साहजिकच शेतक-याच्या मनाची ही जी धडपड परंपरा आणि नवता दोन्ही जपण्याची आणि टिकविण्याची होती. त्याचेही प्रतिबिंब भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पडले आणि स्वातंत्र्यलढ्यानंतर जी आपण राष्ट्राची उभारणी करतो आहोत. त्याच्यामध्ये हे पडलेले आहे म्हणून आधुनिकीकरण म्हणजे सर्व जुन्या गोष्टीचा त्याग असे नव्हे, तर त्याचे परिशीलन करून कोणत्या जुन्या गोष्टी त्याज्य आणि कोणत्या जुन्या स्वीकारार्ह याचा निर्णय हा राजकारणातला एक महत्त्वाचा भाग आहे. परंपरा आणि नवतेमधील या तडजोडी भारतीय माणूस आपल्या विशिष्ट पद्धतीने करतो आहे. त्याच्यामुळे त्याच्या राजकारणाला वेगळेपण आलेले आहे. हिंदू धर्माचे प्राबल्य ही भारतीय समाजातली सर्वात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. ती कोणालाही नाकारता येणार नाही. लोकसंख्येच्या ब्याऐंशी टक्के लोक जर हिंदू आहेत तर ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? म्हणून या देशाची राज्यघटना तयार होत असताना धर्माचे आणि राज्यसंस्थेच्या संबंधांचे स्वरूप काय राहील याच्यावरती वाद झाला आणि शेवटी धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा निर्णय घटनाकारानी घेतला. नुसते ब्याऐंशी टक्के हिंदू आहेत एवढे नव्हे तर इतर धर्मामध्ये हिंदू धर्मातले धर्मांतरित असे लोक असल्याकारणाने त्यांनी जरी धर्म बदलला तरी आपल्याबरोबर जाताना अनेक हिंदू संस्कारांचे गाठोडे आपल्याबरोबर नेलेले आहे. संस्कृतीचे जे वातावरण आहे ते प्रामुख्याने हिंदू आहे. याचा उपयोग राजकारणात विधायक दृष्टीने करता येण्यासारखा आहे आणि विध्वंसकदृष्टीनेही करता येण्यासारखा आहे. म्हणून राजकारणातले वेगवेगळे राजकीय पक्ष किंवा वेगवेगळ्या शक्ती त्याचा कसा उपयोग करत आहेत हा देखील भारताच्या राजकारणाच्या अभ्यासाचा एक मार्ग आहे. या धार्मिक वस्तुस्थितीचा विधायक उपयोग करण्यासाठी घटनेत कोणती कलमे आली आणि मतांचे राजकारण कसे चालते. त्यात सुसंगती आहे की विसंगती आहे. विघातक आणि विध्वंसक कार्याकरिता या भावना कोण चेतवतो आहे. त्यासाठी ते काय करतात. हा सगळा भारतीय राजकारणाच्या अभ्यासातला एक भाग आहे. जाती संस्था, चातुर्वर्ण व्यवस्था हा हिंदू समाजाच्या समाजरचनेचा पाया आहे. परंतु गेल्या पाच पन्नास वर्षामध्ये जातीचे स्वरूप खूपसे बदलत चाललेले आहे. आपण ब-याच वेळेला म्हणतो की, भारतातले राजकारण जातीनिष्ठ आहे आणि जातींचा प्रभाव राजकारणावरती पडतो हे खरेच आहे. पण राजकारणाच्या प्रक्रियेमुळे जाती आणि त्यांचे कार्य यांच्यामध्येही बदल होत चालला आहे. याच्याकडेही लक्ष पुरवणे आवश्यक आहे. आणि त्यांचे संबंध एक दिशा मार्गासारखे नसून Inter Penetration चे त्यांचे संबंध आहेत. जातीमुळे राजकारणाचे स्वरूप निश्चित होते. राजकारणामुळे जातीचे स्वरूप बदलत आहे. अस्पृश्यता हा विचार मागे पडला. जातीनिहाय व्यवसाय हा विचार मागे पडला. पण एक सामाजिक संघटनेची बाब म्हणून, एकत्र येण्याची बाब म्हणून जातीना महत्व आले. कारण लोकशाही राजकारणामध्ये संख्येला महत्व असते ना? Democratic Politics is a Politics of number. शेवटी संख्येचे राजकारण असते ते, म्हणून तर एक्कावन्नांचे राज्य होते आणि एकूणपन्नास टक्क्यांना विरोधी भूमिका घ्यावी लागते आणि आपण एक्कावन्न टक्के कसे होऊ यासाठी धडपड करायची असते. त्यामुळे आज जातींची जी परंपरागत कार्ये होती, उदा. व्यवसाय निश्चिती करणे ते मागे पडले. व्यक्तीचे सामाजिक जीवनामधले स्थान निश्चित करणे हे मागे पडले. रोटी व्यवहार त्या विशिष्ट गटापुरता मर्यादित राहणे मागे पडले. बेटी व्यवहार तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नाही. पण आधुनिकतेच्या परिणामांमुळे आपला समाज जो ढवळून निघतो आहे तसा तो आणखी पांच पंचवीस वर्षे ढवळून निघाला तर बेटी व्यवहार जाती जातीत मोठ्या प्रमाणावरती व्हावयाला लागतील त्याबद्दल मला मुळीच शंका नाही.