तुम्ही किती मोठे पुढारी आहात हे तुमचं भ्रष्टाचार करण्याचं सामर्थ्य किती मोठं आहे यावर अवलंबून असतं. तुम्ही किती कारखानदार आहात हे शासनाची मर्जी विकत घेण्याची तुमची किती ताकद आहे यावरून ठरत असतं. बाकी कोणत्या गुणवत्तेची गरज नाही. इते उदाहरणार्थ कोणाचंही नाव घ्यायची गरज नाही. कुठल्याही उद्योगपतीचं नाव तुम्ही मनात आणा आणि तुम्हाला असे आढळेल की त्यांनी ते केलेलंच आहे. त्या उद्योगपतींच्या ठिकाणी उद्योगपती होण्यासाठी लागणारे इतर गुण असले नसले तरीही तो यशस्वी होतो कारण सरकारवर दडपण आणण्याचे मार्ग त्याला नेमके माहित आहेत, सरकारच्या निवडणूक फंडाला देणगी देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. सरकारचे अधिकारी तो विकत घेऊ शकतो आणि या बळावरच तो यशस्वी उद्योगपती होऊ शकतो. म्हणजे एकदा या उत्पादन पद्धतीच्या मागे असलेल्या या विज्ञान-तंत्रज्ञानाचं हे सूत्र तुम्ही मान्य केलं की मग उगीच चारित्र्य कमी होतंय हे सूत्र तुम्ही मान्य केलं की मग उगीच चारित्र्य कमी होतंय आणि भ्रष्टाचार वाढतोय, गुन्हेगारी-गुंडगिरी वाढतेय, या तक्रारींना फारसा अर्थच राहात नाही.
मग हे आपण सारं निमूटपणे स्वीकारायचं का? मी तसं मुळीच म्हणत नाही. मी तसं सुचवतही नाही. हे जे काही चाललंय ते रास्त चाललं आहे, चांगलं चाललं आहे असं मी अजिबात सुचवत नाही. मी फक्त असं म्हणतोय की ज्या विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरून आम्ही मोठमोठाली धरणं निर्माण केली, मोठमोठाली शहरं वसवली आणि मोठमोठे कारखाने तयार केले आणि ही धरणे, शहरे, कारखाने हीच आमच्या प्रगतीची लक्षणं आहेत असं आम्ही सांगितलं. आम्ही सांगितलं की भाक्रा-नानगल ही आमची नवीन तीर्थस्थानं आहेत. या सगळ्या विकासप्रक्रियेचा खोलात जाऊन आपल्याला विचार करावा लागतो. भव्य इस्पितळे बांधणे हे प्रगतीचं लक्षण आहे? की लोकांनी आजारी पडूच नये आशाप्रकारचा बंदोबस्त करणं हे प्रगतीचं लक्षण आहे? आपण पहिला पर्याय हाच विकासाचा आदर्श म्हणून मानला. मोठमोठाले दवाखाने निघाले पाहिजेत, मोठमोठाल्या इमारती बांधल्या गेल्या पाहिजते, अहो पण शक्यतो लोकांनी आजारी पडूच नये असा प्रयत्न केला पाहिजे ना, पण ते नाही. कारण विकासाचा जो नमुना आम्ही बाजूला सारला आहे, विकासाचा जो नमुना आम्ही स्वीकारलेला आहे तो असा की तुम्ही वाटेल ते करा, आणि वाटेल तसं खा, आणि आजारी पडल्यावर दवाखान्यात जा. हिंदस्वराज्यामध्ये गांधींनी म्हटलं होतं की डॉक्टर हा समाजाचा शत्रू आहे. कारण काय तर डॉक्टर असं म्हणतो की तुम्ही वाटेल तितकं खा, काही विचार करू नका, अगदी जे वर्ज्य आहे तेही खा, तुम्हाला काही झाल्यास मी आहेच. मी पाहीन. मी असताना तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला तुम्ही कशाला काळजी करता? समाजातल्या अनैतिकतेचे प्रवर्तक म्हणून गांधींनी डॉक्टर आणि वकील या दोन व्यावसायिकांचा उल्लेख केला होता. आम्ही मात्र हे मान्यच केलं आहे की, नाही त्यांच्याच आधाराने आम्हाला राहायचंय. डॉक्टर आहे ना मग आपण कशाला काळजी करायची? आपण खुशाल खाऊ या! वाटले तितकं खाऊया! वाटेंल तसं राहू. निष्काळजीपणे राहू या! डॉक्टर काय ती काळजी घेतील. आम्ही खून करू, वकील आपल्याला वाचवतील! शेवटी वाटणं महत्वाचं ना. मग कोर्टात कसं वाचायचं. शिक्षा कशी टाळायची, गुन्हेगार असूनसुद्धा कसं राजरोसपणे मोकळं सुटायचं, याचं तंत्र जर मला अवगत झालं तर मग मी गुन्हा करताना का म्हणून विचार करायचा? असं ते तर्कशास्त्र आहे. हे सारं मला मान्य आहे म्हणून मी हे बोलतोय असं नाही. तर मी असं सांगतोय की आपण स्वीकारलेल्या व्यवस्थेचा हा सारा भाग आहे. आपल्याला जर आज प्रगतीची आपण करीत असलेली व्याख्य मान्य असेल तर तिच्या बरोबर येणा-या ह्या गोष्टी आपल्याला स्वीकारल्याच पाहिजेत. पर्याय नाही त्याला.