व्याख्यानमाला-१९८७-२ (11)

धर्माचा उदय
धर्म हा माणसाचा एक मनोव्यापार आहे आणि हा मनोव्यापार जसा व्यक्तिगत तसाच सामुहिकही आहे याकडे जर आपण लक्ष दिले तर आपल्याला असा प्रश्न विचारावा लागेल की हा मनोव्यापार कशाबद्दलचा आहे ? त्या मनोव्यापाराचा विषय कोणता आहे.? माणसाची सारीच प्रगती प्रश्न विचारीत आणि त्यांची उत्तरे शोधीत झालेली आहे. आपल्या उपनिषदातही असेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ज्यावेळी माणूस आदिम अवस्थेत होता त्यावेळीही त्याला प्रश्न पडत होते आणि आजच्या विकसित अवस्थेतही प्रश्नांनी त्याचा पिच्छा सोडलेला नाही. मानवी प्रगती बरोबरच नवनवे प्रश्न निर्माण होणारच. आजही जुन्या काळातल्या माणसाच्या मनात कोणते प्रश्न निर्माण झाले होते हे समजून घेतले तर ते प्रश्न आपल्याला अडाणीपणाचे वाटतील आणि त्यांची उत्तरेही आज आपले समाधन करू शकणार नाहीत.
यादृष्टीने या ठिकाणी आपल्या उपनिषदापैकी ‘केन’ या उपनिषदाचे उदाहरण घेता येईल. केनोपनिषदात प्रश्न उभा केलेला आहे की वाणी म्हणजे भाषा कशापासून प्रकट होते ? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे ‘ब्रह्मापासून.’ पुढचा प्रश्न आहे ‘ब्रह्म कशाला म्हणतात ?’ उत्तर आहे “ ज्याला वाणी प्रकट करू शकत नाही परंतु ज्याच्यातून वाणी प्रकट होते त्याला ब्रह्म असे म्हणतात.” आपल्याला उपनिषदांतले हे सारे तर्कशास्त्र आज वाटेल परंतु ते हजारो वर्षापूर्वीचे प्रश्न आहेत. त्यासाठी आपल्याला काळाचे भान ठेवावे लागेल आणि मग...........
“ वाणी कशापासून प्रकट होते ? ”
“ ब्रह्मापासून”
“ब्रह्म काय आहे ?”
“ज्याच्यापासून वाणी प्रकट होते त्यास ब्रह्म म्हणतात”  किंवा
“मन कशाच्या द्वारे मनन करते ? ”
उत्तर आहे “ब्रह्माच्या द्वारे ”
प्रश्न आहे “ ब्रह्म म्हणजे काय ?”
उत्तर आहे “ज्याच्या द्वारे मनन केले जाते त्याला ब्रह्म म्हणतात.”
प्रश्न असतो. “डोळे काय पाहू शकत नाहीत.”
उत्तर असते “ डोळे ब्रह्म पाहू शकत नाहीत.”
पुन्हा प्रश्न असतो “ब्रह्म काय आहे ?”
उत्तर येते “ज्याला डोळे पाहू शकत नाहीत त्याला ब्रह्म असे म्हणतात ”
या प्रकारचे प्रश्न माणूस विचारीत गेला आणि स्वत:चे समाधान होईल अशी उत्तरे मिळवीत गेला. परंतु माणसाचे समाधान कधी झालेच नाही. माणसात वसत असलेले असमाधान हा त्याच्या भौतिक प्रगतीचा एक महत्वाचा आधार आहे. म्हणून तर माणसे सतत प्रश्न विचारीत राहिली. बुध्दाला सुध्दा असाच प्रश्न विचारला गेला “भन्ते, स्पर्श करतो, स्पर्श करतो, कोण स्पर्श करतो ?”  बुध्द म्हणाले “हा प्रश्नच मुळी चूक आहे. स्पर्श कोण करतो हा प्रश्नच बरोबर नाही. सहा इन्द्रिये आणि त्यांचे विषय असल्यामुळे स्पर्श होतो.” बुध्दाचे हे उत्तरही काही आपोआप आलेले नाही. त्या उत्तराला त्यापूर्वीच्या शेतडो वर्षाच्या काळातील शेकडो प्रश्नांची आणि त्यांच्या समाधानकारक-असमाधानकारक  उत्तरांची पार्श्वभूमी आहे. हा मानवी विचारांचा विकास आहे. आणि विकास पोकळीत कधीच होत नसतो. भदंत आनंद कौशल्यायन यानी उपनिषदकालीन ऋषी ‘ब्रह्माला’ कवटाळून अंधारात भटकत होते असे म्हंटलेले असले तरी त्यांच्या इमानदारीची त्यांनी प्रशंसा केलेली आहे. अलिकडे धर्मपंडितात जो खोटा बडेजाव आलेला आहे तो त्यांच्यात आलेला नव्हता. म्हणून तर ते म्हणत असत “ मला हे माहित नाही की मी त्याला जाणतो. मी हे सुध्दा म्हणू शकत नाही की मी त्याला जाणीत नाही. कारण थोडेसे तर जाणतो आहेच. आमच्यापैकी जो त्याला जाणल्याच्या गोष्टी करतो त्याला हे माहीत असते की तो जाणतोही आणि जाणीत नाही ही,”