व्याख्यानमाला-१९८७-२ (9)

धर्मचिंतक आणि धर्म ग्रंथ
काही विद्वान मंडळी वेदांना ज्ञानाचे भांडार म्हणतात आणि आपण सर्वच जण वेद वाचण्याची तसदी न घेता त्यांचे म्हणणे मान्य करीत असतो. वेद वाङमयाचा आता विविध अंगांनी अभ्यास होत आहे. वेदांचे जे अर्थ अद्याप लागतच नव्हेते ते मोहेंजोदडो आणि हडप्पाच्या उत्खननाने लागू लागले आहेत त्यामुळे सायनाचार्य आता अर्धे अधिक बाद ठरू लागले आहेत. त्यांनी वेदांचे लावलेले अर्थ किती काल्पनिक होते हे आता स्पष्ट होवू लागले आहे. हे सारे आधुनिक वाङमय आणि चित्रावशास्त्रींनी ऋग्वेदाचे केलेले मराठी भाषांतरही आपण वाचले तर वेदात काय तत्वज्ञान आहे याचा आपल्याला उलगडा होईल. आता शिक्षण सार्वत्रिक झाल्यामुळे हे प्राचीन वाङमय आपण मनात आणले तर आपण समजावून घेवू शकतो. ऋग्वेदात काही फार मोठे तत्वज्ञान असावे असे मला वाटत नाही. एकादे नासदीय सूक्तासारखे अपवादात्मक सूक्त सोडले तर त्यात काही तत्वज्ञान असावे असे दिसत नाही. परंतु हे प्राचीन वाङमय वेगळ्या अर्थाने ज्ञानाचे भांडार आहे. आपले पूर्वज एके काळी कोणत्या अवस्थेत होते. त्यांच्या जीवनाचा आणि संस्कृतीचा विकास कसा झाला या सा-यांचा तपशील आपल्याला हे प्राचीन ग्रंथ देतात. हे आपलेच प्राचीन ग्रंथ देतात असे नाही तर जगातले सर्वच ग्रंथ आपापल्या भू प्रदेशाचा आणि त्यावर वास्तव्य करणा-या मानव समूहाचा विकास स्पष्ट करतात. या जुन्या ग्रंथांना आपण विनाकारण पावित्र्याचा भावना चिटकवल्यामुळे हा विकास आपल्याला अद्याप नीट समजावून घेता आला नाही.

आपला प्राचीन ग्रंथ ऋग्वेद मानला जातो. त्यात ‘धर्म’ या शब्दाचा ज्या ज्या ठिकाणी उल्लेख आहे तो उल्लेखच मुळी समाज नियमनासाठी त्या काळात जे नीती नियम केलेले होते त्या नियमांच्या संदर्भांतच वापरलेला आहे. पुढे छांदोग्य उपनिषदा सारखी उपनिषदे चार आश्रमांची विशिष्ट कर्तव्येच धर्म म्हणून सांगू लागली. तैतरीय उपनिषद जेव्हा ‘सत्यं वद, धर्मं चर ’ असा उपदेश करते त्यावेळी परंपरेने तुम्हाला जी कामे करायला सांगितली आहेत ती करणे म्हणजे धर्म असे तैतरीय उपनिषदाला म्हणावयाचे असते. भगवदगीता तरी यापेक्षा वेगळे काय सांगते ? ‘स्वधर्मे निधनं श्रेय:’ याचा अर्थ काय आहे.? याचा अर्थ चातुवर्ण्य व्यवस्थेप्रमाणे तुमच्या वाट्याला जे काम आले असेल, जे कर्म आले असेल ते कसेही असले तरी ते तुम्ही करणे म्हणजेच धर्म होय. मनू स्मृतीत तर हा धर्म फारच स्पष्ट झाला आहे. मनूस्मृतीत केवळ आज्ञा केल्या नाहीत तर त्या एखाद्याने मोडल्या तर त्याच्या वर्णाप्रमाणे त्याला कोणती शिक्षा द्यावयाची हे सुध्दा सांगून टाकले. हे काही हिंदुधर्मातच आहे असे नाही.