व्याख्यानमाला-१९९०-४ (14)

भारतीय राजकारण : अभ्यासाची एक दिशा
व्याख्यान दुसरे
१४ मार्च १९९०

कालच्या व्याख्यानामध्ये मी राजकारणाचा नेमका गाभा काय असतो आणि राजकारणाचा सखोल अभ्यास करायचा असेल तर समाजाचा अभ्यास का करावा लागतो ते स्पष्ट केले. कारण, काल मी म्हटले की, कुठलेही राजकारण निर्वात पोकळीमध्ये घडत नाही, समाजामधल्या समस्या, समाजातले वेगवेगळे संघर्ष, समाजामधले ताण आणि तणाव आणि समाजामधली विविध हितसंबंधामधली आणि हितसंबंधी गटांमधली स्पर्धा या सगळ्यांमुळे राजकारणाला प्ररणा मिळत असते. जर आपण असा मतभेदविरहित, संघर्षविरहित, ताण आणि तणावविरहित समाज कल्पू शकलो तर अशा समाजात राजकारणाचे काही प्रयोजन राहणार नाही. पण असा समाज सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा अस्तित्वात कुठेच असत नाही. अॅरिस्टॉटल असे म्हणायचा की, ‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे.’ आणि तो स्वयंपूर्ण नसल्या कारणाने आपल्या शारीरिक, आर्थिक, भावनिक, मानसिक गरजा पु-या करण्यासाठी दुस-या मानवाच्या बरोबर तो संघ करून राहतो. पण माणूस नुसता समाजप्रिय प्राणी आहे, एवढेच त्याचे वर्णन नाही तर तो भांडखोरही आहे. त्याला माणसावाचून करमत नाही. पण माणसाशी त्याचे जमत नाही, पटत नाही. अशा दोन्ही भावना माणसामध्ये असतात. प्रथम छोटा समाज, छोट्या समाजातून मोठा समाज, त्यातून अधिक मोठा समाज अशी समाजाची जी उत्क्रांती गेली हजारो वर्षे होत आली त्यामुळे समाज संघटनेचा प्रश्न बिकट होत गेला. रस्त्यावरून दोन चार माणसे चालत असली आणि त्यांनी वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तरी फारसे बिघडत नाही. पण शेकडो आणि हजारो माणसे रस्त्याचा वापर करू लागली आणि पादचा-यांबरोबर वाहनेही रस्त्यांचा वापर करू लागली की मग कोणी कुठल्या रस्त्याच्या भागाचा उपयोग करावा, कोणत्या दिशेने वाहने जावीत, कोणत्या दिशेने पादचा-यांनी जावे, त्यांच्यासाठी रस्त्याचा कोणता भाग राखून ठेवायचा, हे मग ओघानेच आले. कारण एरव्ही रस्त्यावरून चालणे जिकीरीचे आणि धोक्याचे होते. एकदा असे रस्त्याचे भाग पाडून पादचा-यांचेसाठी हा आणि वाहनांच्यासाठी हा असे म्हटल्याबरोबर या नियमांचे पालन लोक करतात की नाही हे पाहणे ओघानेच आले. म्हणजे मग त्यासाठी रस्ता वाहतूक यंत्रणा आली. नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी यंत्रणा आली. नियमांचे उल्लंघन करतात त्यांना शासन देण्याची यंत्रणा – नियम – नियमावली हेही सगळे आले. छोटेसेच रोजच्या अनुभवातले हे उदाहरण आहे म्हणून मी घेतले. रहदारीचा काही एकच प्रश्न समाजामध्ये नसतो. सहस्त्रावधी प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांतून मार्ग काढणे आणि समाजजीवन सुरक्षित, शांततामय आणि सुलभ व्हावे यासाठी त्या समाजामध्ये नियम करावे लागतात. नियम केल्यानंतर ते कुणीतरी उल्लंघणार हे गृहित धरावे लागते. त्यांना शासन करण्याची व्यवस्था करावी लागते. या सगळ्या प्रक्रियेमधून राज्यसंस्थेचा उदय झाला आणि ती राज्य संस्था कोणाच्या हातामध्ये असावी याच्यावरून नवे संघर्ष सुरू झाले. कारण ही राज्य संस्था स्वतःला जरी निरपेक्ष म्हणत असली तरी ती तशी निरपेक्ष नसते. ती पक्षपाती असते, ती दुस-या माणसाचा पक्षपात करते, त्याच्याऐवजी माझा पक्षपात करावा अशी मागणी समाजामध्ये व्यक्ती आणि व्यक्तींचे गट करू लागतात.