हे जे तंत्रज्ञान मी म्हणतो आहे सारखं ज्याचा अंगिकार आपण केला, पाश्चात्या आधुनिक तंत्रज्ञान आपण ज्याला म्हणतो हे केव्हा निर्माण झाले? साधारणतः हे औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झाले असं आपण मानतो, औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा उत्पादनात प्रचंड वाढ झाली, यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आणि माणसांना असा एक विश्वास मात्र आला की आपण निसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झालो, “जितं मया” मी जिंकलो अशी भावना माणसाच्या मनात निर्माण झाली त्या क्षणापासून या विज्ञान-तंत्रज्ञानाची सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तंत्रज्ञानाचा पाया हा मानवाच्या मनात अहंकाराकडे झुकणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा आहे की माणूस हा या विश्वाचा केंद्रबिंदू आहे, माणूस या विश्वाचा कर्ता आणि धर्ता आहे, माणूस जे मनात आणील ते करू शकतो आणि जे केले आहे ते नष्ट करू शकतो, माणसाला पाहिजे त्या पद्धतीने तो नैसर्गिक शक्तींना वळवू शकतो, वाकवू शकतो, वेठीला धरू शकतो, आणि शेवटी माणसाचं कल्याण हेच संपूर्ण चराचराचं उद्दिष्ट आहे. जंगलं आहेत ती माणसासाठी, नद्या आहेत त्या माणसासाठी, पर्वत आहेत ते माणसासाठी, ही सबंध सृष्टी आहे ती माणसासाठी आमि माणूस त्यांचा हवा तसा वापर करू शकतो ही धारणा या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पाठीशी उभी आहे आणि एकदा हे आपण गृहीत धरलं की पुढं एक अनिष्ट परंपरा अटळ होऊन बसते.
तंत्रज्ञानाचा वापर माणूस फार पूर्वापार करीत होता. पण त्याला तंत्रज्ञानामागचं विज्ञान ठाऊक नव्हतं. म्हणजे जेव्हा दगडाला धार लावणारा तो अश्मयुगातला माणूस होता तेव्हा त्याला त्या धारेमागचं तत्त्व माहीत नव्हतं, तरफ म्हणजे काय ते माहीत नव्हतं, लिव्हरेज म्हणजे काय हे माहित नव्हतं. तंत्रज्ञानाच्या मागचं विज्ञान माहीत नसतानादेखील तंत्रज्ञानाचा वापर माणूस करीत होता. जेव्हा त्याला असं कळलं की तंत्रज्ञानाच्या मुळाशी हे विज्ञान आहे आणि विज्ञानाचा बोध त्याला झाला तेव्हापासून माणसाच्या ठिकाणी हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे असं आपणास म्हणता येईल. पण या तंत्रज्ञानाचं स्वरूप मुळात माणसाला स्वार्थी बनवणारं आहे, आत्मकेंद्री बनवणारं आहे, स्वतः पुरता विचार करायला लावणारं, बनवणारं आहे. मुक्तस्पर्धा हे याचं सूत्र आहे.
आपण आज मुक्तस्पर्धेच्या दिशेने झापट्याने चाललो आहोत म्हणून हे आवर्जून सांगणं आवश्यक झालेलं आहे की मुक्तस्पर्धेचा मार्ग हा कधीच सामाजिक न्यायाचा असू शकत नाही. मुक्त स्पर्धेचा मार्ग हा एकमेकांच्या गळ्याचा घोट घ्यायला प्रवृत्त करणारा मार्ग असतो. कारण सूक्तासुक्त कुठलेही मार्ग वापरायचे, कसलाही विधिनिषेध बाळगायचा नाही हे त्या मार्गात सहज बसतं. यश आणि यश हेच तिथे अचूकतेचं गमक असतं. एखादी गोष्ट चूक की बरोबर? यशात ती जर परिवर्तित होत असेल तर बरोबर, तिच्यामुळे अपयश येत असेल तर चूक असंच समीकरण होऊन बसतं. आणि त्यामुळे ज्या मूल्यांच्याबद्दल आपण बोलतो, आपण असं म्हणतो की चारित्र्यवान असायला पाहिजे, माणसांनी सदाचारी असायला पाहिजे, माणसांनी निस्वार्थ बुद्धीने काम केले पाहिजे. समाजसेवा केली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण आदर्श चारित्र्याच्या म्हणून मानतो. या स्पर्धेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर मात्र वागण्याचे हे संकेत हे गुण न ठरता दोष ठरतात. मला जर निवडणूक लढवून जिंकून यायचं असेल तर मोकळ्या मनाने मला काळ्या पैशाचा स्वीकार केला पाहिजे. मी काळ्या पैशाचा विधिनिषेद करतो, मला तो घ्यायाच नाही, मला तो वर्ज्य आहे असं म्हणून मला निवडणूक लढविता येणार नाही, मला जर लोकशाहीच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर मला दहशतीचा वापर केला पाहिजे, गुंडगिरीचा वापर केला पाहिजे, कारण त्याखेरीज मला या क्षेत्रात आज वावरता येणार नाही, टिकून राहता येणार नाही. म्हणजे ज्याला आपण चारित्र्याचे सदगुण म्हणतो, ते व्यावहारीक यशाच्य दृष्टीने जर दोष ठरत असतील आणि ज्यांना आपण दोष म्हणतो ते जर गुण ठरत असतील तर याला आता काय म्हणायचं? आणि ज्या पद्दतीचा वापर आपण अवलंब केलेला आहे तिच्यामध्ये हे गुण ठरतात ही वस्तुस्थिती आहे.