व्याख्यानमाला-१९९२-२ (8)

विकासानं महाराष्ट्रात काहीही साधलं नाही असं मी महणत नाही. विकासानं जे साधलं ते मी नमूद केलेलंच आहे. परंतु विकासातून जे परिणाम अपेक्षित होते ते प्रत्यक्षात दिसत नाहीत – येथे एकजिनसी समाजाची उभारणी झालेली. नाही. प्रदेशामध्ये एकमेकांच्याबद्दल किती आकस आहे हे विदर्भातून पिश्चिम महाराष्ट्रात प्रवास करताना रेल्वेगाडीमध्ये आपल्याला दिसतं. ताबडतोब लोक बोलतात. आपल्या प्रेदशाचा मागासलेपणा आणि इकडच्या प्रदेशाची समृद्धी यांची तुलना करीत ते बोलत असतात. विकेंद्रीकरणाची स्थिती काय आहे? विकेंद्रीकरणामधून आमदार-खासदारांना वगळलं त्याचं कारण सांगताना नाईक समितीने असं सांगितलं होतं की स्थानिक पातळीवर त्यांच्यावर दडपण येता कामा नये, स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधीवर दडपणं येता कामा नये. परंतु अशा पद्धतीने वगळल्यामुळे आमदार खासदार प्रत्यक्षात या स्थानिक पातळीवरच्या संस्थांना धड कामच करू देत नाहीत ही आज वस्तुस्थिती आहे. त्यांचा हस्तक्षेप हा त्यांच्या तिथल्या उपस्थितीने झाला असता त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात आज होत आहे हे आज आपल्याला नाकारता येईल का? त्यांच्या सर्वस्पर्शी हस्तक्षेपामुळे विकेंद्रीकरण देखील निकालात निघतंय. नोकरशाहीला तर विकेंद्रीकरण नकोच आहे आणि आज नोकरशाहीच सर्व सरकारी उपक्रमांची ‘सारे काही’ झालेली असल्यामुळे नोकरशाहीला जे नको आहे ते होणेच शक्य नाही.

ग्रामीण जीवनाशी एकरुप असलेले उद्योगधंदे असावेत हे फार महत्वाचं एक वाक्य यशवंतरावांच्या एका भाषणात आहे. कोणते उद्योगधंदे ग्रामीण जीवनाशी एकरुप आहेत? ज्या उद्योगधंद्यांचा सामान्य माणसाच्या जगण्याशी किंवा जीवनावश्यक गरजांशी काहीही संबंध नाही असे उद्योगधंदे ख-या अर्थाने ग्रामीण जीवनाशी एकरुप होऊच शकत नाहीत. एखादा साखर कारखाना निघाल्यानंतर रोजगार वाढतो, कदाचित थोडे पैसे मिलतात. रोजगार हमी योजना निघाल्यावरसुद्धा रोजगार मिळतो. अशाप्रकारे मिळणारा रोजगार हा आनंददायी रोजगार असू शकतो काय हा खरा प्रश्न आहे. ग्रामीण जीवनाशी एकरुप झालेले औद्योगीकरण घडवून आणणारा विकास जर झाला असता तर हा आनंद त्यांना मिळाला असता. असं आज झालेलं नाही. चार पैसे एकत्र करुन उभारलेल्या भांडवलामधून सहकार चळवळीने असा एक वर्ग ग्रामीण पातळीवर तयार केला आहे की जो शहरातल्या धनिकांशी बरोबरीच्या नात्याने वागू शकतो. हे साध्य झालं. परंतु वर्गीय हितसंबंधाच्या दृष्टीने पाहिले तर शहरातला तो धनिकवर्ग आणि खेड्यापाड्यातल्या सहकारी चळवळीतून वर आलेला धनिकवर्ग यांच्या हितसंबंधांमध्ये फारसा फरक नसल्यामुळे आजवर झालेला विकास हा सामान्य माणसाच्या दृष्टीने परिणामशून्य ठरलेला आहे.

आज प्रश्न असा पडतो की यशवंतरावांसारखी प्रतिभा, यशवंतरावांसारखे वजन, यशवंतरावांसारखं वकूब असलेला नेता या राज्याला लाभूनसुद्धा हे असं का व्हावं? त्यांच्या स्वप्नांची अशी धूळधाण का व्हावी? वस्तुतः एका नेत्याचा एका राज्याशी घनिष्ट व दीर्घकाळ संबंध जोडला जावा याचं यशवंतराव व महाराष्ट्र उदाहरण अद्वितीयच म्हणावं लागंल. यशवंतराव इथं किती काळ प्रत्यक्ष सत्तेवर होते ते महत्वाचं नाही. इथून गेल्यानंतरसुद्धा कितीतरी वर्षे ते येथील राजकारणाचं रिमोट कंट्रोल करीत होते. तरीही त्यांच्या विकासकल्पनेची अशी शोकांतिका का व्हावी? आणि या प्रश्नाचं उत्तर मला दिसतं ते असं की एकतर संसदीय-शासकीय यंत्रणेवर यशवंतरावांनी वाजवीपेक्षा जास्त भर दिला होता. “यशवंतराव चव्हाण : राजकारण आणि साहित्य” या माझ्या पुस्तकामध्ये प्रतिपादन करताना मी असं म्हटलं आहे की यशवंतरावांचा भर हा जनतेचे सामर्थ्य वाढवण्यापेक्षा कायदे, विधिमंडळ, प्रशासनयंत्रणा, सहकारी व सरकारी संस्था यांच्यावर जास्त होता. लोकशक्तीपेक्षा शासनशक्तीवरचा त्यांचा विश्वास जास्त असे. त्यांच्याबद्दल असंच वारंवार घडलेलं आहे. आयुष्यात प्रत्येक प्रसंगी जेव्हा जेव्हा निर्णय घेण्याची किंवा निवड करण्याची वेळ आली तेव्हा यशवंतरावांनी काँग्रेसच्या बाजूने आणि शासनाच्या बाजूने ठाम राहण्याचं पत्करले आहे. अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध करता येईल. लोकांमध्य जाऊन लोकांची शक्ती उभी करणं त्यामुळेच त्यांना साध्य झाले नाही. पक्षबांधणी करताना त्यांनी हे पाहिलं की ठीक आहे गावातील एखादा नामांकित वकील सगळी मक्ता घेतो असे होता कामा नये. त्याच्याऐवजी पक्षाचे गावोगाव कार्यकर्ते झाले पाहिजेत. त्यांच्या योगक्षेमासाठी सहकरी संस्था उपयोगी पडल्या पाहिजेत. तसा सहकारी संस्थांचा उपयोग कार्यकर्त्यां योगक्षेम करण्यासाठी झाला आणि कार्यकर्त्यांचं जाळं त्या अर्थानं निर्माण झालं. पण प्रत्यक्ष कार्यामधून संस्कारित झालेले कार्यकर्ते निर्माण झाले नाहीत, तर संस्थांच्या आयत्या जागा भरण्यासाठी म्हणून “आपली” आणून बसवली गेली आणि हीच पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे विकास प्रक्रियेमधून सामान्य माणसांच्या कर्तृत्वशक्ती जाग्या करणं हे जे यशवंतरावांना अभिप्रेत होतं ते साध्या झालं नाही.