व्याख्यानमाला-१९७६-३३

ही व्याख्यानमाला यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावाने यशस्वीरीत्या चालविण्यात या संस्थेने मोठेच कार्य केले आहे. त्यात समयसूचकता व यथार्थताही दाखविली आहे. ज्ञानी आणि प्रबुध्द लोकांना आपल्या अचूक ज्ञानाने प्रभावित करणारे नि उत्तररात्रीही तन्मयतेने जुन्या व नव्या विचारवंतांच्या विचारांत मग्न होणारे यशवंतरावजी चव्हाण यांचे एखाद्या प्रबोधनाच्या कार्यास नाव देणे ही यथार्थ अशीच कल्पना आहे. यशवंतराव चव्हाण आपल्या कर्तृत्वाने व बुध्दिसामर्थ्याने, देशभक्तीने व संघटना चातुर्याने दिल्लीच्या राजकरणात, महादजी शिंदे यांच्यानंतर त्यापूर्वी दिल्लीच्या राजकारणापर्यंत पोचले होते. ते राजर्षी शाहू छत्रपती या नावाने इतिहासात प्रसिध्द झाले.

आज आपल्या राष्ट्राने जनतेपुढे वीस कलमी कार्यक्रम ठेवलेला आहे. तो का ? तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचवीस वर्षे होऊन गेली, तरी देशाचा जो बहुसंख्य दुर्बल घटक आहे त्याच्यापर्यंत स्वातंत्र्याचे लोण पोचले नाही म्हणून. मागासवर्गीय व अस्पृश्य समाजाच्या उन्नतीचे कार्य़ शाहू छत्रपतींनी पन्नास वर्षांपूर्वी केले. ‘मागासवर्गीय व बंधुभगिनींना आणि अस्पृश्य समाजाला मी एकाच जातीचे समजतो व त्यांना वर आणायचा प्रयत्न करतो हे माझे पवित्र कर्तव्य आहे असे मी समजतो. ते मी न करीन तर मी कर्तव्यविन्मुख झालो असे माझे मन मला टोचील’ त्या ध्येयाने प्रेरित झालेले शाहू छत्रपती मद्रास, हुबळी, नाशिक, कानपूर, भावनगर, नागपूर व दिल्लीपर्यत मागासवर्गीयांना आणि अस्पृश्य वर्गांना सामाजिक समतेने वागविले पाहिजे, त्यांची मानवी प्रतिष्ठा व मानवी हक्क त्यांना मिळालेच पाहिजेत. असे भारतीयांना ओरडून सांगत, ते आक्रोश करीत फिरले. त्या काळी राजकीय चळवळ करणारे देशातील महान पुढारी लो. टिळक, पंजाब केसरी लाला लजपतराय, बॅ. सुरेंद्रनाथ बॅनर्जी व सर फिरोजशहा मेथा यांच्या राजकीय ध्येयधोरणाला फारसा सामाजिक आशय होता, असे दिसत नाही. त्यांच्या राष्ट्रवादाला नकारात्मक (Negative) स्वरूप आले होते. ब्रिटिशांचे राज्य आम्हांला नको असा त्यांचा सूर होता. त्याचे एक उत्तम उदाहरण येथे सांगता येईल.

पहिल्या महायुध्दाचे वेळी देशभक्त लाला लजपतराय हे आपल्या स्वदेशगमनबंदीच्या काळात अमेरिकेत हिंदी स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी घेत असत. अशाच एका न्यूयॉर्क येथील सभेत ते बोलत असता एका कामगार कार्यंकर्त्यांने त्यांना विचारले की, ‘तुम्हांला स्वातंत्र्य पाहिजे हे आम्हांला कळले. पण हिंदुस्तानातील राष्ट्रवादी नेते हिंदी जनतेच्या दारिद्र्याचा नायनाट कसा करणार आहेत ते तुम्ही आम्हांला सांगाल काय ?’ त्याप्रश्नावर उत्तरे -  प्रत्त्युत्तरे झाली. रागारागाने लजपतराय उद्गारले, “प्रथम आम्हाला आमच्या घराचे स्वामी तर होऊ द्या. नंतर काय करायचे ते आम्ही पाहू!”

ही प्रश्नोत्तरे ऐकून मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या त्या कार्यकर्त्यांने लजपतरायांना दुसरा प्रक्षोभक प्रश्न केला. तो म्हणाला, ‘परकीय भांडवलदार हिंदी जनतेचे शोषण करण्याऐवजी स्वदेशी भांडवलदार जर त्यांची पिळवणूक करणार असतील तर त्या दोघांत फरक तो काय ?’ त्यावर तितक्याच त्वेषाने लालजी उत्तरले, ‘स्वकीय बंधूच्या लाथा आणि परकीय दरोडेखोरांच्या लाथा ह्यांत मुळीच फरक नाही हे खरे!’ उपरोक्त सभेतील वादविवाद ऐकून लाला लजपतरायांच्या सभेत उपस्थित असणारे क्रांतिकारक. नरेंद्र भट्टाचार्य हे स्तिमितच झाले. नरेंद्र भट्टाचार्य हे बंगालचे क्रांतिकारक अनेक वेषांतरे करून स्वदेशातील क्रांतीच्या चळवळीसाठी शस्त्रे आणावयास अमेरिकेत गेले होते. ते काही दिवस लजपतरायांच्या सहवासात होते. वरील संवाद ऐकून नरेंद्र भट्टाचार्य़ हे त्या दिवसापासून लढायचे का व कशासाठी याचा विचार करू लागले. आणि ते सशस्त्र क्रांतीच्या मार्गावरून मार्क्सच्या तत्त्वज्ञानाकडे वळले. पुढे ते एम्. एन्. रॉय म्हणून प्रसिध्द झाले.