३३
गौरवोद्गारांबद्दल कृतज्ञता* (१९ नोव्हेंबर १९६२)
----------------------------------------------------------
संरक्षण मंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी दिल्लीस जाण्याच्या प्रसंगी सभागृहाने त्यांच्या कारकीर्दीचा गौरवपूर्ण शब्दांनी उल्लेख केला त्याबद्दल मा. श्री. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.
---------------------------------------------------------------------
*Maharashtra Legislative Assembly Debates, Vol. VII, Part II, 19th November 1962, pp. 53-54.
अध्यक्ष महाराज, या प्रस्तावावर भाषण करताना मला जरा अवघडल्यासारखे होत आहे. या प्रस्तावावर जेव्हा भाषणे होत होती तेव्हा ती ऐकताना मला बरे वाटत नव्हते असे मी कसे म्हणू, कारण तसे म्हणणे वस्तुस्थितीला सोडून होईल. आज मी सभागृहात जो उपस्थित राहिलो आहे तो दिल्लीला जाण्यापूर्वी या सभागृहाला अभिवादन करून जावे याच एका भावनेने प्रेरित होऊन उपस्थित राहिलो आहे. गेल्या सोळा वर्षांपासून मी या सभागृहात बसत आहे, येथे काम केले आहे. या कालावधीत माझी स्वतःची बसण्याची जागा अधिकारानुसार, कर्तव्यानुसार बदलत राहिली. परंतु १९४६ साली जेव्हा मी प्रथमतः या सभागृहात सदस्य या नात्याने प्रवेश केला तेव्हा एका छोटया क्षेत्रात काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता या नात्याने बुजर्या मनाने केलेला तो प्रवेश होता. आज या सभागृहातून बाहेर पडताना माझ्या मनात स्वतःबद्दल आत्मविश्वास जरूर आहे, परंतु ज्या बुजर्या मनाने मी या सभागृहात प्रवेश केला होता त्याच बुजर्या मनाने अधिक विशाल क्षेत्रात या संकटकालात मी प्रवेश करणार आहे. अध्यक्ष महाराज, या सभागृहातील प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वस्तूवर माझे प्रेम आहे. येथे झालेले वाद, विवाद, झालेल्या चर्चा, येथे झालेली भाषणे, येथे येऊन माझ्यावर रागावून बोलणारी, प्रेमाने बोलणारी माणसे, या सर्वांवर माझे प्रेम आहे. लोकशाहीवर प्रेम करणार्या मनुष्याच्या मनात असे प्रेम निर्माण होणे स्वाभाविक आहे असे मला वाटते. नव्या नव्हाळीचे प्रेम जसे उत्कट असते त्याचप्रमाणे हे प्रेमही उत्कट आहे. म्हणून येथून जाताना माझ्या मनात जे थोडेसे दुःख सलत आहे ते याच प्रेमामुळे. हे सभागृह ही एक अशी जागा आहे की जेथे आम्ही वाद केले, मित्र जोडले, चुका केल्या, चांगली कामे केली. इतिहास घडविला असे हे स्थान आहे. समाजजीवन घडविणारी अशी ही जागा आहे.
अशा सभागृहातून जाताना विरह भावना मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. जाता जाता एक गोष्ट सांगणे मला आवश्यक वाटते. नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कोणाकडे दुर्लक्ष झाले असेल, कोणी दुखावले गेले असतील तर त्या सर्वांची मी माफी मागतो. वस्तुतः कोणाचाही अवमान करावा असा माझा स्वभावधर्म नाही, आणि तसे हे ठिकाणच नव्हे. लोकशाही जीवन सुफलित करण्याचे हे एक पवित्र तीर्थ आहे. या जागेवर भाषण करताना मी माझ्या दृष्टीसमोर नेहमी हीच गोष्ट ठेवलेली आहे. हेतुतः कोणालाही दुखविण्याचा उद्देश नसतानाही नकळत तसे काही झाले असल्यास त्याबद्दल मी माफी मागतो. आज माझ्याबद्दल ह्या सभागृहात ज्या भावना व्यक्त करण्यात आल्या त्यांची मला जाणीव आहे. ती जाणीव नसती तर मी गेलोच नसतो. मी जो जात आहे तो माझ्या वैयक्तिक सामर्थ्याच्या जोरावर जात नाही. देशाच्या संरक्षणाच्या कामासाठी नेत्याची हाक आली तर तिला उत्कटतेने साद देणे हा आमचा स्वभाव आहे. ही आमची परंपरा आहे, येथील मातीतच तो गुण आहे. याच मातीत आम्ही रांगलो आणि रंगलोही जास्त. वीरश्रीच्या भावना व्यक्त करण्याचे हे स्थळ नव्हे परंतु तरीही मला सांगावेसे वाटते या मातीत रंगलेला मनुष्य समोरच्या शत्रूला माती चारल्याशिवाय परत येणारा नव्हे. या आत्मविश्वासानेच मी जात आहे. एका अगदी अनोळखी क्षेत्रात जात आहे. ज्याच्याशी सामना द्यावयाचा आहे तो शत्रूही अवसानघातकी परंतु विश्वासघातकी जरूर आहे, जबरदस्त आहे. परंतु मला आत्मविश्वास वाटतो कारण तुम्हा सर्वांचे सामर्थ्य हेच माझे सामर्थ्य आहे. या सभागृहात आपल्यासंबंधात झालेली अशी भाषणे ऐकावयाला मिळतील असे मला वाटले नव्हते. वस्तुतः स्तुतिपर जी भाषणे होतात ती आपल्यानंतर होतात तसा आपला अनुभव असतो, परंतु आता झालेली भाषणे मी याची देही याच कानी स्वतः ऐकली आहे. १९४२ साली ज्या भावनेने माझे घर सोडले त्याच मनःस्थितीमध्ये मी आज आहे. मी अशी विनंती करीन की, मला ज्या प्रेमाने वागविले ते कायम ठेवा. महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री श्री. कन्नमवारजी ६० (टिप पाहाण्यासाठी येथे क्लिक करा) माझ्या शेजारी बसलेले आहेत. त्यांच्यावरही तितक्याच प्रेमाचा आणि विश्वासाचा वर्षाव होऊ द्या. आपण ह्या ठिकाणी माझ्याबद्दल ज्या सद्भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आभार मानून मी माझे भाषण पुरे करतो.
------------------------------------------------------------------------
Before leaving for Delhi, to take charge of the post of the Defence Minister of India, in reply to the appreciative references to his services in Maharashtra, Shri Chavan, Chief Minister, expresed his gratitude to all the members for their co-operation during his tenure of 16 years and expected the same love and affection from them in future.