व्याख्यानमाला-१९९२-२ (15)

पण हे यश मान्य करुन सुद्धा एक गोष्ट स्पष्टपणे सांगावी लागते की भारताला ज्यात यश मिळाले त्या या तिन्हीही गोष्टी साधनरुप आहेत. साध्यरुप नाहीत. आधुनिकीकरण हे साधन आहे. लोकशाही हे साधन आहे. उत्पादनवृद्धी हे साधन आहे. तर मग साध्य काय आहे? साध्यांचा उल्लेक आम्ही आमच्या संविधानाच्या सरनाम्यात करुन ठेवलेला आहे. या देशातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळावा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य लाभावे, दर्जाची व संधीची समानता प्राप्त व्हावी, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता साध्य व्हावी यासाठी कृतसंकल्प होऊन निर्धारपूर्वक आम्ही हे संविधान स्वतःप्रति अर्पण केले आहे. हे आमचं साध्य आहे. माणसाला माणसासारखे जीवन जगता यावं अशी समाजरचना निर्माण करणं हे ते साध्य आहे. माणसासारखं जीवन म्हणजे केवळ भौतिक गरजांची पूर्तता नाही तर सुसंस्कृत जीवन, परिपूर्ण जीवन, सा-या ज्या सुप्त शक्ती माणसाच्या अंगी असतील त्या सगळ्यांचा विकास – आविष्कार करता येईल असं अर्थपूर्ण जीवन प्रत्येकाच्या वाट्याला यावं-हे ते साध्य आहे. प्रत्येकाला रोजगार मिळावा, दारिद्र्याचं संपूर्ण निर्मूलन व्हावं – हे ते साध्य आहे. प्रत्येकाला माणसासारखं जगता यावं, त्याला शिक्षण मिळावं, त्याला आरोग्य मिळावं, त्याला आराम मिळावा हे सगळं त्यात आलं. ही सगळीच आपली साध्ये आहेत. आणि साध्याचा पाठपुरावा करण्यातून येथे समताधिष्ठित समाज उभा राहे अपेक्षित आहे.

समतेचा अर्थ केवळ ‘कायद्यासमोर समानता’ नाही. म्हणजे तो आहेच, कायद्यासमोर समानता हवीच, प्रत्येकाच्या मताला सारखीच किंमत असावी हा तर समानतेचा अर्थ आहेच, त्याचप्रमाणे कायद्याचं सर्वांना समान संरक्षण असावं हाही समानतेचा अर्थ आहेच. पण समतेचा याहून व्यापक आणि भरीव असा भावात्मक अर्थही असून तो अधिक महत्वाचा आहे. आपण असं पहा की आपल्या देशात तत्वतः सर्वांना विकासाची समान संधी आहे, सर्वांना मुलभूत हक्क आहेत, सर्वांना भाषण – स्वातंत्र्य आहे, पण प्रत्यक्षात किती लोकांना भाषणस्वातंत्र्य आहे हो? तुम्हाला जे वाटतं, जे पटतं ते तुम्ही खरोखरच निर्भयपणे बोलू शकता? तळागाळातल्या किती लोकांना त्यांना जे वाटतं ते बोलता येतं? मुळात त्यांना विचार करायला फुरसत कधी असते? वर्तमानपत्र वाचता येईल अशा लोकांची संख्या या देशात किती आहे? ज्यांना वाचता येतं त्यांच्यापैकी किती लोक ते वाचतात? जे वाचतात त्यांच्यापैकी किती लोक विचार करतात? आणि जे विचार करतात त्यांच्यापैकी किती लोक बोलू शकतात? आणि त्यांच्यापैकी किती लोक बोलतात? हे जर आपण लक्षात घेतलं तर आपोआपच आपल्या ध्यानात येईल की भाषणस्वातंत्र्य हा येथे फारच थोड्या लोकांचा हक्क आहे. म्हणजे भावात्मक अर्थानं स्वातंत्र्य, समता व बंधुता या साध्यांचं काय झालं? माणसासारखं जगता यावं असा समाज निर्माण व्हावा, सर्वांच्या प्राथमिक गरजांची परिपूर्ती व्हावी अशी अर्थव्यवस्था निरमाण व्हावी आणि भावात्मक आशय असलेली समानता या समाजाचा पाया व्हावी, त्याच्यावर आधारित अशी निकोप समाजव्यवस्था येथे उभी रहावी, या साध्यांचं काय झालं? आपल्याला असं दिसेल की ही साध्ये आजही कागदोपत्रीच राहिली आहेत. केवळ आदर्शच राहिलेली आहेत. आपण जेव्हा प्रगतीबद्दल चिकित्सकपणे बोलतो, आपण जेव्हा विकासाबद्दल परखडपणे बोलतो तेव्हा वस्तुतः आपण या साध्याच्या दृष्टीनेच आजवरच्या सगळ्या विकासाचं मूल्यमापन करीत असतो. या विकासाच्या क्रमात आम्ही जे काही मिळविले त्यातून आम्ही या साध्यांच्या किती जवळ गेलो? किंवा किती दूर गेलो? हे आपणास बघावं लागतं. कारण लोकशाहीचं भवितव्य यावरच अवलंबून आहे.

आजच्या या विकासाच्या नमुन्यामध्ये लोकशाहीच्या दृष्टीने जे गंभीर धोके आहेत ते फक्त मी अधोरेखित करणार आहे. जर या राज्यव्यवस्थेमध्ये अशाप्रकारे संतुलित विकासाद्वारे नवसमाज रचनेची उबारणी होत नसेल तर मग इथल्या लोकशाहीचं खरंच भवितव्य आहे काय? लोक म्हणती इतके दिवस चालू राहिली तशीच ती पुढं चालू राहील. असं नाही होऊ शकत. काळ झपाट्यानं बदलतो आहे, आणि विकासाच्या लाभांपासून वंचित राहिलेली माणसं आता जागी होतायत, संघटित होतायत. १९७० नंतरच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लोकांनी या विकासप्रक्रियेच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे आणि दिवसेंदिवस त्यांचं सामर्थ्य, त्यांचं बळ वाढत जाणार असून त्यांचा आवाज अधिकाधिक बुलंद होत जाणार आहे हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आजपर्यंत चाललं, हजारो वर्षे चाललं, कर्मसिद्धांताच्या बळावर आम्ही विषम समाजरचना आणि अर्थरचना खुशाल खपवीत राहिलो, टिकवीत राहिलो, हे कल्पांतापर्यंत असंच चालेल असं जर कोण मानत असेल तर ती चूक आहे. तसं होऊ शकत नाही हे निश्चित बदलणार आहे. परिस्थिती वेगाने बदलते आहे आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच याचा गंभीरपणे विचार करावाच लागणार आहे. तशीच वेळ अगदी येऊन ठेपली आहे. आम्ही ज्याला विकास विकास म्हणतो तो ख-या अर्थाने विकास आहे काय? याचे उत्तर यापुढे फार काळ टाळता येणार नाही.