व्याख्यानमाला-१९९२-२ (11)

एस्किमो समाज मासेमारी करतो आणि मासेमारीसाठी तो भाल्याचा वापर करतो. भाला हे त्या एस्किमो समाजाचे तंत्रज्ञान आहे. पर्यावरणातून आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी ज्या ज्या साधनांचा वापर होतो त्याला तंत्रज्ञान म्हणायचं. तंत्रज्ञान म्हणजे गुंतागुंतीचं असंच काहीतरी असतं असं नव्हे. हा साधा भालाच कशाला, अश्मयुगातील माणसाने दगडाला धार लावून जे आद्य आयुध तयार केलं असेल तेसुद्धा तंत्रज्ञानच होतं. तेव्हा एस्किमोचं मासेमारीचे भाला एक तंत्रज्ञान आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या सबंध सामाजिक रचनेवर होतो. मासेमारीला जायचं म्हणजे एक-एकट्यानं जायचं असतं, संपूर्ण समुहाने जाऊ शकते नाही. असा झुंड चा झुंड जर मासेमारीसाठी निघाला तर माशांना चाहूल लागेल व ते आतल्या भागात निघून जातील, मासेमारीला यश येणार नाही. तेव्हा मासेमारीला अत्यंत सावधपणे जायचं, एक-एकट्यानं जायचं, पाऊल न वाजवता जायचं. परिणामी त्या एस्किमोंची समाजरचनाच अशी झाली आहे की त्यात मोजकी लहान लहान कुटुंबेच राहू शकतात. त्यांच्यात फारच बेताचे परस्परावलंबन असते. सामूहिक कृती ते अभावानेच करतात. त्यांच्यात श्रमविभागणी फारशी नसतेच. अत्यंत पृथक पृथक म्हणता येईल किंवा विकीर्ण विस्कळीत म्हणता येईल अशा प्रकारचे त्यांचे समाजजीवन असते. त्यांच्या कुटुंबाचा आकार हा २-३ माणसांपेक्षा अधिक नसतो. त्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने माणसे त्यांना परवडतच नाहीत. म्हणजे तंत्रज्ञानाचा परिणाम त्यांच्या कुटुंबरचनेवर, त्यांच्या समाजरचनेवर होतो.

दुसरं टोकाचं उदाहरण आहे ते टोब्रियंड बेटावरच्या बगांडा लोकांचे. ही माणसं गेंड्याची शिकार करतात. आता गेंड्याची शिकार करायची म्हणजे जीवाशी गाठ असते. शिकारीच्या मोहिमेत एकावेळी १००-१०० माणसांना भाग घ्यावा लागतो. स्वाभाविकच १०० माणसांनी एकत्रितपणे काही करायचं म्हणजे कामाची वाटणी करावीच लागते. कोणी काय करायचं, कोणी कुठं उभं राहावयाचं. कोणत्या प्रकारची भूमिका पार पाडायची. कोणी आरोळ्या मारायच्या, कोणी वार करायचा, कुणी आणखी काय काम करायचं याची तपशीलवार आखणई कारवी लागते. अशा प्रकारची परिपूर्ण आखणी अत्यंत काळजीपूर्वक केल्याशिवाय कोणीही गेंड्याची शिकार करूच शकत नाही. गेंड्याची शिकार करण्याचं जे त्यांचं तंत्रज्ञान आहे त्यामुळे त्या समाजाची रचना ही प्रभावित झाली आहे. एस्किमोपेक्षा अगदीच वेगळ्याप्रकारची ती झालेली आहे. हा समाज आकाराने मोठा आहे. या समाजात जास्त शिस्तबद्धता आहे. या समाजामध्ये नेतृत्व आणि अनुयायी संबंध स्पष्टपणे निर्माण झाले आहेत. कारण मोहिमेची कोणतीही आखणी जेव्हा करावी लागते तेव्हा कोणीतरी हुकूम करावे लागतात व ते हुकूम अंतिम मानून कुणालातरी बिनतक्रार ऐकावेच लागतात. कुणाचा तरी अधिकार इतरांना मान्य करावा लागतो. कारण त्याशिवाय शिकार करता येत नाही. गेंड्याची शिकार हा या माणसांच्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा प्रसंग असतो आणि त्यातील त्यांच्या तंत्रज्ञानाचा परिणाम त्यांच्या समाजरचनेवर झालेला असतो.

तेव्हा तंत्रज्ञान कुठल्याही काळातले असो आणि कुठलेही असो, ते मूल्यमुक्त असत नाही. त्याचे सामाजिक, सांस्कृतिक परिणाम झाल्यावाचून कधीच राहत नाहीत आणि आपण स्वीकारलेले जे तंत्रज्ञान आहे त्याचेही अशाप्रकारे सामाजिक सांस्कृतिक परिणाम झालेले आहेत. समाजजीवनामध्ये परिवर्तनाच्या प्रक्रिया सुरू होतात. तंत्रज्ञानाचा परिणाम सर्वच घटकांवर सारखाच होत नाही. लक्षात घ्या. तो काही घटकांना अनुकूल होतो व काही घटकांना प्रतिकूल होतो. हे सगळ्या काळामध्ये घडत आलेले आहे.

तंत्रज्ञान हे तटस्थ नसतं. तर ते विशिष्ट मूल्यव्यवस्थेशी निगडीत असतं, तिला बळकट करीत असतं हे एकदा मान्य केल्यानंतर आपण आता आपल्या आजच्या तंत्रज्ञानाची चिकित्सा त्याच्याशी संलग्न असलेल्या तत्त्वज्ञानाच्या संदर्भात करू. पाश्चात्य तंत्रज्ञान कोणत्या काळात निर्माण झालं? याचं स्वरूप काय होतं? आणि मग याचे संभाव्य परिणाम काय होतील याचा विचार आपण करूया. मी असं जेव्हा म्हणतो तेव्हा मला आवर्जून एक मुद्दा सांगायचा असतो की आपण जेव्हा म्हणतो की सहकारामध्ये भ्रष्टाचार आहे, आपण असं जेव्हा म्हणतो सहकारी क्षेत्रामध्ये मक्तेदारी आहे, त्यामध्ये अजूनही घराणेंशाही चाललेली आहे. त्यामध्ये सामान्य माणसाचा आवाज ऐकला जात नाही, वगैरे वगैरे. तेव्हा इथे आपण व्यक्तींना दोषी धरतो. खरं म्हणजे यात व्यक्तीचा दोष फारसा नसतो. ज्या व्यवस्थेत व्यक्ती वावरत असते त्या व्यवस्थेचा, त्यातील तंत्रज्ञान-विज्ञानाचा हा परिणाम असतो. हे समजावून घेतल्याशिवाय आपल्यास त्यावरला उपाय योजता येणार नाही. ‘सहकारातल्या भ्रष्टाचारावर उपाय सांगा’ असं जर कोणी म्हणालं तर पटकन त्यावर डॉक्टरप्रमाणे प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ शकणार नाही. कारण हा तितका सोपा किंवा सहजसाध्य रोग नाही तर याचं जे मूळ आहे हे कुठेतरी अशा व्यवस्थेत आहे, विज्ञानात आहे, तंत्रज्ञानामध्ये आहे असे आपल्याला दिसेल.