व्याख्यानमाला-१९७९-२५

अस्पृश्य हा शब्द असा आहे की तो शब्द उचाचरणा-याला व ऐकणा-याला घणा वाटावी म्हणून म. गांधीनी १९३४ नंतर अस्पृश्य या शब्दाऐवजी 'हरिजन' हा शब्द अस्तित्त्वात आणला व त्या नावाचे एक साप्ताहिकही काढले. हरिजन म्हणजे हरीचे जन शब्द बोलायला सोपा, दिसायला सात्त्विक आणि शब्दाबद्दल घृणा तर मुळीच वाटत नाही. भिन्न भिन्न काळात झालेल्या दोन थोर व्यक्तींचे विचार नकळत कसे समान असतान हे दर्शविण्याच्या दृष्टीने महाराजांनीही अशाच सोज्वळ शब्दांची योजना केली होती. महाराजांनी १९१७ साली एक गॅझेट काढून कोल्हापूर संस्थानात रहाणा-या अस्पृश्य समाजातील मंडळीनी या पुढे आपल्याला अस्पृश्य म्हणून न घेता 'सूर्यवंशी' म्हणून आपले नाव लावावे अशा प्रकारची आज्ञा प्रसिद्ध केली. म. गांधींचा हरिजन हा आणि शाहू महाराजांचा सूर्यवंसी शब्द हे अस्पृश्य शब्दासंबंधी या दोन थोर व्यक्तींच्या मनात कशी घृणा निर्माण झालेली होती व त्यांचे विचारामध्ये कसे साम्य होते हे दाखविण्यासाठी मुद्दाम मी ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे.

महाराजांनी अस्पृश्यांना स्पृश्य हिंदूच्या बरोबर स्थान मिळावे, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढावी या दृष्टीने बहुमोल कार्य केले आहे. महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट करण्याची योजना मनाशी आखण्यापूर्वी बहुजन समाजातील लोकांना ते काम करता यावे म्हणून तलाठी निर्माण करण्याची योजना आखली. त्यासाठी स्वतंत्र शाळा काढली. या शाळेत अस्पृश्य विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्या देऊन त्यांचा शिक्षणक्रम पुरा झाल्यानंतर त्यांच्या तलाठी म्हणून नेमणूका केल्या. पूर्वी अस्पृश्य समाजातील ज्या व्यक्तींना चावडीच्या बाहेरच थांबावे लागे ती व्यक्ती गावच्या चावडीमध्ये पाटलाच्या मांडीला मांडी लावून पूर्वी ज्या ठिकाणी कुलकर्णी बसत होता त्या ठिकाणी मानाने बसू लागली. काही शिकल्या सवरलेल्या अस्पृश्य लोकांना महाराजांनी वकिलीच्या सनदा दिल्या. त्यामुळे ही मंडळी ब्राह्मण वकिलांचे बरोबरीने कोर्टात कामे चालवू लागली आणि बाररुममध्ये ब्राह्मण वकिलांच्या समवेत तक्याला तक्या लावून मानाने बसू लागली. मात्र अशा सनदा देताना महाराजांनी गुमवत्तेवर भर दिला होता व या सनदी वकिलांना सनद देण्यापूर्वी कायद्याचे यशोचित ज्ञान मिळावे याचीही योजना आखली होती. अशिक्षित अस्पृश्यांना खाजगीकडे अगर दरबारकडे चाकरमान्यांच्या, हुलस्वारांच्या, कोचमनच्या, हत्तीवरील माहुतांच्या, मोटारीवरील ड्रायव्हर-क्लिनर या जागेवर व पोलीस म्हणून त्यांच्या नेमणुका केल्या होत्या. दरबार भरेल त्यावेळी मानक-यांचा पोषाख घालून व कमरेला म्यानासह तलवारी लटकावून ही मंडळी स्पृश्य समाजात मन मोकळेपणाने वावरत असत.

डॉ. आंबेडकरांनी "Who were the Shudress!" या नावाचा एक इंग्रजी ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद्र हे पूर्वाश्रमीचे क्षत्रिय होते. अशा संशोधनात्मक निष्कर्ष काढला आहे. महाराजांनी अस्पृश्य नोकरांना मानक-याला पोषाख देऊन आणि त्यांच्या कमरेला म्यानासह लटकत्या तलवारी देऊन एक प्रकारे ते क्षत्रिय असल्याचे डॉ. आंबेडकरांनी लिहिण्यापूर्वीच मान्य केले होते.

गंगाराम कांबळे या नावाच्या महार समाजातील एका व्यक्तीला महाराजांनी कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत एक हॉटेल काढून दिले. महाराज नित्यनेमाने या हॉटेलला भेट देत असत. गंगाराम कांबळे याच्या हातचा चहा मागवून पीत असत. आपल्या रथात बसलेल्या १०-१५ माणसांना त्यांना आवडो अगर न आवडो महाराजांनी चहा घेतल्यामुळे त्यांना गंगाराम कांबळे यांच्या हातचा चहा पिणेच भाग पडे. यावेळी रस्त्यावर तोबा गर्दी जमत असे. खुद्द महाराजच महाराच्या हॉटेल मधील चहा पीत असलेले दृष्य पाहून स्पृश्य समाजातील कडव्या लोकांच्या भावनासुद्धा हळू-हळू बोथट होऊ लागल्या. गंगाराम कांबळे यास महाराजांनी काढून दिलेले हे हॉटेल म्हणजे सबंध हिंदुस्थानातील अस्पृश्य समाजातील व्यक्तीने चालविलेले हे पहिलेच हॉटेल होते. याची सामाजिक क्रांतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी लागेल.