार नाहीत; त्यासाठी जनतेत विधायक  स्वरूपाची गोरक्षणाची वृत्ती निर्माण केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, या प्रश्नाकडे पाहाण्याची दृष्टी आणि हे बिल मांडणार्‍याची इच्छा यासंबंधी मी असे सांगू इच्छितो की ज्या विचारसरणीचे प्रतीक म्हणून ते ही गोष्ट सभागृहापुढे मांडतात ती विचारसरणी इतिहासजमा झालेली आहे. कदाचित् इतिहासातील मूल्यवान् वस्तूंची यादी करावयाची झाली तरीदेखील या प्रश्नाला जागा मिळेल की नाही इतकी जीर्ण अशी ही विचारसरणी आहे. ती पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न या पद्धतीने यशस्वी होणार नाही हे मी त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो.

यानंतर मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावयाचा आहे आणि तो म्हणजे माझे मित्र सन्माननीय सभासद श्री.एस्.एम.जोशी (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांनी या बिलावर केलेल्या भाषणाचा होय. या विषयावर त्यांनी जे भाषण केले ते मी लक्षपूर्वक औकले आहे. आता या ठिकाणी ते हजर नाहीत, पण ते जे बोलले त्याचा उल्लेख करणे जरूरीचे असल्यामुळे मी तो करणार आहे. त्यांचे भाषण अैकताना मला एक प्रकारे सखेदाश्चर्य वाटत होते, ते अशाकरिता वाटत होते की त्यांनी या बाबतीत आपली मते मांडताना हा आर्थिक प्रश्न आहे आणि तो सोडविण्याचा कायदा हा उपाय नव्हे असे सांगत असताना इतके 'तथापि' आणि 'परंतु' वापरले की त्यामुळे त्यांना काय म्हणावयाचे आहे हे स्पष्ट होणे कठीण झाले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जी गोहत्या प्रतिबंधक चळवळ सुरू झाली होती तीवर आपण सही का केली याची कारणे देताना त्यांनी ज्या गोष्टी विशद केल्या त्यावरून हे संधिसाधूपणाचे पाऊल त्यांनी टाकले आहे असे म्हणावे लागते. ते स्वतः प्रामाणिक आहेत, त्यांची विचारसरणीही प्रामाणिक आहे, पण अशा तर्‍हेची विसंगत कृती पाहिली म्हणजे त्यामागे काय भूमिका आहे हे स्पष्ट होत नाही. वैचारिक गोंधळ कसा असतो याचे त्यांचे या विषयावर झालेले भाषण हे उत्कृष्ट प्रतीक आहे असे म्हणावयाला हरकत नाही. तेव्हा मला असे म्हणावयाचे आहे की, या प्रश्नामागे असलेल्या वैचारिक भूमिकेचे पृथःकरण करून हा प्रश्न सभागृहाने समजावून घेतला पाहिजे. आमच्या कोणाच्याही मनात गोवधाबद्दल सहानुभूती नाही. सन्माननीय सभासद श्री.लल्लूभाई पटेल(टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांनी या बाबतीत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. एका अर्थाने त्यांनी गव्हर्नमेंटचीच बाजू मांडली आहे असे मी म्हणेन. त्यांनी गोपालनाच्या आणि गोरक्षणाच्या बाबतीत स्पष्टपणे आपले विचार मांडले आहेत. हिंदुस्थानात गायीचे स्थान उच्च राखावयाचे असेल आणि ती खर्‍या अर्थाने गोमाता व्हावी असे सन्माननीय सभासदांना खरोखरीच वाटत असेल, तर हा मनुष्य मुसलमान धर्माचा आहे की इतर कोणत्या धर्माचा आहे हे लक्षात न घेता गायीबद्दल त्याग करण्याची भूमिका आपण त्याच्या मनात निर्माण केली पाहिजे. गायीची सर्व प्रकारे जोपासना करून तिच्या दुधाबद्दल आवड निर्माण करणे आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी घेणे किती जरूरीचे आहे ही भावना समाजाच्या सर्व थरापर्यंत निर्माण केली गेली तर गोपालनाचा प्रश्न आपण यशस्वी रीतीने सोडवू आणि शेतीच्या क्षेत्रातही गायीचे जे महत्त्वाचे स्थान आहे ते पुन्हा परत मिळवून देऊ.