व्याख्यानमाला-१९८७-२ (14)

प्रसिध्द फ्रेन्च समाजशास्त्रज्ञ एमिल दुरखाईम आणि मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड या दोघांनीही धर्माची सामाजिक उपपत्ती देवकपूजा संप्रदायावरून. ‘टोटेमिझम’ वरून झालेली आहे असे सांगितलेले आहे. दुरखाइम याच्या मताप्रमाणे धर्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून माणसाने आचरण्याचे सामाजिक नियम होत. धर्म माणसाला आज्ञा देतो आणि जे विधिनिषेध सांगतो ते तर समाजाचेच विधिनिषेध आणि आज्ञा असतात. जुन्या काळात व्यक्तीने हे नियम स्वत: होवून स्वीकारले होते कारण त्यात व्यक्तीची सुरक्षितता होती. आणि या आज्ञा स्वीकारल्या नाहीत तर समाजाकडून वाळीत टाकण्याची, बहिष्काराची भीती होती. आजचे धर्मसंस्थेचे समर्थक नेहमी एक गल्लत करीत आलेले आहेत. त्यांना धर्म ही संस्था माणसाच्या मनात हे कायदे पाळण्याची प्रेरणा निर्माण करते असे वाटते. परंतु या प्रेरणेचा उगम नेमका कोठे आहे हे कळत नाही. माणसे या सर्व गोष्टी स्वत:ची सुरक्षितता आणि आवश्यकता सांभाळण्यासाठी तरीत असत या गोष्टीकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते आणि त्यांच्याकडून व्यक्तिगत धर्म आणि सामाजिक धर्म या धर्माच्या दुहेरी स्वरूपाचा विचार होत नाही. संस्थात्मक धर्माचा उद्य हा समाजधारणेसाठी झालेला होता आणि समाजविकासाच्या टप्प्यात यासाठीच एका श्रेष्ठ व बलिष्ठ व्यक्तीला इतरावर हुकुमत गाजविण्याची शक्ती आणि अधिकार प्राप्त झालेला होता. समाज धारणेसाठी ज्या छोट्या मोठ्या संस्थांना माणसांनी जन्म दिलेला होता त्या सा-याच संस्था आपल्या कायद्यांनी, आज्ञांनी आणि नीती नियमांनी माणसाच्या नैसर्गिक स्वातंत्र्याचे दमन करीत होत्या. अशी माणसे भावनाग्रस्त मनोविकृतीने पछाडली नसली तरच नवल. म्हणूनच फ्राइडला धर्म हा भावनातिरेकग्रस्त मनाच्या विकृतीचे अपत्य वाटला.

धर्मसंस्थेने आजवर संस्कृती आणि नीतीनियम यांच्या ओझ्याखाली माणसाला यंत्रवत बनवून टाकले आहे. माणसाचे माणूसपण नष्ट करून टाकलेले आहे. समाजधारणेसाठी आणि जीवनाच्या सुरक्षिततेसाठी माणसाने मोजलेली ही सर्वात अधिक किंमत आहे. ज्या दिवशी माणूस स्वयंशिस्त होईल आणि तो ही जोखडे फेकून देईल त्याच वेळी त्याला ख-या स्वातंत्र्याची प्राप्ती होईल. त्याला त्याचे माणूसपण प्राप्त होईल. प्राचीन काळी धर्मसंस्था ही जीवन सुरक्षित राहण्यासाठी निर्माण झाली आणि हे सारे जीवन त्यांच्या प्राथमिक गरजेत सामावलेले होते. ज्या काळात माणूस पशूपाल होता त्याकळात त्याने मेंढ्यांच्या कळपांना आणि गाईच्या कळपांना पवित्र मानले. शेतीच्या शोधानंतर तो पेरणी आणि पीक कापणीचे उत्सव करू लागला आणि आज तर तो लक्ष्मीपूजन करीत आहे. आज आपण गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत आणि ताबूतांच्या गर्दीत धर्मसंस्थेचा हा जो मूळ उद्देश आहे तो पार विसरून गेलो आहोत. या धर्मसंस्थेच्या प्राथमिक स्वरूपाने टोळ्यांना, गणांना एकसंध केले. आपापला गण हा एकात्म आहे. आपली टोळी संघटीत आहे आणि ती इतरांच्या पेक्षा वेगळी आहे अशी दुहेंरी जाणीव धर्मसंस्था माणसांना देत गेली. यामागेही सुरक्षिततेचा आणि प्राथमिक गरजा पु-या करण्याचाच भाग होता. धर्मात देवाचा शिरकाव फार उशीरा झालेला आहे.